-->
दीपिकाचे धाडस

दीपिकाचे धाडस

गुरुवार दि. 09 जानेवारी 2020 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
दीपिकाचे धाडस
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन मंगळवारी रात्री विद्यापीठात पोहोचली होती. जेएनयूबाहेरील मोर्चात सहभागी होत दीपिकाने विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचा निषेध नोंदवला. मात्र यावेळी दीपिकाने कोणतेही भाषण केले नाही किंवा प्रसारमाध्यमांना प्रतिक्रियाही दिली नाही. येथे पूर्णवेळ दीपिका शांत उभी होती आणि नंतर निघून गेली. महत्वाचे म्हणजे दीपिकाने यावेळी जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेशी घोष, जिच्यावर हल्ला झाला होता हिची भेट घेऊन विचारपूस केली. दीपिका तेथे काहीच बोलली नाही त्याबद्दल काही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली असली तरीही तिने तेथे येऊन हिंसाचाराचा निषेध नोंदविला हे मोठे धारिष्ट्यच म्हटले पाहिजे. त्याबद्दल तिचे स्वागत. कारण सध्याच्या जमान्यात सरकारविरोधात बोलणे, मग तो कलाकार असो किंवा सर्वसामान्य माणूस हा एक मोठा गुन्हा असल्याचे मानले जाते. लगेचच त्याला नेटवर ट्रोल करण्यास प्रारंभ केला जातो. दीपिकाला याची कल्पना असूनही तिने या विद्यार्थ्यांमध्ये जाऊन निषेध नोंदविण्याचे मोठे काम केले आहे. तेथील विद्यार्थ्यांना त्यांनी तेथे भाषण करावे असे वाटत होते. परंतु दीपिकाने भाषण न करताही ती तेथे जाणे ही बाब विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे बळ देण्यासारखे आहे. दीपिका आपला आगामी चित्रपट छपाकच्या प्रमोशनसाठी दिल्लीत होती. यावेळी तिने विद्यापीठात जाण्याचा निर्णय घेतला. दिल्लीतील प्रचंड थंडीत ती सायंकाळी साडे सातच्या सुमारास विद्यापीठाच्या आवारात पोहोचली. यावेळी कन्हैय्याकुमारने आजादीच्या घोषणा देण्यास सुरुवात करताच दीपिका उठून उभी राहिली होती. त्यानंतर काहीही न बोलता निघून गेली. दीपिकाचा छपाक हा चित्रपट महिलांवर अ‍ॅसिड फेकणार्‍या घटनेवर बेतलेला आहे. त्या चित्रपटाच्या माध्यमातून देशातील एक भयावह वास्तव तसेच देशातील महिलांची स्थिती जनतेपुढे आणली आहे. हा चित्रपट पूर्णपणे व्यवसायिक असला तरीही दिग्दर्शकानेे एका महत्वाच्या विषयाला हात घातला आहे. यातील मुख्य भूमिकेत दीपिका एवढी समरस झाली आहे की, या चित्रपटाच्या एका प्रमोशनच्या वेळी तिला रडू कोसळले होते. अर्थात तिचे हे आसू म्हणजे केवळ नाटक नव्हते तर हा चित्रपट करताना तिला ज्या वेदना झाल्या त्याची प्रतिक्रिया होती. एक अभिनेत्री आपल्या कथानकाबाबत एवढी संवेदनाक्षम असणे ही बाब चांगलीच आहे. गेल्या काही वर्षात चित्रपटांच्या प्रमोशनसाठी त्या चित्रपटातील कलाकार विविध सार्वजनिक ठिकाणी जाऊन आपल्या चित्रपटाची माहिती जनतेला देतात. हा एक नवा मार्केटिंग फंडा आहे. त्यानिमित्ताने जनतेत मिसळण्याची त्यांना संधी मिळते व त्यांच्या चाहात्यांनाही हे कलाकार जवळून पाहता येतात. मात्र हे कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनला कुठे जातात ते देखील महत्वाचे ठरते. त्यादृष्टीने पाहता छपाकच्या प्रमोशनच्या निमित्ताने दीपिका आपल्या दिल्लीतील वास्तव्यात जेएनयू विद्यापीठात जाणे याला त्यादृष्टीने महत्व आहे. हल्ली चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो कुठल्या ना कुठल्या तरी वादात अडकविणे हा एक नवीन फंडा आला आहे. अशा प्रकारे या चित्रपटावर काही ना काही वाद झाल्यास त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या फायदा चित्रपटास होतो, असा अनुभव आहे. मात्र यात अनेकदा कलाकारांच्या नशिबी ट्रोलिंग येते. आता दीपिका देखील जे.एन.य्ू.मध्ये गेल्याबद्दल हिंदुत्ववाद्यांच्या तडाख्यात सापडली आहे. तिच्याबद्दल अतिशय किळसवाणे लिखाण सुरु आहे. मात्र त्यात समाधानाची बाब म्हणजे तिच्या या भेटीचे समर्थन करणारे ही नेटकरी मोठ्या संख्येने आहेत. मोदी-शहा हे सत्तेवर आल्यापासून सरकारविरोधी जे कोणी भूमिका घेतील त्यांना ट्रोल करण्याचे किंवा त्यांच्यावर आरोप करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे याला धर्माचीही झालर लावली जाते. ही झुंडशाही आपल्या देशात आगामी काळात सर्वात घातक ठरणारी आहे. प्रत्येकाला विचारस्वातंत्र आहे व प्रत्येकाचा स्वतंत्र विचार राखण्याच अधिकार आहे. मात्र हे भाजपाला मान्य नाही. यापूर्वी कॉँग्रेसच्या काळात असे कधी झालेले नव्हते. त्यावेळी भाजपा असो किंवा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विचाराचे लोक असोत त्यांना त्यांचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य होते. त्यावर टीकाही केली जायची, परंतु त्यांचे ट्रोलिंग केले जात नव्हते. आता कलाकारांनी एखादी बाब सरकारविरोधी केली तर त्यांच्या चित्रपटावरही बहिष्कार घालण्याची भाषा केली जाते. छपाकच्या संदर्भातही बहिष्कार घालण्याची भाषा केली जात आहे व हे फार दुर्दैवी आहे. अर्तात दीपिकाला याची कल्पना असतानाही तिने जवाहरलाल नेहरु विद्यापीठात जाण्याचे ठरविले, यात तिचे मोठेपणा आहे. सावरकरांच्या बाबतीतही असेच राजकारण सुरु आहे. पंडित नेहरुंवर कोणत्याही टोकाला जाऊन त्यंची निंदानालस्ती करता येऊ शकते, परंतु तशी टीका सावरकरांच्या बाबतीत करण्याचा अधिकार मात्र मिळत नाही. सावरकरांच्या संदर्भात टिका केली तर तो देशद्रोह ठरतो. आता दीपिकाने देखील जे.एन.यू. जाऊन तिने हिंदुत्ववाद्यांना आंगावर घेतले आहे. तिच्या धाडसाबद्दल तिचे कौतुक.
--------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "दीपिकाचे धाडस"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel