-->
गुरुवार दि. १ मेच्या अंकासाठी चिंतन
--------------------------------------------------
मद्रास शेअर बाजाराची अखेरची घटका
------------------
देशातील ७६ वर्षांपूर्वीचा मद्रास शेअर बाजाराने काल अखेरची घटका मोजली. पाऊंड शतक कार्यरत असलेला हा शेअर बाजार म्हणजे एकेकाळी दक्षिणेतील आघाडीचा बाजार म्हणून प्रसिद्ध होता. मद्रास शेअर बाजाराचे दरवाजे आता बंद झाल्याने दक्षिणेतील कॉर्पोरेट क्षेत्रातील इतिहासातील एक महत्त्वाचा साक्षीदार आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. ब्रिटिशांच्या काळात एका वडाच्या झाडाखाली सुरु झालेल्या मुंबई शेअर बाजाराला आता दीडशेहून जास्त काळ लोटला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या अधिकृत स्थापनेनंतर अहमदाबाद, मद्रास, कलकत्ता हे शेअर बाजार सुरु झाले होते. त्याकाळी शेअर बाजारातील गुंतवणूकदार हा अतिशय मर्यादित होता. पारशी, गुजराती व मारवाडी समाजातील काही मोजके दलाल व त्यात गुंतवणूक करणारे श्रीमंत लोक असा शेअर बाजारांचा संसार होता. त्याकाळी समभागात गुंतवणूक करणारे एक तर श्रीमंत लोक होते किंवा त्यावर सट्टा खेळणारे लोक होते. मात्र, त्यांची संख्या मर्यादितच होती. सर्वसामान्य लोकांना तर शेअर बाजार हा सट्टाच वाटे. काही दृष्ट्या ते खरेच आहे; परंतु पूर्णतः खरे नव्हे. ८०च्या दशकात सर्वसामान्य लोक शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास पुढे येऊ लागले. मात्र, नव्वदीनंतर ज्यावेळी आपल्याकडे मध्यमवर्गीयांच्या हातात पैसा खुळखुळू लागला, त्यावेळी खर्‍या अर्थाने सर्वसामान्य लोकांना गुंतवणुकीचे हे दालन समजले. देशातील या चार प्रमुख शहरात शेअर बाजार सुरु झाले. कारण, ही शहरे औद्योगिकदृष्ट्या पुढारलेली होती आणि येथील कंपन्यांना भांडवल उभारणीचे महत्त्वाचे काम या शेअर बाजारांच्या मार्फत करणे सोपे झाले. मद्रास शेअर बाजाराचा त्याकाळी संपूर्ण दक्षिण भारतात कंपन्यांना भांडवल उभारणी करुन देण्यात मोलाचा वाटा होता. तसेच दक्षिणेतील अनेक कंपन्यांनी आपले एक चांगले नाव व दर्जा राखला होता. यातून मद्रास शेअर बाजाराची भरभराट झाली व देशातील आघाडीच्या पाच शेअर बाजारांत त्याचा समावेश झाला. ८०च्या दशकानंतर शेअर बाजाराचे स्वरुप हळूहळू पालटू लागले. तर ९०च्या दशकात डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक सुधारणा सुरु झाल्या आणि देशातील उद्योगांचे रुपडेच हळूहळू पालटायला सुरुवात झाली. आर्थिक उदारीकरण सुरु होईपर्यंत मुंबई शेअर बाजार हा देशातील एक आघाडीचा समजला जाई. त्या शेअर बाजाराचा तसा दबदबाही होता. मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सवर संपूर्ण शेअर बाजारातील समभागांची हालचाल टिपली जाई. मुंबई शेअर बाजाराप्रमाणे देशात असे पंधरा शेअर बाजार होते. ते स्थानिक पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावित. परंतु, आर्थिक उदारीकरणानंतर राष्ट्रीय शेअर बाजार स्थापन झाला आणि देशातील शेअर बाजारांचे स्वरुपच बदलले. राष्ट्रीय शेअर बाजाराने केवळ मुंबईच नव्हे तर, देशातील सगळ्याच शेअर बाजारांपुढे आव्हान उभे केले. आधुनिकता हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा पाया होता. त्यामुळे त्याच्या आगमनानंतर सर्वच शेअर बाजारांचे धाबे दणाणले. मुंबई शेअर बाजाराची शंभराहून जास्त वर्षे असलेली मक्तेदारी संपुष्टात आली. राष्ट्रीय शेअर बाजारात सर्वात प्रथम संगणकावर सौदे सुरु झाले आणि देशातील कोणत्याही कोपर्‍यातून त्याचे व्यवहार करणे शक्य झाले. यामुळे स्थानिक पातळीवरील अनेक शेअर बाजारांचे अस्तित्व धोक्यात आले. राष्ट्रीय शेअर बाजारात सर्व व्यवहार संगणकावर होत असल्याने त्यात पारदर्शकता होती. फसवणूक होण्याची काडीमात्र शक्यता नव्हती. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांची पावले राष्ट्रीय शेअर बाजाराकडे वळणे स्वाभाविकच होते. यातून मुंबई शेअर बाजाराची मक्तेदारी मोडीत निघाली व राष्ट्रीय शेअर बाजार पहिल्या क्रमांकावर गेला. तसेच लहान-मोठ्या शहरातील शेअर बाजारही बंद पडू लागले. काळाच्या ओघात तसे होणे क्रमप्राप्त होते. याच क्रमात मद्रास शेअर बाजारही बंद झाला. देशातील दक्षिणेतील कंपनी इतिहासातील एक महत्त्वाचा दुवा काळाच्या पडद्याआड गेला आहे.

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel