-->
संपादकीय पान--चिंतन--१० ऑक्टोबर २०१३
--------------------------
बँकिंगमधील नारीशक्तीचा विजय 
----------------
देशातील सर्वात मोठ्या असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी गेल्या दोन शतकाच्या इतिहासात प्रथमच एका महिलेची निवड झाली आहे. अरुंधती भट्टाचार्य यांची झालेली ही निवड म्हणजे देशातील बँकिंग उद्योगातील नारीशक्तीचा एक मोठा विजयच आहे. नारीशक्तीचा हा गजर केवळ मुंबईच्या स्टेट बँकेच्या मुख्यालयातच झाला नाही तर अलिबागसारख्या निमशहरी भागातही असलेल्या अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सुप्रिया पाटील समर्थपणे सांभाळत आहेत. त्यामुळे जो सन्मान स्टेट बँकेने आता महिलेची अध्यक्षपदी निवड करुन केला हा सन्मान अलिबागने यापूर्वीच सुप्रियाताईंचा करुन आपण एक पाऊल पुढे असल्याचे दाखवून दिले आहे.
देशातील बँकिंग व्यवस्था ही अर्थव्यवस्थेचा कमा समजला जातो. हा कणा जर मजबूत असेल तर आपण अधिक कार्यक्षमतेने काम करु शकतो. बँकिंग उद्योगात प्रमुख्याने राष्ट्रीयीकरण झाल्यापासून महिलांचे मोठे योगदान आहे. नोकरी करुन तसेच आपले घरची कामे सांभाळत या महिलांनी आपले करियर या क्षेत्रात मोठ्या समर्थपणे केले आहे. अरुंधती भट्टाचार्य या ३६ वर्षांपूर्वी प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून स्टेट बँकेत लागल्या. अनेक जबाबदारीची पदे त्यांनी भूषविली. केवळ देशातच नव्हे तर विदेशात म्हणजे अमेरिकेत स्टेट बँकेच्या अधिकारी म्हणून काम केले. गेले ३६ वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. गेले काही वर्षे त्या स्टेट बँकेची उपकंपनी एस.बी.आय. कॅपिटलची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. २००० साली सरकारने वीमा उद्योग खासगी उद्योगांना खुला केला त्यावेळी स्टेट बँकेने विमा व्यवसायाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती. यात त्यांनी चमकदार कामगिरी केल्याने त्यांचे नेतृत्व ठसठशीतपणे अर्थमंत्रालयाच्या नजरेत आले. त्यामुळे आज ना उद्या अरुंधती यांना स्टेट बँकेत मोठी जबाबदारी मिळणार हे उघड होते.
देशातील बँकिंग उद्योगात महिलांनी गेल्या दशकात अनेक बँकांचे नेतृत्व करुन आपला ठसा उमटविला आहे. यात एच.एस.बी.सी.च्या नैनालाल किडवाई, आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या चंदा कोचर, ऍक्सीस बँकेच्या शिखा शर्मा यांनी खासगी बँकांचे नेतृत्व केले आहे. तर राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अलाहाबाद बँकेच्या शुभलक्ष्मी पानसे, बँक ऑफ इंडियाच्या व्ही.आर.अय्यर,सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या दारुवाला, रिझर्व्ह बँकेच्या उपाध्यक्षा किशोरी उदेशी, रिझर्व्ह बँकेच्या उपाध्यक्षा उषा थोरात यांचा समावेश आहे. मात्र स्टेट बँकसारख्या एवढ्या मोठ्या बँकेच्या नेतृत्वपदी आजपर्यंत कुणी महिला नियुक्त झाली नव्हती. परंतु ही उणीवही आता भरुन निघाली आहे. जगात अनेक बँकांचे नेतृत्व महिलांनी केले आहे. अनेक कंपन्यांच्या सी.ई.ओ.पदी महिला असतात. आपल्याकडेही आर्थिक उदारीकरणाचे युग सुरु झाल्यापासून महिलांकडे बँकिंग उद्योगातले नेतृत्व येण्यास सुरुवात झाली. नोकरी करणार्‍या महिलांचेच प्रश्‍न महिलांचे नेतृत्व असेल तर ते बरोबर ओळखू शकतात. त्यामुळे अरुंधती भट्टाचार्य यांनी आपली निवड झाल्यावर दिलेल्या मुलाखतीत गरज भासेल त्यावेळी महिलंना दीर्घ रजा देण्याची पध्दती सुरु करण्याचे जाहीर केले आहे. अनेकदा महिलांना आपल्या करिअरमध्ये घरगुती जबाबदार्‍यांमुळे दीर्घकालीन रजा घ्यावी लागते. अनेकदा ही रजा मिळत नाही. किंवा त्यांच्यावर आपल्या नोकरीचा राजीनामा देण्याचीही पाळी येते. एकदा राजीनामा दिला की त्यांच्या करिअरमध्ये खंड पडतो. यावर उपाय म्हणून अरुंधरी यांनी प्रदीर्घ रजा देण्याचा जो प्रस्ताव सुचविला आहे त्याचा सर्व महिला स्वागतच करतील.
------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel