-->
पंतप्रधानांची दर्पोक्ती

पंतप्रधानांची दर्पोक्ती

संपादकीय पान गुरुवार दि. २१ मे २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पंतप्रधानांची दर्पोक्ती
भ्रष्टाचाराचा नि:पात, विकास, अच्छे दिन आदी स्वप्नांचे तमाम भारतीयांना गाजर दाखवून बरोबर वर्षभरापूर्वी सत्तेवर आलेले नरेंद्र मोदी यांनी चीन आणि दक्षिण कोरियात केलेल्या कथित भारतविरोधी वक्तव्यांवरून त्यांच्यावर सध्या ट्विटरवर टीकेची लाखोली वाहिली जात आहे. मोदी इन्सल्ट्स इंडिया या हॅशटॅगवर यासंबंधी मंगळवार संध्याकाळपर्यंत तब्बल ३८ हजार टीकात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक अनिवासी भारतीयांनीही नाराजी नोंदविली आहे. भारतीय असल्याचा आम्हाला कायमच अभिमान होता आणि आहे, परंतु अशी वक्तव्ये करून तुम्ही आमचा, आधीच्या पिढ्यांचा आणि भारतीय संस्कृतीचाही अपमान केला आहे, अशी तिखट प्रतिक्रिया ट्विटरवर उमटत आहे. गेल्या जन्मी काहीतरी पाप केले म्हणून आपला भारतात जन्म झाला, असे आधी लोकांना वाटत असे. हा काय देश आहे, हे काय सरकार आहे, चला देश सोडून जाऊ, असे त्यांना वाटत असे. परंतु वर्षांनतर आता परिस्थिती बदलली असून त्यांना आता भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. लोकांना परिवर्तन हवे होते, ते झाले आणि त्यामुळेच अभिमान वाटतो, अशी दर्पोक्ती मोदी यांनी भारतीय समुदायासमोर भाषण करताना केली होती. सोल येथेही मोदी यांनी आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला. त्यावर महाराणा प्रतापलाही मोदी पंतप्रधान होईपर्यंत देशाचा अभिमान वाटत नव्हता, असा सणसणीत टोला ट्विटरकरांनी हाणला आहे. विकासाचे स्वप्न दाखवून मोदी यांनी सत्ता काबीज केली. परंतु आजही देशभरातील वीज समस्या, चांगल्या रस्त्यांचा अभाव, भ्रष्टाचार आदी मुद्दे तसेच कायम असून वर्षभरात फारसा फरक पडलेला नाही. मोदी यांनी परदेश दौरे करूनही भारतात परदेशी गुंतवणूक होऊ शकलेली नाही किंवा कामगारांची आंदोलनेही कायम असून एकूण परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही, असा शेरा चीनच्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने मारला होता. नरेंद्र मोदी यांचे विदेशातील वक्तव्य भारतीय पंतप्रधानाला निश्‍चितच साजेसे नाही, असेच खेदाने म्हणावे लागते. मोदींच्या या वक्तव्यावर जगातून तसेच देशातून निषेध व्यक्त होऊ लागला आहे. जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांनी यावर उत्कृष्ट भाष्य केले आहे. ते म्हणतात- मी इंग्लंडमध्ये जन्मलो, पण भारतीयत्व स्वीकारले आणि प्रधानमंत्री जी जगभर फिरताना मला माझा भारतीय पासपोर्ट दाखवायला कधीही लाज वाटली नाही. अर्थात अशा प्रकारे विदेशात जाऊन एखाद्या पक्षावर आडून वा थेट टिका करणे किंवा यापूर्वीच्या सरकारवर टीका करणे असे मोदींचे वागणे आता काही नवीन राहिलेले नाही. त्यामुळे लाज जाते ती आपल्या देशाची. कोणत्याही देशाचा पंतप्रधान हा त्या देशाचे नेतृत्व करीत असतो. त्याने सर्व समुदाय, सर्व पक्ष यांना बरोबर घेऊन जात आहोत असे वागले पाहिजे. प्रामुख्याने परदेशात जाऊन भारताचा प्रतिनिधी म्हणून नेतृत्व करीत असताना हे बंधन पाळणे अत्यंत जरुरीजे असते. परंतु नरेंद्र मोदी अजूनही आपला हेकट स्वभाव काही सोडायला तयार नाहीत. यापूर्वी देखील मोदींनी आपल्या विदेश दौर्‍यात कॉँग्रेस व यापूर्वीच्या सरकारवर टीका केली होती. अशा प्रकारे देशाच्या पंतप्रधानाने टीका करणे योग्य नव्हे, त्यामुळे आपल्या देशाविषयी चुकीचा संदेश जातो, याबाबत मोदींचे प्रबोधन झाले पाहिजे. यापूर्वीच्या कॉँग्रेसच्या सरकारने अनेक चुका केल्याही असतील परंतु त्या चुका मांडून पंतप्रधानांनी विदेशात त्यांची बदनामी करणे हे व्यासपीठ चुकीचे आहे. राहूल गांधी यांनी अलिकडेच सुमारे ६० दिवस सुट्टी घेऊन विदेशात विपश्‍चना करावयास गेले होते. त्यावर टीका करताना मी सुट्टी न घेता काम करतो असे पंतप्रधानांनी सांगणे शिष्टाचाराला धरुन नाही. राहूल गांधी यांनी किती काळ सुट्टी घेणे, अशा प्रकारची सुट्टी घेणे योग्य की अयोग्य हा कॉँग्रेस पक्षाचा प्रश्‍न आहे. त्यावर टीका करावयाची असल्यास मोदींनी देशात राजकीय मंचावर जरुर करावी. परंतु विदेशात अशा प्रकारे टीका करुन देशातील भांडणे चव्हाट्यावर आणणे  देशहिताचे नाही. कारण पंतप्रधानांच्या अशा वागण्यामुळे देशाची पत घसरणारच आहे. एक तर मोदी यांची प्रतिमा गुजरात दंगलींमुळे मलिन झालेली आहे. भले ते कितीही म्हणतो आपल्यावर याबाबत न्यायालयीन ठपका नाही, परंतु मोदींवरचा हा डाग धुवून निघणे कठीण आहे. अशा पार्श्‍वभूमीवर नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यावर प्रत्येक समुहाला, प्रत्येक पक्षाला सोबत घेऊन देशाचे नेतृत्व केले पाहिजे. विरोधक कधी चुकत असतील तर त्यांना माफ करण्याचेही दारिष्ट्य दाखविले पाहिजे. नरेंद्र मोदींच्या सरकारला आता येत्या आठवड्यात वर्ष पूर्ण होत आहे. सरकारच्या बाबतीत लोकांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. अशा वेळी मोदी हे सैरभेर झाले आहेत. जनतेला अवास्तव मोठी आश्‍वासने दिली खरी परंतु त्याची पूर्तता कशी करावयची ही समस्या सरकारपुढे आहे. अशा वेळी विरोधकही जमीन अधिग्रहण कायद्यावरुन आक्रमक झाले आहेत. अशा वेळी सरकारची लोकप्रियता झपाट्याने घसरली आहे. त्यामुळे देशात व परदेशातही मोदी विरोधकांवर टीकेची झोड उठवित आहेत. ज्या सोशल मिडीयाच्या आधारे मोदी सत्तेच्या शिडीवर चढले त्याच सोशल मिडियाचने त्यांच्या विरोधात केवळ एका वर्षाच्या आतच डंका पिटायला सुरुवात केली आहे. मोदींना मिळालेला हा काव्यगत न्यायच म्हटला पाहिजे.
--------------------------------------------------------------------  

0 Response to "पंतप्रधानांची दर्पोक्ती"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel