-->
बुधवार दि. ३० एप्रिलच्या अंकासाठी अग्रलेख
----------------------------------
कॉँग्रेसचा पराभव नक्की
-----------------------------
लोकसभेच्या मतदानाचे सात टप्पे पार पडले असून आता शेवटचे तीन टप्पे शिल्लक आहेत. यातील एक टप्पा चालू आठवड्यात पार पडेल. हा टप्पा झाल्यावर दोन टप्पेच शिल्लक राहातील. अजून मतदान पूर्ण होत नाही तोच भाजपाच्या गोटातून आपले मंत्रिमंडळ कोणते असेल याची आखणी सुरु झाली आहे. त्यासंबंधी वृत्तपत्रेही रकानेच्या रकाने भरत आहेत. सत्तधारी कॉँग्रेस व त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडी मात्र नैराश्याच्या गर्तेत पूर्णपणे गेली आहे. म्हणजे कॉँग्रेस आता एवढ्या मोठ्या प्रमाणात डिफेन्सवर गेली आहे की यावेळी आपला पराभव नक्कीच आहे असे त्यांनी गृहीत धरले असावे. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना हाताशी धरुन अशा प्रकारे आपली हवा तयार केली की, त्यात सत्ताधारीही आपले अस्तित्व हरवून बसले. त्यामुळे कॉँग्रेसने यावेळी मानसिकदृष्ट्‌या आपला पराभव होणार हे मान्यच केले आहे. त्यामुळेच राज्यातील मतदान संपल्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉँग्रेसला बहुमत न मिळाल्यास तिसर्‍या आघाडीला पाठिंबा देऊ अशी भाषा केली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, कॉँग्रेसला आपला पराभव स्पष्ट दिसतो आहे, फक्त प्रत्यक्षात निकाल लागल्यावर तो स्वीकारण्याची औपचारिकता कॉँग्रेसने शिल्लक ठेवली आहे. यावेळी आपण सत्तेत येत नाही असे कॉँग्रेसचे नेते देखील खासगीत आता बोलू लागले आहेत. त्यामुळे यावेळी कॉँग्रेसचा पराभव नक्की झाला आहे. आता प्रश्न उरतो पुढील सरकार कोणाचे येणार? भाजपाचा असा ठाम दावा आहे की सरकार हे आमचेच असेल व आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल. परंतु भाजपा स्वबळावर सत्तेत येईल अशी त्यांची काही परिस्थिती शंभर टक्के नाही. सध्या मोदींची लाट असल्याचा दावा भाजपातर्फे केला जातो. ही लाट आहे की खरोखरीच माध्यमांनी तयार केलेला फुगा होता हे अद्याप सिध्द व्हायचे आहे. जर समजा भाजपाला १८० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मित्र पक्षांच्या सहाय्याने भाजपा २३०च्या घरात जाईल. परंतु बहुमतासाठी ही संख्या कमीच पडते. अशा वेळी भाजपाच्या साथीला किती नव्याने आणखी कोणते पक्ष येतील ही गणिते आत्ताच सांगता येत नाहीत. कारण जोपर्यंत निकाल लागत नाहीत तोपर्यंत यासंबंधी काही बोलण चुकीचे ठरेल. मात्र जर भाजपा बहुमत सिध्द करण्याच्या स्थितीत नसेल तर ते सरकार स्थापनेचा धोका पत्करणार नाहीत. परंतु मोदी सत्तेवर यावेत यासाठी त्यांच्यासाठी थैल्या रित्या केलेले अंबांनी, अडाणींपासून अनेक भांडवलदार मोदींचा शेवटच्या टप्प्यातील मार्ग सुकर व्हावा यासाठी प्रयत्नांची शर्थ करतील यात काहीच शंका नाही. कारण मोदी जर पंतप्रधान झाले नाहीत तर मोदी हे पक्षात जसे अडचणीत येतील तसेच हे उद्योगपती आर्थिकदृष्ट्‌या अडचणीत येतील. कारण त्यांनी मोदी शंभर टक्के येणारच असे गृहीत धरुन केवळ मोदींवरच पैसे लावले आहेत. त्यामुळे अन्य पक्षांची नाराजी त्यांनी ओढावून घेतली आहे. ही नाराजी त्यांना भावी काळात उद्योगधंदे करताना परवडणारी नाही. त्यामुळे ज्यांनी केवळ मोदींवरच पैसे लावले आहेत त्यांना मोदी येण्यासाठी पुढील काळात अजून पैसा टाकावा लागेल. जर पैसा ओतूनही मोदी पंतप्रधानपदी येऊ शकले नाहीत तर तिसर्‍या पर्यायाचा मार्ग मोकळा होईल. अर्थात यात गेली कित्येक वर्षे पंतप्रधानपदाचे स्वप्न उराशी बाळगून असलेले शरद पवार यांचा देशाच्या पंतप्रधनपदी पोहोचण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो. सर्व पक्षात मैत्री व मोदींसारखी भांडवलदारांशी दोस्ती असलेले शरद पवार हे एकमेव उमेदवार आहेत. गेल्या काही दिवसात शरदरावांनी सातत्याने मोदींविरोधात जी विधाने केली आहेत ती याच धोरणाचा भाग ठरावा. मोदींच्या मंत्रिमंडळात राहून एखादे मंत्रिपद धेऊन किंवा फारफारतर उपपंतप्रधानपद स्वीकारुन आपण जातीयवादी पक्षांशी सत्तेसाठी हातमिळवणी केली असा शिक्का मारुन घेणे पवार पसंत करणार नाहीत. त्यापेक्षा पंतप्रधानपदी आरुढ होणे केव्हांही पवारांसाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. एक तर पवारांना कॉँग्रेस बाहेरुन पाठिंबा देऊ शकेल. तिसरी डावी आघाडी शरद पवारांच्या मागे ठामपणे उभी राहिल. त्याचबरोबर अन्य प्रादेशिक पक्ष पवारांना आपल्या पाठीशी उभे करणे काही कठीण जाणार नाही. मराठी पंतप्रधान होतोय असा अंदाज आल्यावर शिवसेना व मनसे देखील शरद पवारांना पाठिंबा देईल. ही सर्व मोट बांधण्याची उत्तम क्षमता शरद पवारांची आहे. त्याचबरोबर त्यासाठी लागणारा पैसा उभा करण्याची क्षमताही आहे. उद्योग क्षेत्रात पवारसाहेबांचे मोदींच्याच एवढे उद्योगपती दोस्त आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे मोदींवर ज्या भांडवलदारांनी पैसा लावला त्यांना जर निकालानंतर स्पष्ट जाणवले की मोदी पंतप्रधान होत नाहीत तर त्याजागी दुसरा पर्याय म्हणून ते शरद पवारांचे नाव आनंदाने स्वीकारायला तयार होतील. अर्थात हे सर्व जर तरचे झाले. कारण मोदी नकोत हा नारा ज्या गतीने दिल्लीत गेल्या काही महिन्यांपासून फिरतो आहे ते पाहता जर भाजप बहुमताच्या जवळ पोहोचला तरच मोदी पंतप्रधान होतील. मोदी नको हा नारा आता वेग घ्यायला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत शरद पवार, जयललिता, नितिशकुमार, ओरिसाचे पटनाईक, कदाचित राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे आपापल्या दृष्टीने पंतप्रधानपदासाठी फिल्डिंग लावून तयार आहेत. यातील कोण यशस्वी होणार याची रुपरेषा निकालाच्या दिवशी हळूहळू स्पष्ट होऊ लागेल.

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel