-->
माथेरान जागतिक नकाशावर यावे!

माथेरान जागतिक नकाशावर यावे!

संपादकीय पान शुक्रवार दि. २२ मे २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
माथेरान जागतिक नकाशावर यावे!
सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या माथेरानमध्ये सध्या ग्रीन फेस्टीवलची धूम सुरु आहे. ढोल ताश्यांच्या गजरात शोभायात्रा काढून माथेरानला एक वेगळाच उत्साहाचा साज चढला होता. पाच दिवस चालणार्‍या या फेस्टिवलमुळे माथेरानला एक वेगळाच रंग चढला आहे. देशी, विदेशी पर्यटकांसाठी विविध कार्यक्रमांची मोठी रेलचेल असल्याने माथेरान आता कात टाकून आपले जुनेपण टिकवित नवे रुप धारण करीत आहे असेच यातून संदेश दिला जात होता. पाच दिवस चालणार्‍या या फेस्टिवलमध्ये माथेरानच्या मूळनिवासी असलेल्या आदिवाशी बांधवांची लोककला हे एक यातील खास आकर्षण ठरणार आहे. माथेरानमधील डंपिंग ग्राऊंडमधून बनविलेली नवीन दुनिया व त्यातून येथील तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देणे असा या ग्रीन फेस्टिवलचा मुख्य उद्देश आहे. पाच दिवसांच्या या कार्यक्रमात केवळ देशी नव्हे तर विदेशी कलाकारही झळकणार आहेत. यामुळे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आता जागतिक पातळीवर पोहोचणार आहे. मुंबईजवळचे हे थंड हवेचे असलेले ठिकाण १९५० सालापर्यंत कुणासही ठाउक नव्हते. मात्र काही आख्यायिकांनुसार शिवाजी महाराज व नेताजी पालकरांचेही येेथे अस्तित्व असल्याचे सांगितले जाते. असो, पण माथेरानचे संशोधन हे ब्रिटीशांनी केले व त्याचा विकासही त्यांनीच केला हा इतिहास आपल्या डोळ्यापुढील आहे. १८३० साली ब्रिटीश आपल्या फौजांसाठी उन्हाळ्यात विश्रांती करण्यासाठी एखाद्या ठिकाणाचा शोध घेत होते त्यावेळी मुंबईचा गव्हर्नर सर जॉन माल्कम याने माथेरानच्या डोंगराचे सर्व्हेक्षण केले. त्यानंतर माथेरानच्या या थंड हवेच्या ठिकाणाचा ब्रिटीश राजवटीत विकास होण्यास प्रारंभ झाला. आता मात्र आपल्याला या माथेरानच्या डोंगराला जगात पोहोचविण्याची एक चांगली संधी चालून आली आहे. आजवर माथेरानचा विकास झाला नाही का? तर जरुर झाला. मात्र पर्यटनांच्या दृष्टीने आपल्याला तेथे डॉलरचा खणखणाट होईल असा दृष्टीकोन ठेवून माथेरानचा विकास झाला नाही ही वस्तुस्थिती आहे. आज माथेरानमध्ये केवळ देशी नाही तर विदेशी पर्यटक खेचण्याची क्षमता आहे. यातून तेथील स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. माथेरानमध्ये चांगला पैसा खूळखूळू शकतो. आता आपल्याला माथेरानच्या सौंदर्याशी तडजोड न करता किंवा तेथील निसर्ग बोलता ठेवून आपल्याला पर्यावरणप्रिय विकास करावयाचा आहे. येथील पर्यटन वाढविण्यासाठी आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे येथील लोकांच्या मत पर्यटकांविषयी आदर निर्माण केला पाहिजे. पर्यटक म्हणजे आपण त्याला फसवून झटपट पैसे कमवू शकतो अशी येथील एजंटांची समजूत झालेली आहे. माथेरानला आलेला पर्यटक हा जाताना येथील लोकांचे जर प्रेम घेऊन गेला तरच तो पुन्हा येणार आहे याची खबरदारी सर्वांनीच घेण्याची आवश्यकता आहे. माथेरानला आल्यावर आपली लूट होते अशी समजूत पर्यटकाची होता कामा नये. पर्यटकाला चांगली सेवा देऊन त्याच्याकडून जास्त पैसे घेतले तर तो खुषीने देईल हे लक्षात घेतले पाहिजे. माथेरानच्या ट्रेनची इंजिने आता जुनी झालेेली असल्याने त्यातून ध्वनी, वायू प्रदूषण होते. माथेरानची शांतता त्यामुळे भंग पावत चालली आहे. त्यावर उपाय म्हणून माथेरानला चांगली नविनी अत्याधुनिक इंजिने मिळाल्यास माथेरानच्या सौंदर्यात भर पडेलच शिवाय पर्यावरणाचा समतोल साधला जाईल. माथेरानमधील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. अगदी साध्या रिक्षा ओढण्याचे काम मोठ्या संख्येने यवतमाळ येथील मजूर करीत आहेत. अशा प्रकारची कामे स्थानिकांना मिळाल्यास त्यांच्या रोजगाराचा प्रश्‍न मिटू शकतो. पर्यटकांकडून जास्त भाडे वसूल करण्याकडे अनेकांचा कल असतो, यावर उपाय म्हणून भाडे नियंत्रणासाठी सरकारने काही तरी पावले उचलण्याची गरज आहे. अगदी याबाबतचे उदाहरण सांगावयाचे झाल्यास दस्तुरीवरुन घोडे केवळ अडीज कि.मी.च्या अंतरासाठी ३०० ते २००० रुपये आकारतात. रेल्वे स्वस्त असली तरीही अमन लॉज ते माथेरान या दोन कि.मी.च्या अंतरासाठी एका वेळेला ४५ रुपये आकारले जातात. रिक्षा ओढणार्‍या लोकांचे काम कष्टाचे असले तरीही ते अडीज कि.मी.च्या अंतारासठी ३०० ते २००० रुपये आकारतात. नव्याने आलेल्या पर्यटकाला आपली फसवणूक झाल्याची भावना याव्दारे होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी रेल्वे, घोडे, रिक्षा चालकांसाठी दर निश्‍चिती करणे आवश्यक आहे. अनेकदा पर्यटक नव्याने आलेला आहे हे लक्षात य्ेताच घोडेवाले सर्व पॉईंटस न दाखविता काही थातूरमातूर दाखवून पर्यटकांची बोळवण करतात. अशा प्रकारची फसवणूक थांबली पाहिजे. तसेच माथेरानच्या पर्यटनाला हातभार लागण्यासाठी माथेरानचे सृष्टीसौंदर्य जपले गेले पाहिजे. अलिकडेच रेल्वेने प्लॅटफॉर्मच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली व उत्खनन केले. माथेरान हा इको सेन्सिटिव्ह झोन असताना हे घडते कसे याचा विचार झाला पाहिजे. तसेच येथील घोड्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्याचीही गरज आहे. कारण घोड्यांच्या मल-मूत्रामुळे अनेक झाडे मरतात. ज्या घोडेवाल्यांकडे घोड्यांना ठेवण्यासाठी शेड किंवा निवारा आहे त्यांनाच परवानगी दिली जावी. अशा प्रकारे माथेरानचे सौंदर्य खुलविण्यासाठी अनेक बाबी करता येतील. मात्र तसे करण्यासाठी माथेरान नगरपरिषदेने व राज्य प्रशासनाने त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. माथेरानसारखे देखणे पर्यटन स्थळ जर जागतिक नकाशावर पोहोचले तर येथील चित्र पालटू शकते. पर्यटनातून आपण विकास कसा साध्य करु शकतो हे माथेरानला दाखविण्याची संधी आहे. सध्या सुरु असलेला ग्रीन फेस्टिवल हा त्यादृष्टीने एक पाऊल पुढचे ठरावा.
--------------------------------------------------------

0 Response to "माथेरान जागतिक नकाशावर यावे!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel