-->
बदलता काळ आणि  वाचनसंस्कृती

बदलता काळ आणि वाचनसंस्कृती

सोमवार दि. 27 नोव्हेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
बदलता काळ आणि 
वाचनसंस्कृती
रायगड जिल्ह्याचा शासकीय ग्रंथोत्सव नुकताच अलिबागमध्ये पार पडला. या ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने बरीच टीकाटिपणी झाली. या टीकेचे स्वागतच झाले पाहिजे, कारण यातील सुचनांचा विचार करुन पुढील काळात ग्रंथोत्सव अधिक चांगल्या तर्‍हेने सरकारला करता येईल. गेल्या दशकात वाचनसंस्कृती हळूहळू लोप पावत चालली आहे व त्यातून लोकांनी प्रामुख्याने तरुणांनी वाचनसंस्कृतीकडे वळावे यासाठी असे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. शासकीय पातळीवर असे प्रयत्न केले जाणे याचे मुळात स्वागत झाले पाहिजे. आता त्याच्या अंमलबजावणीत काहीतरी तृटी राहातात, त्यावर बोलण्याचा प्रत्येकाचा अधिकारच आहे. हे मान्य करीत आपण एक बाब पाहिली पाहिजे की, मुळातच आपल्याकडे तरुणांमध्ये वाचनसंस्कृती रुजलेली नाही. आता जी चाळीशी-पन्नाशी पार केलेली पिढी आहे त्यांनी कितीही ही संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला तरी त्याला मर्यादा आहेत. अलिबागमध्ये ग्रथोत्सवाला गर्दी कमी होती किंवा विघ्यार्थ्यांना मारुनमुटकून तेथे बसवावे लागले ही वस्तुस्थिती खरी आहे. ही स्थिती केवळ अलिबागचीच नाही तर बहुभाषिक मुंबईची व सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचीही आहे. हल्ली या शहरात कोणताही कार्यक्रम आयोजित करताना आयोजकांना सध्या क्रिकेटचा सामना तर नाही ना किंवा एखादी लोकप्रिय मालिकेची वेळ या कार्यक्रमाच्या दरम्यान येत नाही ना याचे भाव ठेवावे लागते. अलिबागमधील स्थिती याहून काही वेगळी नाही. अलिबागमध्ये पूर्वी नामवंतांची भाषणे, गाण्याच्या मैफिल असे अनेक कार्यक्रम झाल्याचे येथील बुर्जुगांचे म्हणणे आहे. परंतु गेल्या तीन वर्षात झाकीर हुसेन वगळता नामवंत गायकाचा कार्यक्रम अलिबागला झालेला नाही, हे मोठे दुर्दैवच आहे. याचा दोष कुणा व्यक्तीला देण्याचा नाही तर आपल्या बदललेल्या काळाला हा दोष दिला पाहिजे. तरुण पिढीचा बाज काही औरच आहे. ही पिढी व्हॉटस्अप, सोशल मिडियात एवढी गुरफटली आहे की, त्यांना वाचनसंस्कृती म्हणजे काय, तिचे फायदे काय याचा थांगपत्ताच राहिलेला नाही. सोशल मिडियातील माध्यमात ते त्यात एखादे वाक्य किंवा शब्द टाईप करुन आपल्या भावभावना प्रगट करीत असतात. हेच आपले जग आहे अशी त्यांची समजूत झालेली आहे. ही पिढी वृत्तपत्रे वाचत नाहीत. तर ते मोबाईलवरती फक्त वृत्तपत्रांच्या वेबसाईट पाहतात, त्यातही ते हेडलाईन व फारफार तर बातमीचा एन्ट्रो वाचतात. सध्याच्या वेगाने धावत असलेल्या जीवनात त्यांना बातम्या किंवा पेपर वाचण्यासाठी वेळ नसतो किंवा त्याचे वाचन करावे याची त्यांना उर्मीही नसते. याचे परिणाम साहित्य जगतावर उमटले आहेत. साहित्य संमेलनाला देखील जाणारी काही ठरावीक मंडळी आहेत, तरुणांना त्यात जाऊन तीन दिवस खर्ची घालावेत असे वाटत नाही. आपल्याकडे घरोघरी वाचनसंस्कृती कमी झाल्याचे हे द्योतक आहे. एक दशकापूर्वी दिवाळी अंक ही मराठी माणसांसाठी फराळासोबतची एक साहित्याची मेजवानी होती. केवळ मराठी साहित्यातच दिवाळी अंक आढळतात याचा आपल्याला रास्त अभिमानही होता. त्यामुळे एकेकाळी सहाशेच्यावर दिवाळी अंक प्रसिध्द व्हायचे. ती संख्या आता जेमतेम दोनशे अंकांवर आली आहे. अजून दहा वर्षांनी ही संख्या पंचवीसच्या आत आली तर नवल वाटू नये. लोकांचे जीवन आता झटपट झाले आहे, 1991 साली देशात आर्थिक उदारीकरणाचे युग सुरु झाल्यापासून आपल्यात व आपल्या भोवतीच्या समाजात झपाट्याने बदल झाले आहेत. हा बदल नवीन पिढीने झपाट्याने स्वीकारला. परंतु पन्नशीच्या पुढे असलेली पिढी हा बदल स्वीकारु शकत नाही. लोकांना आता सर्व काही वेगाने पाहिजे आहे. यामुळेच काही सेकंदाचा प्रोमो पाहून दशक्रिया व पद्मावती या चित्रपटांच्या विरोधात काहूर उठविले जाते. हा चित्रपट पाहून त्यावर प्रतिक्रिया देण्याचा विचार कुणी करीत नाही. कारण आता सर्व काही सेकंदाचा बाजार झाला आहे. सोशल मिडियावर काही तरी टाकून लोकांची क्षणात माथी भडकाविली जातात. पूर्वी असे नव्हते का? होते. परंतु लोकांमध्ये वाचनसंस्कृती जडल्यामुळे लोक प्रतिक्रीया देताना सावधपणे देत. वाचनामुळे त्यांच्यात एक मॅच्युरिटी आली होती. आज आपले जिल्हाधिकारी ग्रंथोत्सवात म्हणाले की, वाचनामुळे मी माणसे वाचायला शिकलो. आज ज्यावेळी जिल्हाधिकार्‍यांसारखे एक वरिष्ठ शासकीय अधिकारी हे बोलतात त्याला एक महत्व आहे. तरुण पिढीने यातून बोध घेण्यासारखे निश्‍चितच आहे. आता असे म्हटले जाते की, तरुण पिढी किंडलवर पुस्तके वाचते. अर्थातच मराठी पुस्तके अनलाईन खपत आहेत, परंतु खरोखरीच वाचली जातात का, असा सवाल आहे. अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थी पुस्तके वाचतात. परंतु त्यांचे आवांतर वाचन होते का? अशा या पार्श्‍वभूमीवर सरकारने ठिकठिकाणी ग्रंथोत्सव आयोजित करण्याचे ठरविले हे स्वागतार्हच आहे. त्यातील कार्यक्रमात वेळोवेळी आलेल्या तृटी लक्षात घेत सुधारणा करीत राहिलेच पाहिजे. मात्र या कार्यक्रमांचे यश हे जमणार्‍या प्रेक्षकांच्या संख्येवर ठरविणे चुकीचे ठरेल. कारण आता करमणुकीचे कार्यक्रम वगळता कोणत्याही कार्यक्रमाला गर्दी होत नाही, हे वास्तव स्वीकारले पाहिजे. विनोदी कवी व आपल्या खुमारदार शैलीने प्रेक्षकांची मने जिंकणार्‍या अशोक नायगांवकरांच्या कार्यक्रमाला गर्दी जमली कारण नायगांवकर हे केवळ कवी नाहीत तर ते सेलिब्रेटी आहेत. लोकांना त्यांच्या कार्यक्रमाला जावेसे वाटते. तसे ग्रंथोत्सवातील इतर कार्यक्रमांना जावेसे वाटत नाही, हे आपले दुर्दैव म्हणायचे. ही परिस्थिती वाचनसंस्कृती वाढीस लागल्याशिवाय बदलणार नाही.
------------------------------------------------------------

0 Response to "बदलता काळ आणि वाचनसंस्कृती"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel