-->
संपादकीय पान बुधवार दि. २ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
------------------------------------
सेलिब्रेटी झाले राजकारणमय
------------------------
सेलिब्रेटी प्रामुख्याने बॉलिवूडमधील सेलिब्रेटी हे राजकारणात उतरण्याची ही काही पहिली वेळ नाही. राजकारणाचा फड अनेक कलाकारांनी गाजविला आहे आणि त्यात यशस्वी वाटचालही केली आहे. तर काही जणांनी यातून ते ज्या गतीने प्रवेश केला त्याच गतीने माघारी गेले आणि पुन्हा कलाकार म्हणून वावरु लागले. त्यामुळे सेलिब्रेटी ाहोत म्हणून ते कलाकार वा खेळाडू राजकारणात यशस्वी झालेच असे नव्हे. त्यांना राजकारणात प्रवेश करताना त्यांच्या सेलिब्रेटी असल्याचा जरुर फायदा झाला. मात्र एक सेलिब्रेटी म्हणून ते राजकारणात यशस्वी होतीलच याची खात्री देता येत नाही. सुनिल दत्त हे मात्र सिनेकलाकार म्हणून जेवढे लोकप्रिय झाले तेवढेच लोकप्रिय एक राजकारणी म्हणूनही झाले. कॉंग्रसेच्या तिकिटावर तीन वेळा खासदार म्हणून निवडून आल्यावर त्यांनी मुंबईसारख्या झोपडपट्टी असलेल्या भागात अनेक विकास कामे केली होती. कधी गरज पडल्यास त्यांनी पदरचे पैसे मोडूनही समाजकारण केले. सुपरस्टार सिनेनट राजेश खन्ना यांनी देखील कॉँग्रेसच्या तिकिटावर दोनदा निवडणूक लढविली होती. त्यात त्यांना एकदा यश आले आणि त्यांनी संसदेत पाऊल टाकले परंतु ते राजकारणात आपला काही ठसा उमटवू शकले नाहीत. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची त्याकाळी असलेली गांधी घराण्याशी असलेली जवळीक पहाता त्यांनी ९०च्या दशकात राजीव गांंधी पंतप्रधान असताना राजकारणात प्रवेश केला होता. परंतु बच्चन देखील येथे फार काळ चमकू सकले नाहीत. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपले पाय चित्रपटसृष्टीकडे वळविले आणि राजाकारण सन्यास घेतला. उत्तर मुंबईतून गोविंदा यांनी निवडणूक लढवून भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांना पाडण्याचे एतिहासिक काम केले. परंतु गोविंदाची संसदेतील कामगिरी निराशाजनकच होती. पुढच्या वेळी त्यांनी जर निवडणूक लढविली असती तर त्यांना मतदारांनी धूळ चारली असती. तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता, एम.जी. रामचंद्रन, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी.आर. हे सर्व त्या राज्यातले गाजलेले सिने कलाकार होते. या सर्वांची परंपरा पाहता सिलिब्रेटींचा राजकारणातील प्रवेश हा त्यांच्या एखाद्या चित्रपटातील यशाप्रमाणेच असतो. एखादा चित्रपट चालला तर चालला नाहीत तर डब्यात गेला. याच धर्तीवर राजकारणात यश मिळाले तर उत्तमच नाही तर पुन्हा सिनेसृष्टी आहेच. यावेळी देखील लोकसभा निवडणुकीत सर्व पक्षातून एकूण दोन डझन सेलिब्रेटी आपले नशिब आजमावित आहेत. यात अभिनेत्री नगमा मेरठ मधून कॉँग्रेसच्या तिकीटावर उभ्या आहेत. तर आम आदमी पक्षाच्या वतीने चंदीगढमधून गु पनाग या ९९ सालच्या मिस इंडिया उभ्या आहेत. मुंबईतून मनसेच्या तिकिटावर बॉलिवूड कलाकार महेश मांजरेकर पहिल्यांदा निवडणूक लढवित आहेत. संगीतकार भप्पी लहरी (भाजपा), अर्पीता घोष (तृणमूल कॉँग्रेस), रवी किशन(कॉँग्रेस), गायक बबूल सुप्रियो (भाजपा), विश्‍वजीत (तृणमूल), जॉर्ज बेकर (भाजपा), तपस पाल (तृणमूल), सौमित्र रॉय (तृणमूल), जादुगार पी.सी. सरकार (भाजपा), बंगाली गायक इंद्रनील सेन (तृणमूल), भोजपुरी कलाकार मनोज तिवारी (भाजपा), किरण खेर (भाजपा), मूनमून सेन (भाजपा), बंगाली कलाकार देव (तृणमूल), हॉकी खेळाडू  दिलीप ट्रिकी (भाजपा), क्रिकेटपटू मोहमंद कैफ (कॉँग्रेस), फूटबॉलपटू प्रसून बॅनर्जी (तृणमूल), फूटबॉलपटू भांगचूक भूतिया (तृणमूल), परेश रावल (भाजपा), संध्या रॉय (तृणमूल) अशा सेलिब्रेटींचा समावेश आहे. यावेळी भाजपा व तृणमूल कॉँग्रेसने जास्तीत जास्त सेलिब्रेटींना चान्स देण्याचे धोरण अवलंबिलेले दिसते. परंतु कोणताही सेलिब्रेटी तो कोणत्या पक्षाच्या तिकिटावर उभा आहे याला फारसे महत्व नसते. कारण तो त्याच्या लोकप्रियतेच्या जीवावर निवडून येत असतो. यावेळी यातील किती जण संसदेत पाऊल ठेवतात ते पहायचे.
-------------------------------------------
 

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel