-->
मंगळवार दि. २९ एप्रिलच्या अंकासाठी अग्रलेख
--------------------------------------
नोकियाचा अस्त
-----------------------------------
मोबाईल म्हटला की नोकिया, असे सूत्र आपल्या देशातच नव्हे तर जगात पक्के झाले होते. प्रामुख्याने आपल्याकडे मोबाईल आल्यापासून नोकियाने मोबाईलच्या बाजारपेठेत जी धडक मारली होती ते पाहता मोबाईल म्हणजे नोकीयाच असेच सूत्र तयार झाले होते. परंतु सध्याच्या आधुनिक जगात व प्रामुख्याने जे उद्योग अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी निगडीत आहे त्यांनी आपल्या तंत्रज्ञानात सतत बदल केले नाहीत तर त्यांचे अस्तित्व संपायला वेळ लागणार नाही. नकियाने मोबाईलच्या बाजारपेठेत जगात आपले नाव कमविले असतानाही त्यांचा अस्त का यावा असा प्रश्न निर्माण होतो. याचे उत्तर हे झपाट्याने बदलणार्‍या तंत्रज्ञानाशी नोकीया आपली सांगड घालू शकला नाही असेच आहे. त्यामुळेच त्यांना गेल्या दोन वर्षात जबरदस्त तोटा सहन करावा लागला आणि त्यातून त्यांना अन्य कोणत्यातरी कंपनीने ताब्यात घेणे ही काळाची गरज ठरली. ही संधी जगातली आय.टी. उद्योगातील नामवंत कंपनी मायक्रोसॉफ्टने साधली आणि ही कंपनी आपल्या ताब्यात घेतली. मायक्रोसॉफ्टलाही बदलत्या काळानुसार, मोबाईल उद्योगात उतरायचे होते. त्यासाठी ते कंपनीचा शोधच घेत होते. गुगलने देखील अलिकडे मोटोरोला ही कंपनी ताब्यात घेतल्याने गुगलला स्पर्धा करण्यासाठी मायक्रोसॉफ्टला मोबाईल क्षेत्रात उतरणे भाग होते. आता त्यांनी नोकिया ताब्यात घेतल्याने मोबाईलच्या क्षेत्रात नव्याने उतरण्यासाठी सज्जता केली आहे. आता नोकिया हा ब्रँड तसाच ठेवायचा की त्याला दुसरे नाव द्यायचे हे सर्वस्वी नोकियाचा नवीन मालक मायक्रोसॉफ्ट ठरविणार आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टला वाटले तर ते नोकिया हा ब्रँड कायम ठेवतीलही. अर्थात त्याची घोषणा त्यांनी काही अघ्याप कलेली नाही. काळाच्या ओघात त्याचे उत्तर सापडेलही. नोकियाने साधा मोबाईल असताना आपल्या देशात तसेच जगात मोठी मुसंडी मारली होती. परंतु गेल्या तीन वर्षात मोबाईलचा चेहरा मोहराच पूर्णपणे बदलला. साधे फोन जाऊन त्यांची जागा स्मार्ट फोन ने घेतली. या बदलांची नोंद नोकियाने घेतली असे नाही. परंतु ती नोंद त्यांनी उशिरा घेतली असे म्हणणे योग्य ठरेल. २०१० साली अँन्डॉईड सिस्टिम आली आणि मोबाईल फोन्सचा चेहराच बदलला. मोबाईलचा उपयोग केवळ फोन घेणे किंवा फोन स्विकारण्यासाठी नाही तर तो हातातील एक चालता बोलता संगणक आहे, ते तुमचे फिरते कार्यालय आहे, असा होऊ लागल्यावरही आपल्या जुन्या पध्दतीवर विश्वास ठेवून नोकियाने आपला बाजारपेठेतील मोठा हिस्सा आहे त्याबळावर तारुन जाऊ असा व्यक्त केलेला अंदाज खोटा ठरला. तंत्रज्ञानात काळाच्या ओघात बदल हे झपाट्याने केले पाहिजेत, हे सूत्रच नोकिया विसरल्यासारखा झाला. अँपल बाजारात आल्यावर त्यांनी तंत्रज्ञानाची दिशाच पार बदलून टाकली. लोकांना, आपल्या ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार नवीन तंत्रज्ञान व ते अतिशय सोप्या पध्दतीने पुरवायला सुरुवात केली. त्यामुळे आयफोन महाग असला तरी जगात झपाट्याने लोकप्रिय झाला. त्याचबरोबर या उद्योगातील सॅमसंग व सोनी या कंपन्यांनी आपल्या मोबाईलमध्ये झपाट्याने बदल करुन बाजारपेठ काबीज केली. नोकिया आपण बाजारपेठेतील पुढारीचे आहोत आणि आपल्याला या कोणाचे आव्हानच नाही अशा गुरमीत राहिला. त्यामुळे अन्य कंपन्या कधी पुढे गेल्या हे त्यांना समजलेच नाही आणि या अवाढव्य कंपनीला चक्क तोटा सहन करावा लागला. तसेच लगेचच दोन वर्षात हा तोटा झपाट्याने वाढला आणि आता परिस्थिती आवाक्याबाहेर गेली असताना नोकियाने नवीन पध्दतीचे स्मार्ट फोन बाजारात आणले. मात्र वेळ निघून गेली होती. एकोणिसाव्या शतकापासून फिनलंडमध्ये सुरु झालेली ही कंपनी हा हा म्हणता जगात पोहोचली. एकेकाळी रबरी ट्यूब तयार करणारी ही कंपनी मोबाईल निर्मिती करु लागली आणि त्यांचा चेहरा पार बदलून गेला. फिनलंडच्या अर्थव्यवस्थेचा ही कंपनी कणा ठरली. २०१२ साली या कंपनीचा फिनलंडच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाटा चार टक्के होता. तो ग्लाय वर्षी कमी होऊन ०.२ टक्क्‌यांपर्यंत खाली आला होता. शिवाय त्यांचा एकेकाळी संशोधनावरील खर्च जो ४० टक्क्‌यांवर होता तो १७ टक्क्‌यांवर खाली आला होता. संशोधनावरील खर्च कमी झाल्याने ही कंपनी कशा प्रकारे अधोगतीला पोहोचली हे दिसते. त्यामुळे या कंपनीच्या अस्तामुळे फिनलंडवासियांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. परंतु इतिहासाच्या टप्प्यात या घडामोडी होतच असतात. केवळ फिनलंडच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात नोकियाचे स्थान सुवर्णाक्षराने लिहिले जाईल हे खरे असले तरी त्याच्या अस्तातून अनेक कंपन्यानी धडा घेण्याची गरज आहे. कॉर्पेरेट जगतात अशा घडामोडी काही नवीन नसतात. कंपन्यांचा जन्म होणे व त्यांचा अस्त या नित्याच्या बाबी झाल्या आहेत. केवळ बाजारपेठ काबीज केली तर कंपन्या टिकतील असेही नव्हे. सध्याच्या काळात तुम्हाला अत्याधुनिक तंत्रज्ञान सतत नव्याने अवगत करावे लागते. मायक्रोसॉफ्ट ही कंपनी ताब्यात घेऊन काय मिळविणार, असा प्रश्न उपस्थित होतो. नोकियाचे सध्याच्या जे जाळे आहे व सध्याचे उत्पादन प्रकल्प मायक्रोसॉफ्टला उपयोगी पडतील. आता त्यात नवीन तंत्रज्ञान आपण्याची जबाबदारी ही आता मायक्रोसॉफ्टची असेल. मायक्रोसॉफ्टकडे आधुनिकतेची मानसिकता असल्याने ते नोकियाचा चेहरामोहरा बदतील आणि ही नोकियाला पुन्हा पूर्वीचे चांगले दिवस येतील. अर्थात त्यावेळी नोकिया हे नाव असेल किंवा नसेलही. परंतु सध्या जी नोकियाची रेंज तुटली आहे ती जोडण्याचे काम मायक्रोसॉफ्ट निश्चितच करेल, यात काहीच शंका नाही.
 

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel