-->
संपादकीय पान-- अग्रलेख-- ९ ऑक्टोबर २०१३
----------------------------
लोकांच्या जीवाशी खेळ थांबवा
------------------------
सरकारी तेल व नैसर्गिक वायू उत्खनन क्षेत्रातली आघाडीची कंपनी ओ.एन.जी.सी.च्या उरण जवळील प्रकल्पातून तेल गळती झाल्याने या परिसरातील लोकांचे जीवनमान धोक्यात आले आहे. २४ तासानंतर ही गळती आटोक्यात आली असली तरीही येथील उग्र वासाने अजूनही थैमान घातले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या मनात अनेक शंका-कुशंका निर्माण झाल्या आहेत. ओ.एन.जी.सी.च्या दाव्यानुसार, यात घाबरण्यासारखे काहीच नाही. ही गळती नित्याचीच असून यामुळे घाबरुन जाऊ नये. मात्र समुद्राच्या किनारपट्टीवर आलेला तेल तवंग, वातावरणात पसरलेला उग्र वास तसेच यापूर्वी २००७ साली झालेला अपघात पाहता नागरिकांच्या मनात भीतीचे सावट निर्माण होणे सहाजिकच आहे. नुसते घाबरुन जाऊ नका असे सांगून नागरिकांच्या मनाचे समाधान होणार नाही. मुंबई-उरणच्या समुद्रपट्ट्यात मुंबई हाय येथून मोठ्या प्रमाणावर तेल उत्खनन करण्यात येते. या प्रकल्पास सुमारे ७०च्या दशकात सुरुवात झाली. मुंबईच्या किनार्‍यावर हे काळे सोने सापडल्याने देशाच्या प्रगतीला हातभारच लागणार होता. मुंबई हाय मधून हे तेल काढून पाईपलाईनने आणले जाते आणि उरणच्या या प्रकल्पात त्याचे शुध्दीकरण केले जाते. ओ.एन.जी.सी. या कच्या तेलावर प्रक्रिया करुन त्यातून नॅप्था, डिझेल, पेट्रोल, स्वैयंपाकाचा गॅस, केरोसिन स्वतंत्र करुन त्याचे देशात वितरण करते. देशाला अभिमान वाटावा असा हा प्रकल्प आहे. परंतु २००७ साली येथील पाईपलाईनमधून सर्वात पहिल्यांदा नॅप्थाची गळती झाली आणि त्यात दोन बळी गेले. या घटनेमुळे येथील नागरिकांच्या मनात जी भीती बसली ती अजून दूर झालेली नाही. आता पुन्हा तेलाचा तवंग समुद्रात पसरल्याने पुन्हा एकदा नागरिकांच्या मनात जुन्या आठवणी ताज्यातवान्या झाल्या आहेत. यावेळी तेलगळती ही मोठ्या प्रयासानंतर आटोक्यात आल्याचे सांगण्यात येते. या तेलगळतीमुळे सुमारे पाच किलो लिटर्स इतके तेल वाहून गेले आहे आणि ते पुन्हा जमविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हे तेल जमा करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागेल असे सांगितले गेले. याचा पक्षी, प्रणी यांच्यावर काही परिणाम होण्यार नसल्याचा कंपनीचा दावा आहे. असे असले तरीही ओ.एन.जी.सी. लोकांच्या मनातील ही भीती दूर करण्यासाठी सुरक्षिततेसाठी काही ठोस पावले उचलण्याची गरज आहे. ओ.एन.जी.सी.ने या प्रकल्पास ३० वर्षे पूर्ण झाल्याने सुमारे सात हजार कोटी रुपये खर्च करुन हा प्रकल्प पुन्हा टप्प्याटप्प्याने नव्याने उभारण्यास सुरुवात केली आहे. काल देखील फुटलेली ही पाईपलाईन जुनी असावी अशी शंका आहे. एवढ्या पाईपलाईन जुन्या होईपर्यंत कंपनी थांबतेच कशाला? अशा प्रकारे आपण लोकांच्या जीवाशी खेळत आहोत याची कल्पना कंपनीस नाही का? तेल समुद्रात मिसळल्याने नागाव, परिवाडी, केगाव, करंजा या परिसरात तेलाचा तवंग पसरला होता. परंतु ओहटीमुळे हा तवंग दूर झाला. विदेशात अशा प्रकारचा समुद्रात तवंग आल्यास कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावला जातो. आपल्याकडे अशा प्रकारे कोणतीच कडक दंडाची तरतुद नाही. त्यामुळे अनेक कंपन्या बिनबोभाटपणे प्रदूषण करतात. ओ.एन.जी.सी. ही सरकारची नवरत्न कंपनी म्हणून ओळखली जाते. भारताचे रत्न म्हणून असलेल्या या कंपनीने आपल्याकडे सर्व प्रकारच्या पर्यावरण विषयक सुरक्षितता कडक पाळल्या पाहिजेत अशी अपेक्षा आहे. परंतु ही सुरक्षितता कितपत सांभाळली जाते याबाबत शंका निर्माण झाली आहे. राज्य सरकारचे प्रदूषण नियंत्रक महामंडळही काय काम करते अशी शंका उपस्थित होते. अशा प्रकारे जे उद्योग पर्यावरणाच्या संबंधी संवेदनाक्षम आहेत अशा कंपन्यांवर विशेष नजर ठेवली गेली पाहिजे. २००७ साली झालेल्या अपघातानंतर तर खरे तर कंपनी व प्रदूषण नियंत्रण मंडळाने सतत सर्तक राहावयास हवे. यासंबंधी जर पुरेशा दक्षता घेतल्या गेल्या असत्या तर आजची घटना घडली नसती. कंपनीने या घटनेनंतर आता अधिक जागृत राहावयास हवे. पुरेशी दक्षता न घेतल्याने किती हानी होते हे आपण भोपाळच्या वायू दुर्घटनेने अनुभवले आहे. एखादी घटना घडल्यावर आपल्या कामकाजात सुधारणा करुन अशी चुक पुन्हा घडणार नाही याची दक्षता घ्यावयास हवी. केवळ घाबरण्याचे कारण नाही असे सांगून लोकांचे समाधान होणार नाही. आपण लोकांच्या जीवाशी अशा प्रकारे खेळत आहोत हे कंपनीने लक्षात घ्यावे. आपल्याकडे प्रकल्प मोठ्या दिमाखात उभारले जातात. परंतु त्या प्रकल्पातून पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आज वडखळ, रोह्यापासून ते चिपळूण पट्ट्यात असलेले अनेक रासायनिक प्रकल्प हे हवामान खराब करीत आहेत. आपल्याला हे प्रकल्प रोजगार निर्मितीसाठी हवे आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. परंतु त्यांनीही पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी आपल्या कारखान्यातून प्रदूषण कसे कमीतकमी होईल आणि त्याचा वन्यप्राणी व लोकांवर कसा परिणाम होईल याची खबरदारी घेतली पाहिजे. त्यासाठी आवश्यकता असेल तिथे त्यांनी अतिरिक्त गुंतवणूक करुन आपला परिसर प्रदूषणमुक्त राहाण्यासाठी हातभार लावला पाहिजे. ओ.एन.जी.सी.च्या या तेलगळतीमुळे काही पट्ट्यात मासेमारी धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या एकतर मच्छीचा दुष्काळ असताना या घटनेमुळे दुष्काळात तेरावा महिना ही घटना ठरली आहे. ओ.एन.जी.सी.ने या घटनेतून बोध घ्यावा आणि यापुढे अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेण्यासाठी आत्तपासूनच पावले टाकावीत.
-------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel