-->
संपादकीय पान शुक्रवार दि. ११ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
फेसबुकच्या वापरात अमेरिकेच्या खालोखाल भारत
----------------------------------
सध्या सगळीकडे सोशल मिडियाने धुमाकूळ घातला आहे. देशात निवडणुकांच्या प्रचाराच्या अग्रभागी सोशल मिडिया हे अग्रभागी आहे. सोशल मिडियात प्रथम स्थानावर असलेल्या फेसबुकचा वापर आता भारतात अमेरिकेच्या खालोखाल होऊ लागल्याचे एका अहवालात प्रसिध्द झाले आहे. भारतात दहा कोटी लोक फेसबुकचा वापर सक्रियपणे करतात. तर हाच आकडा अमेरिकेत १८ कोटी ऐवढा आहे. भारतातील लोकसंख्या जरी १२० कोटी असली तरी त्यात ८० कोटी मोबाईल आहेत.  त्यामुळे नजिकच्या काळात फेसबुकचे ग्राहक अमेरिकेपेक्षा भारतात जास्त झाल्यास आश्‍चर्य वाटता कामा नये. भारताच्या खालोखाल ब्राझील, इंडोनेशिया व मेक्सिको यांचा क्रमांक लागतो. भारतातील आपल्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढण्यासाठी फेसबुकने दहा वर्षाचा रोडमॅप तयार केला आहे. मोबाईलव्दारे इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढला आहे. अनेक ठिकाणी कॉम्प्युटर पेक्षा इंटरनेटचा मोबाईलव्दारे वापर वाढला आहे. पुढील काळात तर मोबाईलव्दारेच इंटरनेट ही संकल्पना झपाट्याने विस्तारणार आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी देखील याच संकल्पनेवर जास्तीत जास्त भर देण्याचे ठरविले आहे. फेसबुकने भारतात आपले प्रथम कार्यालय हैदराबाद येथे २०१० साली स्थापन केले त्यावेळी फेसबुकचे भारतातील ग्राहक होते केवळ ८० लाख. आता ही संख्या दहा कोटींवर पोहोचली असून त्यातील सुमारे साडे आठ कोटी लोक हे मोबाईलव्दारे फेसबुकचा वापर करतात. २००४ साली स्थापन झालेल्या फेसबुकचे सध्या जगभरात १०० कोटीहून जास्त ग्राहक आहेत. या कंपनीचा एकूण महसूल हा गेल्या वर्षी ७.८ अब्ज डॉलर एवढा झाला होता. गेल्या तीन वर्षात फेसबुक हे झपाट्याने लोकप्रिय झाले व त्यांचा ग्राहक हा दुपटीने वाढला. तर याच तीन वर्षाच्या काळात भारतात फेसबुकचे ग्राहक हे पाच पटीने वाढले. फेसबुकला मोठे आव्हान गुगल प्लस व स्नॅपचार्ट या नव्या कंपन्यांचे आहे. परंतु असे असले तरी फेसबुकची वाढ ज्या गतीने झाली व होत आहे त्यातुलनेत या अन्य कंपन्यांना मोठा संघर्ष करावा लागेल. परंतु एक बाब स्पष्ट आहे की, सोशल मिडिया आपल्याकडे मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. सध्या निवडणुकीच्या हंगामात तर सोशल मिडियाला चांगले दिवस आले आहेत. गेल्या निवडणुकीत अमेरिकेमध्ये सोशल मिडियाने महत्वाची भूमिका पार पाडली होती. परंतु तशाच प्रकारे सोशल मिडिया आपल्याकडे यावेळी दिशादर्शक ठरेल का हा एक महत्वाचा सवाल आहे. मात्र एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, आपल्याकडे एकूण मतदार हे ८० कोटी आहेत. त्यातील २० कोटी मतदार हे तरुण आहेत. प्रामुख्याने तरुण पिढीच सोशल मिडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करते. आपल्या देशात सरासरी ५० टक्के मतदान होते असे गृहीत धरले तरी ४० कोटी मतदारांपैकी दहा कोटी फेसबुकचे ग्राहक धरले तरी ही संख्या २० टक्के सरासरी भरते. अर्थात सोशल मिडिया वापरणार्‍यांपैकी प्रत्येक जण मतदानाला जाईलच असे नाही. तरी आपण सोशल मिडिया वापरणार्‍यांपैकी साठ टक्के मतदानाला गेले तरी सहा कोटी मतदार हे सोशल मिडियाच्या अंमलाखाली आहेत असे म्हणता येईल. आपल्याकडे त्यामुळे एकूण मतदारांच्या संख्येत त्यांची संख्या अगदीच नगण्य ठरावी एवढी आहे. दहा ते पंधरा टक्के मतदारांपर्यंत आपण सोशल मिडियाच्या माध्यमातून पोहचू शकतो. कदाचित पुढील निवडणुकांपर्यंत हे प्रमाण २५ किंवा ५० टक्के मतदारांएवढे झाल्यास ते माध्यम आणखी प्रभावी होऊ शकते.
---------------------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel