-->
संपादकीय पान शनिवार दि. २६ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
मतदानाचा सार्वत्रिक उत्साह
----------------------------
देशातील नऊ टप्प्यात होणार्‍या लोकसभा निवडणुकीतील सहा टप्पे पार झाले आहेत. महाराष्ट्रातील हा तिसरा व शेवटचा टप्पा. यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ प्रत्येक ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. एकूणच लोकांच्या मनात मतदानाबाबत उत्साह दिसून आला. तापमान ३६ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोचून कडक उन्हामुळे अंगाची काहिली होत असल्याने राज्यातील १९ मतदारसंघांत कितपत मतदान होईल, अशी शंका व्यक्त होत होती. पण मतदारांनी ती फोल ठरवत आपले कर्तव्य बजावले, ही स्वागतार्ह बाब म्हटली पाहिजेे. निवडणूक आयोग, विविध स्वयंसेवी संस्था यांनी मतदार जागृतीचे बरेच उपक्रम राबविले. त्याचे हे फलित म्हणता येईल; परंतु त्याहीपेक्षा आपल्या भवितव्याविषयी लोकांमध्येच जागरूकता वाढत असल्याचे हे निदर्शक आहे. या वाढलेल्या टक्केवारीची कारणमीमांसा आता वेगवेगळ्या अंगांनी केली जाईल; परंतु एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, ती म्हणजे एरवी दिवाणखान्यातील चर्चांमध्ये उत्साहाने रस घेणारा; पण कृतीच्या पातळीवर उदासीन असणारा वर्ग या वेळी मात्र मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसले. लोकांमधील वाढत्या आशा-आकांक्षांचा हा परिपाक असू शकतो. विशेषतः मुंबई, ठाण्यासारख्या महानगरांत हे प्रकर्षाने दिसले. मुंबईसारख्या महानगरात नेहमीच कमी मतदान होते. परंतु यावेळी मुंबईनेही चांगलीच टक्केवारीत बाजी मारली. रायगडमध्ये ६४ टक्क्यांवर मतदानाची पोहोचलेली टक्केवारी आश्‍चर्यकारकच होती. नाशिक, दिंडोरी, तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर, धुळे या मतदारसंघांत कडक उन्हातही लोकांनी यंदा मतदानात सकाळपासून आघाडी घेतली होती. मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना मतदारसंघांमध्येही उन्हाची पर्वा न करता मतदानासाठी लोक घराबाहेर पडत होते. देशातील ११ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघांमध्येही प्रचंड मतदान झाले आहे. लोकांमध्ये उत्साह असतो, तेव्हाच मतदानाचे प्रमाण वाढते आणि बदल व्हावा, असे मनापासून वाटत असते, तेव्हाच तो उत्साह दिसतो. बदल नको असेल, तर उत्साहाने लोक मतदान करीत नाहीत, असे मानले जाते. मात्र कोणत्या वस्त्यांमध्ये मतदान अधिक होते, यावरही बरेच काही अवलंबून असते. या वेळी मतदान वाढण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले. मात्र मतदार याद्यांबाबतचा दरवेळी असलेला घोळ यावेळीही झाला. मुंबई, ठाण्यातून सुमारे सात लाख लोकांची नावे गायब असल्याची धक्कादायक आकडेवारी हातात आली आहे. एकीकडे आपण इलेक्ट्रॉनिक्स यंत्राव्दारे मतदान करुन आधुनिकतेच्या बाजून एक क्रांतीकारी पाऊल टाकले. मात्र दुसरीकडे मतदार याद्यांतला घोळ काही मिटविण्यात आपल्याला यश येत नाही ही दुदैवाची बाब आहे. यासाठी निवडणूक आयोगाने काही तरी उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. यापूर्वी कधीही झाल्या नव्हत्या एवढ्या तक्रारी या वेळी झाल्या आहेत, या वास्तवाकडे डोळेझाक करता येणार नाही. आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या अन्य सुविधा समाधानकारक होत्या, याचाही आवर्जून उल्लेख करायला हवा. मतदाराला आपले नाव यादीत आहे काय, मतदान केंद्र कोणते आहे, हे मोबाईलवर वा इंटरनेटद्वारे कळण्याची सोय करण्यात आली होती. असंख्य मतदारांना त्याची माहिती देणारी पत्रिका घरापर्यंत पोचवली गेली. महाराष्ट्रात ५७ लाख मतदारांची नावे यादीतून गाळण्यात आल्याने सर्व ठिकाणांहून असंख्य तक्रारी आल्या. उमेदवारांच्या खर्चावर बंधने असली, तरी उमेदवार व राजकीय पक्षांनी प्रचारावर कोट्यवधी रुपये ओतले. हा पैसा कोठून येतो, याचीही चौकशी व्हायलाच हवी. मात्र उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये प्रचाराच्या निमित्ताने नेत्यांनी जशी प्रक्षोभक आणि समाजात विद्वेष बसवणारी भाषणे केली, तसे महाराष्ट्रात अपवादानेच घडले. वादग्रस्त विधाने झाली, आरोप-प्रत्यारोप झाले आणि ते होतच असतात. पण समाजात विद्वेषाचे वातावरण निर्माण झाल्यास त्याचे दीर्घकाळ वाईट परिणाम होतात. महाराष्ट्राची प्रागतिक राज्य ही प्रतिमा अद्याप शाबूत असली, तरी टोकाचा अभिनिवेश आणि त्यातून येणारी आक्रमकता अशा स्वरूपाच्या राजकीय शैलीला अलीकडे एक वलय प्राप्त होऊ लागल्याचे दिसते आहे आणि हा प्रवाह त्या प्रतिमेला तडा देऊ शकतो, हा धोकाही लक्षात घ्यायला हवा. आपल्याकडे ८० कोटी मतदारांसाठी ऐवढी मोठी मतदानाची यंत्रणा उभारणी ही काही सोपी बाब नाही. त्यासाठी असलेली यंत्रणा, सुरक्षितता या सर्व बाबी वाखाणण्याजोग्याच आहेत. आपल्याकडे सरकारी यंत्रणा ढिम्म असते असे नेहमीच म्हणले जाऊन हा एक चर्चेचा विषय असतो. मात्र सरकारी यंत्रणा एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रभावीपणे कशा प्रकारे राबविता येऊ शकते हे देखील यातून सिध्द झाले आहे. यावेळी वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, याबाबत आता तर्क विर्तक लढविले जात आहेत. काहींच्या मते ही मोदींची लाट आहे त्यामुळे जास्त मतदान झाले आणि त्याचा फायदा भाजपाला होईल. तर काहींच्या मते कॉँग्रेसला वाढीव मतदान होईल. या सर्व अंदाजांचे बिंग १६ मे रोजी फुटेलच. मात्र एक बाब स्पष्ट आहे की, मतदान वाढले की, कॉँग्रेसला कधीच फायदा होत नाही. कारण लोक ज्यावेळी त्वेषाने मतदानाला मोठ्या संख्येने बाहेर पडतात त्यावेळी ते आपला राग सत्ताधार्‍यांवर काढण्यासाठी मतदान करतात. परंतु यावेळी मोदींना त्या रोषाचा कितपत फायदा उठविता येणार आहे हा देखील एक सवाल आहे. मोदींची मुस्लिम विरोधाची जी एक प्रतिमा आहे त्यामुळे ते देशातील सर्व समाजाला बरोबर घेऊन जाऊ शकत नाहीत, ही त्यांची प्रतिमा भेदून त्यांना मतदान होईल का, हा सवाल आहे.

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel