-->
संपादकीय पान गुरुवार दि. २२ मे २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
पोल्टी उत्पादनावरील बंदी उठविल्याचे स्वागत
-----------------------------------------
युरोपातील देशांनी भारतीय आंब्यांना आयात बंदी घातली असली तरी आता मात्र युरोपीय महासंघाने भारतीय पोल्ट्री मांसोत्पादनांवरील बंदी उठविल्याची घोषणा केली आहे. या घोषणेचे आपण स्वागत केले पाहिजे. अर्थात निर्यात करण्यासाठी काही कडक नियमांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. भारतीय पोल्ट्री मांसोत्पादनांचे निर्यातदारांनी सुधारित मॉडेल आरोग्य प्रमाणपत्र सादर करण्याचे बंधनकारक केलेे आहे. सुधारित आरोग्य प्रमाणपत्र घेण्यासाठी ३० सप्टेंबर २०१४पर्यंतची मुदत अपेडा तर्फे देण्यात आली आहे. तोवर सध्याच्या आरोग्य प्रमाणत्राच्या आधारे निर्यात करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे अपेडाने नोटिशीद्वारे स्पष्ट केले आहे. बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्याचे कारण देत युरोपीय महासंघाने २००९मध्ये भारतातून युरोपात भारतीय पोल्ट्री मांस उत्पादनांच्या आयातीवर बंदी लादली होती. या कालावधीत भारताने बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यात विविध उपाययोजना आखल्या, आता बर्ड फ्लूच्या प्रसाराची शक्यता कमी झाल्याचे युरोपीय महासंघाने म्हटले आहे. मात्र भारतीय पोल्ट्री मांस उत्पादनांच्या आयातीवर आरोग्यविषयक कडक बंधनेही घातली आहेत. अंडी, पोल्ट्री मांस उत्पादनांच्या निर्यातीतून भारतास २०१३मध्ये सुमारे ५०० कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळाले होतेे. २०११मध्ये ते ३१४ कोटी, तर २०१२मध्ये ४५८ कोटी रुपये होते. यातील युरोपीय महासंघाचा वाटा हा २० ते २५ टक्के आहे. आता युरोपीय महासंघाने आयातबंदी उठविल्यानंतर भारतीय पोल्ट्री कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, असा अंदाज पतमानांकन कंपन्यांनी व्यक्त केला. भारतीय पोल्ट्री उत्पादनांचा दर्जा हा सर्वोच्च आणि जागतिक स्तरावरील गुणवत्तेचा आहे, हे युरोपियन युनियनच्या निर्णयावरून सिद्ध झाले आहे. युरोपात आता फ्रोजन पदार्थ पाठविण्याची संधी आहे. या निर्णयामुळे युरोप वगळता अन्य देशांमध्येही निर्यातीला चालना मिळेल. कारण युरोपियन युनियनचे निकष हे सर्वांत कडक आहेत आणि जगभरात ते विश्वासार्ह समजले जातात. सध्या एकूण प्रक्रियेच्या केवळ पाच टक्के पोल्ट्री उत्पादनांची निर्यात होत आहे. यापुढील काळात निर्यात वाढली तर देशांतर्गत बाजारात जो चढ-उतार होतो, तो कमी होईल. देशातील लहान पोल्ट्री इंटिग्रेटर्सने देखील पोल्ट्री प्रक्रियेचे प्लँट सुरू करून निर्यातीत उतरले पाहिजे. युरोपियन युनियनने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा लाभ घेतला पाहिजे. आपल्याकडे पोल्ट्री उद्योग जसा घरगुती लहान प्रमाणात चालविला जातो तसाच तो एक व्यावसायिक दृष्टीकोनातूनही एक उत्तम व्यवसाय म्हणूनही केला जातो. आपल्याकडे शेेतकर्‍यांना एक जोड धंदा म्हणून याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. परंतु त्यापेक्षा हा एक मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणार्‍यांसाठी देखील ही एक उत्तम संधी ठरते. अर्थात यातील निर्यात करणार्‍या कंपन्यांसाठी ही एक संधी चालून आलेली आहे. सध्या आपण दहा देशांना पोल्ट्री उत्पादनांची निर्यात करतो. अर्थात आता बंदी उठविल्यामुळे आपण आणखी देशांना निर्यात करु शकू. तसेच आता जेवढ्या रकमेची निर्यात होते त्यातही लक्षणीय वाढ होऊ शकते. निर्यात करताना आपण नेहमीच एक बाब लक्षात ठेवली पाहिजे की विकसीत देशात निर्यात करीत असताना त्यांच्या आरोग्य विषयक कडक नियमांचे पालन आपण करण्यास शिकले पाहिजे. विकसीत जगात आपल्यासारखे   आरोग्याला घातक असे कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. त्यांच्या देशात आरोग्याला सर्वात जास्त महत्व आहे. आपण त्यांच्या अटींची पूर्तता केल्यास चांगले डॉलरमधील उत्पन्न मिळवू शकतो. त्यामुळे उत्कृष्ट दर्ज्या राखल्यास आपण विकसीत देशांच्या बाजारपेठेत आक्रमकरित्या आपला माल खपवू शकतो. पोल्ट्री उद्योगाला आता पुन्हा एकदा सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel