-->
संपादकीय पान-- अग्रलेख--१० ऑक्टोबर २०१३
--------------------------
दुपरीकरण विकासाची गुरुकिल्ली ठरेल
--------------------
स्थापनेच्या पाव दशकाच्या उंबरठ्यावर असलेल्या कोकण रेल्वेने आता दुपदरीकरणाची तसेच विद्युतीकरण करण्याची महत्वाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे कोकणापासून केरळपर्यंतच्या किनारपट्टीवरील सर्व नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. रोह्यापासून खरे तर कोकण रेल्वेची हद्द सुरु होते. त्यातील पनवेल ते आपटा या मार्गाचे दुपरीकरणाचे काम पूर्णही झाले आहे. रोह्यापासून कोकण रेल्वेचा मार्ग एकपदरी आहे. रेल्वेच्या एकेरी वाहतूक मार्गावरुन दररोज किमान ४० गाड्या धावू शकतात. परंतु कोकण रेल्वेच्या मार्गावरुन दररोज ५५ गाड्या धावतात. यात कोकण रेल्वेची कार्यक्षमता दिसून येतेच शिवाय या मार्गावरील वाढती गर्दीही नजरेआड करता येत नाही. या मार्गावर दर वर्षी प्रवाशांची संख्या वाढतच चालली आहे. वर्षात सुमारे ५०० विशेष गाड्या सोडल्या जातात तरी ही मागणी संंपत नाही. त्यामुळे कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाची आवश्यकता आहे हे सिध्द होते. सध्या कोकण रेल्वेच्या गाड्या डिझेलवर चालतात आणि त्याासाठी दरवर्षी सुमारे २५० कोटी रुपये खर्च येतो. मात्र या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण केल्यास १५० कोटी रुपये खर्च येईल. तसेच मोठ्या प्रमाणावर इंधनाची बचत होईल. कोकण रेल्वेने भविष्यातील आपला विस्तार लक्षात घेऊन बहुतांशी भागातील जागा यापूर्वीच ताब्यात घेतलेली आहे. त्यामुळे जमिन ताब्यात घेण्यासाठी फारसा खर्च येणार नाही. तरी देखील रेल्वे रुळांची उभारणी व अन्य खर्चासाठी एकूण १५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे आणि त्यासाठी जागतिक बँकेने कर्ज देण्याचीही तयारी दाखविली आहे. जागतिक बँकेचे कर्ज मिळाल्यावर हा दुपदरीकरणाचा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास हरकत नाही. हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यावर कोकण रेल्वे एक महत्वाचा टप्पा पार करील. अ. बा. वालावलकर यांनी शतकापूर्वी कोकण रेल्वेची संकल्पना मांडली आणि ती साकार व्हावी यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरवठा केला. शेवटी केंद्रात जनता पक्षाची राजवट असताना या प्रकल्पाला खरी गती मिळाली. प्रा. मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस यांनी हा प्रकल्प साकारावा यासाठी पाठपुरवठा केला. अखेरीस आपटा येथे कोकण रेल्वेचा शुभारंभ झाला त्यावेळी कोकणवासीयांना वाटू लागले की आपले प्रदीर्घ काळ जपलेले हे स्वप्न साकारणार. अनेक अडथळे पार करीत पूर्णत्वास गेलेली कोकण रेल्वे म्हणजे हे एक अभियांत्रिकीतले आश्‍चर्य आहे असे सांगून त्याकाळी बी.बी.सी.ने त्यावर एक लघु चित्रपट तयार केला होता. कोकण रेल्वेची उभारणी ही बहुतांशी भारतीय तंत्रज्ञानातून झाली असून त्याकाळी त्याचे असलेले व्यवस्थापकीय संचालक ई. श्रीधरन यांना याचे मोठे श्रेय जाते. पुढे याच कोकण रेल्वेने आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करुन काश्मीरातही रेल्वे सुरु करुन दिली. कोकण रेल्वे सुरु झाली तरी कोकणी माणसाच्या यातना काही संपल्या नाहीत. कारण रेल्वेसाठी जमिनी घेतलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याची अजून तड लागलेली नाही. त्यांना पुरेसा मोबदला किंवा कोकण रेल्वेत नोकरी देण्याच्या मागण्यांची पूर्तता केलेली नाही. प्रकल्पग्रस्थांची एक पिढी आपल्याला न्याय मिळेल या आशेवर जगते आहे. परंतु रेल्वेने त्यांना काही अजून न्याय दिलेला नाही. एवढेच कशाला कोकणातील रेल्वे स्थानकावर असलेले स्टॉल स्थानिकांना देण्याच्या मागणीलाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. सध्या कोकण रेल्वेच्या फलाटांवरील बहुतांशी स्टॉल हे बाहेरच्या लोकांचे आहेत. एकीकडे कोकण रेल्वेने स्थानिकांच्या व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना अजून न्याय दिला नसताना कोकणातील प्रवाशांवरही गाड्यांच्या कमी संख्येमळेे अन्याय होतो. सद्या कोकणातून अनेक लांब पल्याच्या गाड्या खाली दक्षिणेत तसेच उत्तरेतही जातात. या गाड्यांमुळे कोकणातील लोकांना कमी पल्यांच्या गाड्या कमी उपलब्ध होतात. दीर्घ पल्याच्या गाड्यांना सर्व थांबे मिळत नसल्याने स्थानिक कोकणातील लोकांना या गाड्यांचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुले कोकणातील प्रवाशांवर अन्याय होतो. त्यामुळे कोकण रेल्वे ही नावापुरतीच कोकणाची आहे अशी ठाम समजूत झाली आहे आणि ती काहीच चुकीची नाही. आता कोकण रेल्वेचे दुपदरीकरण झाल्यावर ही तक्रार दूर होण्यास मदत होईल. कोकण रेल्वेमुळे कोकणातील चित्र पालटण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यात रोहा, कोलाड, माणगाव, गोरेगाव, वीर, विन्होरे अशी स्थानके येतात. गेल्या काही वर्षात रायगड जिल्ह्यात कारखानदारी मोठ्या प्रमाणात वाढली. यातून रेल्वेचीही वाहतूक वाढण्यास मदत झाली आहे. दुपदरीकरणाबरोबर कोकण रेल्वेच्या मार्गावर काही जोड मार्गही सुरु करण्याची गरज आहे. यातील एक महत्वाचा मार्ग म्हणजे रत्नागिरी ते कोल्हापूर. या मार्गाची उभारणी झाल्यास कोकण व पश्‍चिम महाराष्ट्र जोडण्यास मदत होणार आहे. यातून मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे वाढू शकतील. यातून रोजगाराची निर्मिती होईल. आजवर ज्या भागात रेल्वे पोहोचली त्या भागाचे चित्र पालटले आहे. तेथे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. कोकण रेल्वेमुळे ही असे होण्यास मदत झाली आहे. मात्र अजूनही आपल्याला कोकण रेल्वेचा पुरेपुर उपयोग करुन घेता आलेला नाही. कदाचित दुपरीकरणानंतर आपण कोकणाच्या विकासाला आणखी वेग येऊ शकेल. त्यामुळे आपण उशीरा का होईना येऊ घातलेल्या या दुपरीकरणाच्या प्रस्तावाचे स्वागत करावयास हवे. कोकण रेल्वे या भागातील लोकांच्या विकासाची गुरुकिल्ली ठरु शकेल.
------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel