-->
संपादकीय पान--चिंतन--८ ऑक्टोबर २०१३ 
----------------------------
विक्रमी पावसाळ्याने अर्थकारण बदलणार
----------------------
गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळानंतर यंदा मात्र वरुणराजाने कृपा केली असून अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडलेल्याने चांगलाच दिलासा मिळला आहे. त्यामुळे यंदा वरुणराज आपल्यावर चांगलाच खूष आहे असे दिसते. १ जून ते ३० सप्टेंबर या काळात राज्याच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. अशा प्रकारे सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची गेल्या पाच वर्षातील ही दुसरी घटना आहे. केवळ महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण देशातच अशाच प्रकारचे चित्र आहे. देशाच्या सुमारे ४८ टक्के भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. तर ३८ टक्के भागात पावसाने सरासरी गाठली आहे. दरवर्षी जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरी ८८६ मि.मि. पाऊस पडतो. मात्र यंदा वरुणराजा खूष झाल्यामुळे पावसाची सरासरी सहा टक्क्याने वाढून ९३६.७ मि.मि.वर पोहोचली आहे. हवामान खात्याच्या सांगण्यानुसार, यंदा बंगालच्या उपसागरात अनेकवेळा कमी दाबाचा पट्टा तयार झाला त्यामुळे देशाच्या मध्य भागात चांगला पावसाळा झाला.
आपल्याकडे कोकणात कधीच कमी पावसाळा झाला असे चित्र नसते. नेहमीच आपल्यावर वरुण राजाची कृपादृष्टी असते. यंदा देखील कोकणात सरासरीपेक्षा २० टक्के जादा पाऊस झाला आहे. वरुणराजा रुसत असलेल्या विदर्भात यावेळी सर्वाधिक पावसाळा झाला आहे. येथे सरासरीपेक्षा ४३ टक्के जास्त पावसाची नोंद झाली. कोकणात मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात. या सर्वच जिल्ह्यात सरासरी २० टक्के जास्त पाऊस झाला आहे. तर पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर या मध्य महाराष्ट्रात २१ टक्के जास्त पाऊस पडला आहे. तर दुष्काळाचे मुख्य केंद्र असलेल्या मराठवाड्यातही यंदा सरासरीपेक्षा नऊ टक्के जास्त पावसाची नोंद झाली. सर्वात महत्वाचे म्हणजे पावसाचे चार महिने संपले असले तरीही अजूनही पाऊस आपली उपस्थिती लावतच आहे. त्यामुळे अजूनही हवामान खात्याने पावसाळा संपल्याचे अधिकृत जाहीर केलेले नाही. त्यामुळे यंदा गरब्यात पाऊस आपली हजेरी लावणार असेच दिसतेय. मात्र पावसाच्या उपस्थितीमुळे गरब्याचा बेरंग होणार नसून रंग आणखीनच वाढेल या मताशी तरुण पिढी सहमत असेल.
यंदा पावसाळा चांगला झाल्याने चांगले पीक येणार आहे. त्यामुळे महागाईवर नियंत्रण राहील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अर्थात शेतकरी व ग्राहक यांच्यातील मध्यस्थ असलेल्या दलालांनीही पावसाप्रमाणे कृपा करावयास हवी. परंतु कृषी उत्पन्न कमी आले म्हणून भावात वाढ करण्याची संधी त्यांना मिळणार नाही. याच्या जोडीला चांगले पीक पाणी आल्याने शेतकर्‍यांच्या हातातही चांगला पैसा खुळखुळेल. त्यामुळे ग्रामीण भागात दिवाळीनंतरची खरेदी वाढण्यास मदत होईल. ग्रामीण भागात लग्नसराईचा हंगाम चांगलाच फुलेल. यामुळे एकूणच ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना मिळेल. शेतकर्‍यांच्या हातात चांगले पैसे आल्याने अनेकदा त्याचा गैरवापरही होण्याचा धोका असतो. परंतु सुजाण शेतकरी सोन्यात वा बँकेत ठेवी करुन आपल्याकडील पैशाची साठवणूक भविष्यासाठी करतो. लोकांची चांगली खरेदी झाल्याने ग्राहोपयोगी वस्तूंची विक्री करणार्‍या कंपन्यांना आपला माल विकण्याची चांगली संधी मिळते. त्यामुळे ग्रामीण भागातल्या या सुबत्तेचा फायदा शहरातील लोकांनाही अप्रत्यक्षरित्या होतो. त्यामुळे पावसाळा चांगला झाल्याने आपल्याकडील अर्थकारण सुधारण्यास हातभार लागेल.
--------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel