-->
संपादकीय पान गुरुवार दि. १० मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
राजकारणाला रंग चढू लागला
---------------------------------
रायगड लोकसभा मतदारसंघातील एन.सी.पी.चे उमेदवार यांनी आपली मालमत्ता कमी दाखवूनही त्यांचा निवडणूक अर्ज स्वीकृत करण्यात आला. अशा प्रकारे लोकशाहीला काळीमा लावणारी ही घटना असल्याने आता त्याची दाद लोकांच्या दरबारात मागावी लागणार आहे. त्यासाठी शेकापच्या कार्यकर्त्यांची लढाई सुरु झाली असून केवळ रायगड नव्हे तर देशपातळीवर आता राजकारणाला रंग चढू लागला आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील रोड शो दरम्यान एका रिक्षावाल्याने त्यांना प्रथम हार घातला व नंतर त्यांच्या श्रीमुखात भडकाविली. गेल्या चार दिवसातील हा त्यांच्यावरील दुसरा हल्ला आहे. निवडणूक ही वैचारिक पातळीवर लढविली गेली पाहिजे. अशा प्रकारे हिंसक पध्दतीने लोकशाहीला गालबोट लावून ही निवडणूक लढली जाऊ शकत नाही. केजरीवाल हे गेल्या काही दिवसात सर्वच पक्षाचे टार्गेट ठरले आहेत. परंतु जर एखाद्या पक्षाला वा व्यक्तीला त्यांचा विरोध करावयाचा असेल तर त्यांनी अशा प्रकारे थपड मारुन राजकारण करणे योग्य नव्हे. अशा घटनांमुळे केजरीवाल यांच्याबाजूने समर्थन वाढणार आहे याची कल्पना ज्याने त्यांच्या थोबाडीत लगावली त्या रिक्षावाल्याला नाही. देशातील एकूणच राजकारणाचा रंग ढंग गेल्या वीस वर्षात बदलला आहे असेच यावरुन दिसते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची छुपी युती झाली असून शिवसेनेच्या जागा पाडण्याचे कारस्थान भाजपने रचले आहे. त्यामुळे शिवसेनेसारख्या भाजपच्या जुन्या मित्राने आणखी किती अपमानित व्हायचे ते ठरविले पाहिजे, अशी टोलेबाजी केली. लोकसभा निवडणुकीत राज्यात एक नवीनच युती झाली आहे. ही युती छुपी असली तरी २० वर्षांहून जास्त काळ अस्तित्वात असलेल्या शिवसेना-भाजप युतीला यामुळे तडे गेले आहेत. मनसेच्या माध्यमातून शिवसेनेच्या जागा पाडण्याचे या छुप्या युतीने ठरविले आहे. त्यामुळे जेथे भाजपच्या विरोधात मनसेचा उमेदवार नाही तेथे शिवसेनेचे कार्यकर्ते कोणाचे काम करणार? असा सवाल करत, भाजप उघडपणे सेनेच्या जागा पाडणार असेल तर शिवसेनेने आणखी किती दिवस अपमानित व्हायचे ते ठरवले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना व भाजपामध्ये काडी टाकण्यासाठी हे वक्तव्य केले आहे. मनसेने आपली भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट केली आहे. मात्र राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपादासाठी जो पाठिंबा दिला आहे त्याला राजकीय रंग चढवून कार्यकर्त्यांमध्ये दिशाभूल व्हावी व त्याचा फायदा कॉँग्रेसला मिळेल असे गणित पृथ्वीराजबाबांनी मांडले आहे. मुख्यमंत्र्यांना खरे तर विरोधी पक्षातील भांडणात लक्ष घ्यालण्याऐवजी कॉँग्रेस व त्यांचा सहकारी पक्ष एन.सी.पी.मध्ये कशा लठ्ठालठ्ठी चालली आहे त्याकडे लक्ष द्यावे. कारण आज रायगडात एन.सी.पी.चे उमेदवार सुनिल तटकरे यांच्यासाठी काम करण्यास कॉँग्रेसचे कार्यकर्ते उत्सुक नाहीत. तर माजी मुख्यमंत्री व रायगडातील कॉँग्रेसचे नेते बॅ. अंतुले यांनी तर उघडपणे शेतकरी कामगार पक्षाचे रायगडमधील उमेदवार रमेश कदम व मावळमधील उमेदवार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा दिला आहे. भ्रष्टाचारी तकरेंना निवडून देऊ नकात हे उघडपणे अंतुलेसाहेब सांगत आहेत. यावरुन काय समजायचे? कॉँग्रेस व एन.सी.पी. यांच्यातही एकसूर नाही. रायगडाच्या शेजारच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तर राष्ट्रवादीने कॉँग्रेसचे उमेदवार डॉ. निलेश राणे यांच्या विरोधात दंड थोपटून त्यांच्या वतीने काम न करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे रायगडातील राष्ट्रवादीचा उमेदवाराला कॉँग्रेसचे सहकार्य नाही त्याच धर्तीवर रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये कॉँग्रेसच्या उमेदवाराला राष्ट्रवादीचे सहकार्य नाही. याची काही कल्पना पृथ्वीराज चव्हाण यांना नाही असे नाही. परंतु दुसर्‍याचे ते राजकारण दिसते आपले काही दिसत नाही अशी तर्‍हा आहे. निवडणुकीचे राजकारण हे असेच आहे. सध्या आता हे राजकारण आता जास्तच वेगाने तापू लागले आहे. देशपातळीवर पाहता सत्ताधारी कॉँग्रेसला आता कठीण दिवस आले आहेत. एका ताज्या अहवालानुसार कॉँग्रेसला पक्षासाठी निधी द्यायला कुणी उद्योजक पुढे येत नाहीत. यावेळी भाजपाने जे कॅम्पेन सुरु केले आहे त्या प्रभावामुळे भाजपाला जास्त निधी पुरविला जात आहे. अनेक मोठे भांडवलदार मोदींच्या बाजूने पुढे आले आहेत त्यांनी भाजपाला थैल्या मोठ्या प्रमाणात दिल्या आहेत. त्यातुलनेत कॉँग्रेसला निधी कमी पुरविला जात असल्याने त्यांची यंत्रणा कमी पडू लागल्याची चर्चा आहे. सत्तेवर असताना देखील कॉँग्रेसची ही स्थिती असल्याने अनेकांना आश्‍चर्यही वाटेल. मात्र ही वस्तुस्थिती आहे. परंतु केवळ पैशाचा ओघ जास्त आहे म्हणून भाजपा आपण सत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहोत अशा जर हवेत असेल तर त्यांचा फुगा फुटण्यास काही वेळ लागणार नाही. लोकांना आता समजून चुकले आहे की, कॉँग्रेस व भाजपा हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे डावे हात म्हणून ओळखले गेलेले अमित शहा यांनी उत्तरप्रदेशात जी चिथावणीखोर भाषणे केली आहेत ती पाहता भविष्यात त्यांनी दंगलीची बीजे रोवली आहेत. अशा प्रकारे दोन समाजात तेढ निर्माण करुन सत्ता हस्तगत करता येईल ही मोदींची गणिते देशाच्या दृष्टीने घातक आहेत. राजकारण निवडणुकीच्या निमित्ताने जरुर होणार आहे, परंतु अशा प्रकारचे समाजात दुफळी निर्माण करणारे राजकारण नको.
-----------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel