-->
कोरोना संपलेला नाही...

कोरोना संपलेला नाही...

24 ऑक्टोबर २०२१ च्या मोहोरमधील चिंतन कोरोना संपलेला नाही... आपल्याकडे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी होऊ लागल्याने नागरिकांना बऱ्यापैकी दिलासा मिळत आहे, जनजीवन पुर्ववत होण्याच्या दृष्टीने पावले आता हळूहळू पडू लागली आहेत. आपण १०० कोटी लसींचा टप्पा पूर्ण केला यात फुशारकी मानण्याची गरज नाही. कारण अजूनही आपल्याला दीडशे कोटी लसी उपलब्ध करावयाच्या आहेत. त्यानंतर लागल्यास प्रत्येकाला बुस्टर डोस द्यावा लागणार आहे. शाळा टप्प्याटप्प्याने सुरु होत आहेत, नाट्यगृहे, थिएटर्स देखील काही निर्बंधांसाह सुरु होत आहेत. मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन्स देखील लसीकरण झालेल्यांसाठी खुल्या झाल्या आहेत. आता ७० टक्के कामाकाज सुरु झाले असे म्हणावयास हरकत नाही, अशी स्थिती आहे. मात्र सर्व खुले होताना आता कोरोना संपला असे म्हणून चालणार नाही. कारण चीनमध्ये पुन्हा नवीन लाट जोरात आल्याने पुन्हा सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे आपल्याकडेही चीनप्रमाणे कोरोना कधीही वाढण्याचा धोका कायम आहेच. आपल्याकडे तिसरी लाय येण्याची शक्यता मावळली असली तरीही जर लाट आलीच तरी त्याची तीव्रता फारशी नसेल असे दिसते. मात्र आता चीनमध्ये नव्याने कोरोनाचा उद्रेक झाल्याने आपल्यावर कोरोनाची टांगती तलवार ही असणारच आहे. त्यामुळे अजूनही प्रत्येक वेळी सावधरित्या पावले उचलण्याची गरज आहे. गेल्या महिन्यात कोरोना कमी होऊ लागल्यावर निर्बंध उठविण्याची मागणी जोर धरु लागली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी निर्बंध उठविण्याची घाई दाखविलेली नाही, हे चांगले झाले. राज्यातील बहुतांशी भागात जनजीवन सुरळीत झाले आहे, मात्र लॉकडाऊनसारखे कडक निर्बंधही आता नाहीत. अनेक भागात कागदावर निर्बंध असले तरीही त्यात बऱ्यापैकी शिथीलता आलेली आहे. पहिली लाट संपत आल्यावर सरकारने आपलीच पाठ थोपटून घेतली. पाच राज्यात निवडणुका घेतल्या, लाखोंच्या संख्येने लोक सभांना उपस्थित होते. त्यानंतर कुंभमेळा झाला त्यात १५ लाखाहून जास्त हिंदू भक्त सहभागी झाले होते. याचा परिणाम म्हणून कोरोना झपाट्याने वाढला व परिस्थिती एवढी भयानक झाली की, मृतांची शव जाळायला जागा नव्हती. शेवटी लोकांना आपल्या आप्तांची शव गंगेत टाकण्याशिवाय काही पर्याय राहिला नाही. असी भयानक अवस्था देशात होती. कोरोनामुळे अनेकांचे हाल झाले हे नाकारता येत नाही. मुंबईसारख्या महानगरात लोकल सेवा नसल्यामुळे लोकांचे जीवन कष्टमय झाले, हे वास्तव कुणी नाकारु शकणार नाही. पहिली लाट ओसरु लागल्यावर लोकल बहुतांशी लोकांसाठी खुली झाली आणि त्यातील गर्दीतूनच दुसरी
लाट आली. त्यामुळे यावेळी अनेक निर्बंध सैल केलेले नाहीत त्यामागे सरकारचा काही दुष्ट हेतू नाही तर तज्ज्ञांच्या समितीनेही त्यासंबंधी सल्ला दिला आहे. लोकांना आता कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांचा कंटाळा आला आहे, हे खरे असले तरीही सध्याच्या स्थितीत आपल्याला मुक्तपणे वावरण्यास मुभा देणे म्हणजे कोरोनाला पुन्हा आमंत्रण देण्यासारखेच आहे. अजूनही आपल्याकडे निर्बंध हे प्रत्याकाने बाळगण्याची आवश्यकता आहे. गेल्या दीड वर्षात लोक कंटाळले आहेत. अनेकांना घरात बसून काम करावे लागत आहे, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. ज्यांचे वय निवृत्तीच्या जवळ आहे त्यांना पुन्हा नोकरी मिळणे अवघड झाले आहे. अशा स्थितीत लोकांना घरातून बाहेर पडावयाचे आहे, कामासाठी बाहेर पडावयाचे आहे किंवा चेंज म्हणून बाहेर जायचे आहे. मुंबईतील उच्च मध्यमवर्गीय आता शनिवार-रविवारी रिसॉर्टमध्ये जात आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळी गर्दी वाढते आहे. परंतु गर्दी वाढली की कोरोनाचा धोका वाढला हे नक्की. महामारीचा आजवरचा दोन शतकांचा इतिहास पाहता सरासरी महामारी संपायला दोन ते तीन वर्षे लागतात. गेल्या १९१९-२० सालच्या स्पॅनिश फ्ल्यूच्या महामारीत तब्बल तीन वर्षे जीवन ठप्प होते व त्यात पाच कोटी लोकांचे जीव गेले होते. त्यात आपल्या देशातील दीड कोटी लोक मरण पावले होते. त्यापेक्षा यावेळच्या महामारीत लस केवळ एका वर्षात बाजारात आल्याने कोरोनाची लढाई सोपी झाली आहे. महामारीवर कशा प्रकारे नियंत्रण मिळविता येते, याचे उत्तर सरळ आहे. एक तर कोरोनाचे विविध म्युटंटस तयार होऊन त्याची क्षमता कमी होते असा अनुभव आहे. त्यातून ही महामारी संपू शकते. परंतु यावेळी कोरोनाचे विषाणू वाढत चालले असताना ते अधिक धोकादायक होत चालले आहेत. दुसरे म्हणजे, लोकांना कोरोना होऊन त्यातून जनतेच्या शरीरात अँन्टीबॉडीज तयार होतात. त्यातून ही महामारी संपू शकते. परंतु अजूनही सर्व जनतेत अँन्टीबॉडीज तयार व्हायला प्रदीर्घ काळ लागेल. ७० टक्के जनतेला कोरोना झाल्यावर ही परिस्थिती निर्माण होईल व त्यातून कोरोनाचा प्रभाव कमी होईल. तिसरी महत्वाची बाब म्हणजे, कोरोनावरील लस दिल्यास सर्वांच्या शरीरात अँन्टिबॉडिज तयार होतील व त्यातून ही महामारी संपेल. सध्या ज्या देशांमध्ये ६० टक्के जनतेचे लसीकरण झाले आहे त्यांनी लॉकडाऊन उठविण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर ज्यांना कोरोना होतो त्यातील फारच अल्प प्रमाण हे लस घेतलेल्यांचे आहे. त्यामुळे सध्याच्या काळात लसीकरण करणे हाच एक प्रभावी उपाय ठरणार आहे. आपल्याकडे लसीकरणाने आता कुठे वेग घेतला आहे. १०० कोटींचा लसीकरणाचा टप्पा आता पार झाला आहे, हे खरे असले तरीही सरकारने न्यायालयात सर्वांना लसीकरण करण्याचे उदिष्ट डिसेंबर असल्याचे जाहीर केले होते. या लक्ष्याच्या आपण अजूनही बरेच मागे आहोत. आपल्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या चीनने जवळजवळ एक अब्ज लोकांचे लसीकरण आपल्याअगोदर तीन महिने पूर्ण केले आहे. लसीकरण झपाट्याने करणे हेच एकमेव कोरोनावरील उत्तर ठरु शकते. त्याच्याबरोबर वैयक्तीक पातळीवर सावधानगिरी अजूनही बराच काळ बाळगणे आवश्यक ठरणार आहे. शेवटी या महामारीने जात, धर्म, पंथ यातील कोणालाही वगळले नाही. आपल्याला शेवटी विज्ञानानेच तारले आहे. त्यामुळे शेवटी हा विज्ञानाचाच विजय आहे.

0 Response to "कोरोना संपलेला नाही... "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel