-->
संपादकीय पान मंगळवार दि. १५ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
मार्क्स-फुले-आंबेडकरांच्या विचार प्रत्यक्षात आणणारा कॉम्रेड काळाच्या पडद्यााआड
------------------------------------------
कॉम्रेड शरद पाटील यांच्या निधनामुळे एक मार्क्सवादी विचारवंत व आदिवासींच्या जनचळवळीतील एक कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे. आपल्याला केवळ वैचारिक वाद घालणारे विचारवंत आपल्याला अनेक मिळतील, मात्र शरद पाटील यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या वैचारिकतेला मार्क्सवादी लढ्याची जोड दिलेली होती. त्यामुळे त्यांचा मार्क्सवादी विचार हा अधिक प्रगल्भ व लढ्यातून आलेला होता. कॉ. शरद पाटील यांच्यासारखे महाराष्ट्रात मार्क्सवादी शोधून सापडणार नाहीत, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. मार्क्सवाद- फुले-आंबेडकरवाद आणि दासशुद्रांची गुलामगिरी अशा ग्रंथांतून आणि सत्यशोधक मार्क्सवादी या मासिकातून त्यांनी जातिव्यवस्थेचा प्रश्‍न चर्चेच्या आघाडीवर आणला. जातिव्यवस्था अंताच्या प्रश्‍नाला भारतीय राजकीय विचारधारेच्या केंद्रस्थानी आणण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. त्यावर त्यांनी केवळ राज्यात नव्हे तर देशपातळीवर प्रबोधन केले.  मार्क्स, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चळवळीचे खरे वारसदार म्हणून त्यांनी साहित्य, धर्म, विचारप्रणाली आणि संस्कृती यांच्या संदर्भात नवे सिद्धांत मांडले. कॉ. पाटील यांनी महाराष्ट्राच्या विचारविश्‍वात आपल्या वैचारिक योगदानांनी अनेक वाद निर्माण केले. प्राचीन भारताच्या इतिहास अभ्यासाची नवी संशोधन पद्धती पुढे आणली आणि जाती वर्चस्ववादी पितृसत्ताकत यांच्या प्रभावातून इतिहासलेखनास मुक्त केले. समाज परिवर्तक प्रवाहांच्या हाती नवी विचारसाधने दिली. धुळे येथे १७ सप्टेंबर रोजी १९२५ साली कुटुंबात जन्मलेल्या शरद पाटील यांनी तेथेच आपले शालेय शिक्षण केले. त्यानंतर त्यांनी १९४३ साली बडोद्याच्या कलाभवनात पेंटिंग कोर्सला प्रवेश घेतला. त्यानंतर ते १९४४ साली मुंबईत सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले. येथे त्यांचा मार्क्सवादी चळवळीशी जवळचा संबंध आला. १९४५ झालेल्या युद्धोत्तर पहिल्या देशव्यापी विद्यार्थी संपात सहभाग घेतला. १९४६ साली त्यांनी शिक्षण सोडून कम्युनिस्ट पक्षात सहभागी झाले आणि चळवळीला वाहून घेतले. धुळे येथे १९४७ साली ट्रेड युनियन आघाडीवर काम सुरु केले. १९४९ साली त्यांची पक्षातून हद्दपारी झाली. मात्र त्यांनी आपला वैचारिक संघर्ष सुरुच ठेवण्याचे निश्‍चित करुन  १९५१ सालापासून शेतकरी आघाडीवर काम करण्याचे ठरविले. निधनापर्यंत ते आदिवासी चळवळीत कार्यरत होते. १९६४ साली कम्युनिस्ट पक्ष दुभंगल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले. १९७८ साली जातिव्यवस्थेविरुद्ध लढायला माकपने नकार दिल्याने माकपचा राजीनामा दिला आणि त्यांनी १५ ऑक्टोबर १९७८ रोजी मार्क्सवाद- फुले- आंबेडकरवादी तत्त्वावर आधारलेला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष स्थापन केला. १९८२ ते १९९३ या काळात पक्षाचे मुखपत्र सत्यशोधक मार्क्सवादीचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या राजकीय कार्यामतील एक वैशिट्य म्हणजे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण काही चळवळींचा उगम त्यांच्यापासून झाला आहे. महाराष्ट्रातील पहिली धरणग्रस्तांची चळवळ उकाई धरणाच्या निमित्ताने त्यांनी यांनी उभी केली. आदिवासी भूमिहीनांसाठीच वनकायदा शासनापुढे आणला, त्यासाठीची भारतातील पहिली न्यायालयीन लढाई सुप्रिम कोर्टात कॉ. शरद पाटील आणि त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी लढली. नंदुरबार, साक्रीच्या आदिवासींच्या जनचळवळींनी वनकायद्यासाठी आवश्यक ती पार्श्‍वभूमी उभी केली. आदिवासींचा आर्थिक लढा आणि नामांतराचा जातीविरोधी लढा यांच्या एकजुटीतून परिवर्तनासाठी संयुक्त चळवळ उभी करण्याचा पहिला प्रयत्न हा धुळे जिल्ह्यातून पुढे आला. शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील शेतकर्‍यांच्या आर्थिक लढ्यात स्त्रीसमतावादी लढ्याची दिशा देण्यासाठी पिंपळनेर ते चांदवड असा स्त्रियांचा महामोर्चा सत्यशोधक कष्टकरी महिला सभेने संघटित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावे याकरिता सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षातर्फे लॉंग मार्च काढून आदिवासींना नामांतर चळवळीचा भाग बनविले. महाराष्ट्रातील साहित्य संमेलन चळवळींच्या सहभागातून संयुक्त साहित्य सभेची चळवळ धुळे जिल्ह्यातून उभी करण्याचे श्रेयदेखील कॉ. शरद पाटील यांनाच जाते. साक्री येथे पहिले संयुक्त साहित्य संमेलन यशस्वी करून साहित्य संमेलन चळवळीला नव्या वळणबिंदूवर आणण्याचे कार्य कॉ. पाटील आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी केली. त्यांनी शुद्रांची गुलामगिरी, रामायण- महाभारतातील वर्णसंघर्ष, जातिव्यवस्थापक सामंती सेवकत्व, शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण महंमदी की ब्राह्मणी? भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती, प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मातृसत्ता- स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवादी असे त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. असा कॉम्रेड होणे नाही.
------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel