-->
कॉ. गोविंद पानसरे यांच्यावरील पान १चा अग्रलेख --
---------------------------------------------------------
क्रांतिकारी कॉम्रेड!
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व मार्क्सवादी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंझ अखेर पाच दिवसांनंतर थांबली आहे. आयुष्यभर त्यांनी जनतेच्या प्रश्‍नावर लढाया केल्या आता वयाच्या ८५व्या वर्षी त्यांना मृत्यू देखील संघर्षमय आला. देशातील एक डाव्या चळवळीचे पितामह म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. अशा या पितामहला प्रतिगामी शक्तींनी गोळ्या झाडून संपविले. विचाराचा मुकाबला विचाराने केला पाहिजे हे तत्वज्ञान आपण विसरलो आहोत, असडेच या घटनेनंतर वाटू लागले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कम्युनिस्ट नेत्यांची चळवळीत झोकून देणारी जी एक त्यागी वृत्ती जोपासणारी पिढी होती त्यात कॉम्रेड पानसरे हे बिनिचे शिलेदार होते. त्यांनी तरुणपणात आपल्या खांद्यावर जो लाल बावटा घेतला तो शेवटपर्यंत. देशातील कामगार, शेतकरी, शेतमजूर या कष्टकर्‍यांवर होणार्‍या अन्यायासाठी ते सातत्याने झडगले. हे लढे लढवित असताना समाजात ज्या अपप्रवृत्ती आहेत प्रामुख्याने अंधश्रध्दा, महिलांवरील अन्याय या विरोधात सतत्याने उभे राहिले. अन्यायाविरोधी उभा ठाकणारा एक लोकनेता म्हणून त्यांचा परिचय जनतेला होता. अलिकडेच कोल्हापूरात टोलविरोधी आंदोलन पेटले होते. राज्यात जी टोळधाड आहे ती संपविली पाहिजे असे मानून त्यांनी हा लढा उभारला. त्यांच्या या लढ्यातूनच संपूर्ण राज्यात टोल विरोधी आंदोलन पेटले. अशा प्रकारे कॉम्रेड पानसरे यांनी खर्‍या अर्थाने आयुष्यात कष्टकर्‍यांचे राजकारण केले. पानसरे मूळचे नगर जिल्ह्याच्या श्रीरामपूूर तालुक्यातल्या कोल्हार या लहानशा गावातले. घरची थोडी शेती होती. नंतर तीही गेली. आई हरणाबाई शेतमजूर. रस्त्याच्या, पुलाच्या बांधकामावर आईवडिलांनी खडी फोडण्याचे कामेसुध्दा केली. बालपणापासून पानसरे राष्ट्रसेवा दलात जात होते. यातून त्यांची पत्की गुरुजींशी ओळख झाली. पत्की गुरुजी राष्ट्रसेवा दलाचे काम करायचे. १९५२ साली कॉ. माधवराव गायकवाड, कॉ. बापूराव जगताप आदिंचा डावा समाजवादी पक्षाचा गट कम्युनिस्ट पक्षात आला. त्यांच्याबरोबरच कॉ. पानसरे पक्षात आले. आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. कॉ. माधवराव गायकवाड महाराष्ट्र राज्य कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस असताना कॉ. पानसरे पक्षाच्या कामाचा बराच भार उचलत होते. त्यानंतर ते पक्षाच्या महाराष्ट्र कौन्सिलचे नऊ वर्षे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे ते अनेक वर्षे सदस्य होते. वयाच्या ७५ व्या वर्षानंतरही ते पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सचिव मंडळाचे सन्माननीय सदस्य होते. कामगार, कष्टकर्‍यांचे राज्य स्थापन केल्याशिवाय देशात खर्‍या अर्थाने साम्यवाद येणार नाही यावर त्यांचा दृढ विश्‍वास होता. बुद्धिप्रामाण्य आणि पुरोगामी विचार यांच्याशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. उक्ती आणि कृतीत कधी अंंतर पडू दिले नाही. म्हणूनच त्या दोघांघी मुलींचे आंतरजातीय विवाह करुन दिलेे. पानसरेंच्या आईच्या मृत्यूनंतर कुठलेही धार्मिक विधी तर केले नाहीतच शिवाय प्रदूषण होऊ नये म्हणून नदीत रक्षा विसर्जन न करता शेतात पसरून दिली. आपल्या धकाधकीच्या जीवनातही आपले पालकत्व त्यांनी सुजाणपणाने निभावले. कम्युनिस्ट पक्षसंघटना आणि मार्क्सवादी विचार हा कॉ. पानसरेंच्या जीवनाचा गाभा. कामगार संघटना आणि विविध जनसंघटना हा पक्षवाढीचा स्रोत आहे हे लक्षात घेऊन कॉ. पानसरे यांनी कोल्हापूर व परिसरात जवळ जवळ १७ कामगार संघटना उभ्या करून उत्तम प्रकारे चालवल्या. जनसंघटनांमध्ये किसान सभा व विद्यार्थी संघटना यावर त्यांचे जास्त लक्ष होतेे. कामगार, किसान विद्यार्थी संघटनांमधील चांगले कार्यकर्ते हेरून त्यांना मार्क्सवादाचे धडे देणे, त्यांचे संघटन कौशल्य वाढवून त्यांना डाव्या चळवळीतले सक्षम नेते बनवणे यासाठी पानसरेंची सतत धडपड चालू असायची. विशेषतः विद्यार्थ्यांचा अभ्यासवर्ग, दरवर्षी १० दिवसांची होणारी विद्यार्थी-विद्यार्थिनींची कार्यशाळा यात ते बारकाईने लक्ष घालीत आणि विद्यार्थ्यांना आवडेल, पचेल, रुचेल असे त्यांचे स्वरूप ठेऊन ती कार्यशाळा लाभदायक करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. कॉलेज संपवून वकिली करू लागल्यावर पारीख पुलावरच्या भाजीवाल्यांच्या लढ्यापासून ते केंद्र सरकारने केलेल्या भारत-अमेरिका अणुकरार विरोधी लढ्यापर्यंतच्या कोल्हापुरातल्या प्रत्येक लढ्यात कॉ. पानसरेंचा सहभाग होता. आणि अन्याय अत्याचारविरोधी, शोषणविरोधी श्रमिकांचा बुलंद आवाज म्हणजे कॉ. गोविंद पानसरे असेच समीकरण झाले होते. ज्या कोल्हापुरात शाहू महाराज कर्मकांडाविरुद्ध लढले, तिथेच हजारो किलो धान्य, मोठ्या प्रमाणावर तेलतुपासारखे खाद्यपदार्थ जाळून होणार्‍या यज्ञाच्या विरोधात जनजागरण करण्यात आले. बिंदू चौकात मोठी जाहीर सभा घेण्यात आली. त्यात खुद्द छत्रपतींनी भाग घेतला. ज्ञानविरोधी धरण्यात हजारो लोक सामील आणि यज्ञाच्या बाजूने थोडेसेच हिंदूत्ववादी असेच दृश्य असे. महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांनी धरणे आंदोलनाला भेट देऊन मार्गदर्शन केले. जिल्ह्यातले सर्व पुरोगामी या धरण्यात आले. शेवटी जनतेनेच यज्ञावर बहिष्कार टाकला. यज्ञाचा बोजवारा उडाला. कोल्हापूरचा पुरोगामी चेहरा टिकवून ठेवण्यात कॉ. पानसरेंचा मोठा वाटा होता. कॉ. पानसरे यांनी लिहिलेल्या बहुतांश पुस्तिका या त्या त्या वेळी वादग्रस्त ठरलेल्या विषयावरच्या आहेत. सर्वसामान्य माणसांचे त्या त्या विषयांचे आकलन वाढावे, त्यांचे प्रबोधन व्हावे या हेतूनेच त्यांनी लिहिल्या. त्यांच्या मुस्लिमांंचे लाड या पुस्तिकेबद्दल हुसेन जमादार म्हणाले होते, या छोट्याशा पुस्तिकेने मुस्लिम समाजाला मोठा विश्वास मिळवून दिला. हिंदू धर्मियांच्या वाढीचा सरासरी दर सतत वाढतो आहे व मुस्लिम धर्मियांच्या वाढीचा सरासरी दर सतत कमी होतो आहे ही मांडणी एका गैरमुस्लिमाने करणे ही गोष्ट मुस्लिम समाजाला आश्वासक वाटते. त्यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तिकेने तर लाखाहून अधिक प्रती खपल्या आहेत. अनेक भारतीय भाषांमध्ये याचा अनुवाद झाला आहे. पक्षाचे काम, कामगार संघटनांचे काम, वकिली, शेकडो व्याख्यानांसाठी, अभ्यासवर्गांसाठी सतत प्रवास असे अत्यंत व्यस्त आयुष्य असूनही पानसरे सतत नवनवे उपक्रम करीत असत आणि नव्याजुन्या कार्यकर्त्यांच्या मदतीने यशस्वीपणे पार पाडत असत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून त्यांचा या कामाशी संबंध होता. आन्तरजातीय विवाह करू इच्छिणार्‍या तरुण-तरुणींसमोर अनेक समस्या असतात. अशावेळी त्यांना मुख्यतः मानसिक आधाराची आधाराची गरज असते. ते काम आणि त्यांचे इतर प्रश्न सोडवायला हे केंद्र मदत करते. त्यातल्या कायदेशीर बाजूची सर्व जबाबदारी पानसेंची असे. पण आता कार्यकर्ते तयार झाले आहेत आणि हे केंद्र सक्षफ झाले आहे. त्यांच्या संपूर्ण घराने कम्युनिस्ट चळवळीला वाहून घेतले होते. कॉ. पानसरेंचा मुलगा अविनाश विद्यार्थी असल्यापासूनच ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे काफ मोठ्या हिरीरीने करत होता. कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व चळवळींफध्येही त्याचा सक्रिय सहभाग असे. एल. एल. बी. झाल्यावर तर तो कॉ. पानसरेंच्या बरोबरीने सर्वच आघाड्यांवर अत्यंत जोमाने काम करत होता. त्यामुळे या सर्व कामांची जबाबदारी अवीवर सोपवून इतर कामात लक्ष घालण्याचा विचार कॉ. पानसरे करत होते. अशावेळी केवळ ३५ वर्षांचा अविनाश हृदयविकाराच्या झटक्याने या जगातून निघून गेला. कॉ. पानसरे यांच्या कुटुंबावर तर आकाशच कोसळले. त्यातूनही कॉम्रेड सावरले. समाजातील लोकांचे दुख: आपल्याहून मोठे आहे अशी समजूत स्वत:ची घालून ते पुन्हा जोमाने चळवळीकडे वळले. त्यांनी सध्याची भष्ट राजवट, प्रतिगामी शक्तींवर आसूड ओढण्यास सुरुवात केली होती. त्याचच सध्या प्रतिगामी शक्तींनी उचल खाल्ली असून त्यांचा बळी हा त्यांनीच घेतला आहे. असा कॉम्रेड पुन्हा होणे नाही.
-------------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel