-->
संपादकीय पान सोमवार दि. १४ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
तटकरे, तुमचा विकास झाला, जनतेच्या विकासाचे काय?
---------------------------
जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल तटकरे यांनी गेल्या पंधरा वर्षाच्या काळात केलेल्या अशा किमान दहा योजना दाखवाव्यात की ज्यातून या रायगड जिल्ह्याच्या विकासाला मदत झाली आहे. सुनिल तटकरेसाहेबांना आम्ही हे जाहीर आव्हान देत आहोत. त्यांनी आपला स्वत:चा विकास कसा केला हाय वर्णन आम्ही गेले पंधरा दिवस या रायगडच्या जनतेच्या पुढे ठेवतच आलो आहोत. मतदान होईपर्यंतच नव्हे तर त्यानंतरही आम्ही लोकांची जागृती याबाबत करणार आहोतच. शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाड व पनवेल येथे घेतलेल्या सभांच्या झंझावाताने रायगड व मावळ मतदारसंघ आता पूर्णपणे ढवळून निघाला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषेत तटकरे यांच्यावर आणि त्यांनी केलेल्या विकासावर शरसंधान सोडले. एकीकडे तटकरेंनी केलेला हजारो करोड रुपयांचा भ्रष्टाचार, तर दुसरीकडे रायगड जिल्हा विकासापासून राहिलेला वंचित असे चित्र आज दिसते आहे. तटकरेंनी करोडो रुपयांची मालमत्ता बेनामीत आपल्या व आपल्या नोकरांच्या नावे ठेवली आहे. यातील अनेक ठिकाणी शेतकर्‍यांना फसवून त्यांच्या जमीनी लाटल्या आहेत. अनेक बोगस कंपन्या स्थापन करुन अनधिकृतरित्या जमीनी गिळंकृत करण्याचे पाप तटकरेंनी केले आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या भावा-भावात जमीनीवरुन भांडणे लावून शेवटी त्यांच्या जमीनी बळकाविण्याचा धंदा तटकरेंनी केला आहे. त्यासाठी वेळ पडल्यास पोलीस यंत्रणाही राबविण्यास तटकरे यांनी मागेपुढे पाहिलेले नाही. अशा प्रकारे फक्त स्वत:च्या विकासाचा विचार करणार्‍या तटकरेंनी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जनतेचा काय विकास केला असा प्रश्‍न उपस्थित राहातो. जिल्ह्यात खार बंदिस्तीचा जो महत्वाचा प्रश्‍न आहे त्याबाबतीत शेतकर्‍यांना पालकमंत्र्यांनी वार्‍यावरच सोडले आहे. आज अनेक भागात शेतात खारे पाणी घुसते व शेतकर्‍यांच्या शेतीचे मोठे नुकासान होते. त्यासाठी बाहेरकाढा बांधण्याची आवश्यकता असते. ज्या ठिकाणी हे बांध घातले जातात त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने अनेकदा हे बांध फुटतात व शेतीचे नुकसान होते. यात सरकारी निधीचा गैरवापर होतो. खारेपाटातील शेतकर्‍यांचा हा प्रश्‍न म्हणजे जीवनमरणाचा ठरला असून त्याकडे पालकमंत्र्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. एकीकडे शेतकर्‍यांच्या जीवनमरणाच्या या प्रश्‍नांकडे पालकमंत्री दुर्लक्ष करीत असताना जिल्ह्यातील अनेक औद्योगिक वसाहती शेवटच्या घटका मोजीत आहेत. रोह्यातील धाटाव, माणगाव येथील निळे, तळोजा, खालापूर, खोपोली येथील औद्योगिक वसाहतीत अनेक प्रकल्प बंद पडले आहेत. त्यामुळे येथे काम करणार्‍या हजारो कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड पडली आहे. हे कारखाने पुन्हा सुरु कसे होतील याकडे लक्ष देण्याएवजी नवीन पंचतारांकीत औद्योगिक वसाहती काढण्याकडे पालकमंत्र्यांचा ओढा होता. त्या पंचतारांकित वसाहती काही उभ्या राहिल्या नाहीतच आणि जुने कारखाने काही सुरु झाले नाहीत. यात पालकमंत्री रोजगार निर्मितीत मागे पडले. त्यामुळे त्यांनी रोजगार निर्मिती होण्याएवजी रोजगार कमी केले. पालकमंत्र्यांचे हे एक मोठे अपयश ठरावे. पर्यटन हा एक येथील मोठा व्यवसाय आहे. रायगडला लाभलेला समुद्रकिनारा व मुंबईपासून जवळ तसेच बोटीच्या मार्गामुळे रायगड हे पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण ठरले आहे. परंतु हा जिल्हा पर्यटनाच्या माध्यमातून विकसीत व्हावा व यातून येथील लोकांचे जीवनमान सुधारावे यासाठी तटकरेंनी काहीच प्रयत्न केले नाहीत. कुलाबा, जंजीरा, रायगड, घोसाळा, सरसगड, कर्नाळा असे इथे किल्ले आहेत. परंतु त्या किल्यांकडे पूर्णपमे दुलर्क्ष झाले आहे. त्यांची डागडुजी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पुरातन खात्यातकडे पाठपुरवठा करुन निधी उपलब्ध करता आला असता. परंतु त्यादृष्टीने एकही पाऊल पुढचे पडले नाही. महाडमध्ये पाचाड येथे रायगडाच्या पायथ्याशी भव्य शिवसृष्टी उभारण्याची पालकमंत्र्यांनी घोषणा जरुर केली. परंतु ही घोषणा हवेतच विरली. त्यादृष्टीने एकही पाऊल पुढे पडले नाही. शिवसृष्टी जर प्रत्यक्षात उतरली असती तर जिल्ह्याच्या पर्यटनाला मोठा हातभार लागला असता. यातून स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या असत्या. मुंबई-गोवा महामार्गाचा विस्तार हा देखील एक महत्वाचा प्रश्‍न तटकरेंनी मार्गी लावलेला नाही. मृत्यूचा सापळा ठरलेल्या या महामार्गाचे विस्तारीकरण सुरु झाले ते तटकरेंच्या प्रयत्नांमुळे नव्हे तर पत्रकारांनी घेतलेल्या पुढाकारामुळे. मुंबई-गोवा हा महामार्ग मुंबई-पुण्याच्या धर्तीवर एक्स्प्रेस मार्ग झाला पाहिजे होता. यातून रायगडच्या विकासाला व पर्यटनाला मोठा हातभार लागला असता.  पंरतु याबाबतीत तटकरे यांनी आपली जबाबदारी झटकली आहे. शरद पवारांनी जिल्ह्यातील खोरा बंदर विकसीत करण्यासाठी एकदा येऊन पाहणी केली खरी परंतु त्यापुढे काहीच पावले पडली नाहीत. हे बंदर विकसीत करण्याच्या केवळ घोषणाच झाल्या. प्रत्यक्षात काहीच उतरले नाही. रायगड जिल्ह्यात एवढा पाऊस पडूनही पाणी अडविण्यासाटी धंरणे न बांदल्यामुळे मामगाव, म्हसळा, पोलादपूर, श्रीवर्धन येथील अनेक भागात पाणी टंचाई जाणवते. एवढा पाऊस पडतो परंतु तो सर्व समुद्राला वाहून जातो. जिल्ह्याला खरे तर तटकरेंच्या रुपाने जलसंपदा मंत्री लाभला होता, परंतु त्यांनी जिल्ह्यातील पाण्याची टंचाई नष्ट व्हावी यासाठी काहीही पाऊल टाकले नाही, ही येथील जनतेच्या दृष्टीने दुदैवाची बाब आहे. आता येऊ घातलेल्या दिल्ली-मुंबई कॉरिडॉरला तटकरेसाहेब आता विरोध करीत आहेत. मात्र आजवर या प्रश्‍नावर मौन धारण करुन त्यांनी या प्रकल्पाला मूक संमतीच दिली होती. आता मात्र निवडणूकांच्या प्रचारात शेतकर्‍यांच्या हिताच्या गप्पा करुन याला विरोध करण्याचे राजकारण ते करीत आहेत. अशा प्राकारे जिल्ह्यातील महत्वाचे प्रश्‍न तर प्रलंबित आहेत, तर मग तटकरेंंनी नेमकी विकास कोणता केला याचे उत्तर घ्यावे.
-------------------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel