-->
संपादकीय पान गुरुवार दि. २० फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
भारती एअरटेलची आक्रमक चाल 
-----------------------------------
देशातील टेलिकॉम उद्योगातील सर्वात मोठी कंपनी भारती एअरटेलने मुंबईतील लूप मोबाईल ही कंपनी ७०० कोटी रुपयांना खरेदी केली आहे. लूप मोबाईल ही पूर्वी बी.पी.एल. मोबाईल या नावाने ओळखली गेलेली कंपनी प्रदीर्घ काळ विक्रीच्या रडारवर होती. अलीकडेच झालेल्या स्पेक्ट्रमच्या लिलावात ही कंपनी सहभागी झाली नव्हती. त्यावरुन ही कंपनी आपला कारभार गुंडाळण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट झाले होते. ही कंपनी खरेदी करण्यासाठी व्होडाफोन तसेच काही विदेसी कंपन्या उत्सुक होत्या. मात्र त्यांच्यामध्ये भारती एअरटेलने बाजी मारली. अशा प्रकारे मोबाईल सेवेत आक्रमकतेने वाटचाल करणार्‍या भारतीने आजही तब्बल दोन दशकानंतर आपली आक्रमक वाटचाल कायम राखल्याचे ही कंपनी ताब्यात घेतल्याने स्पष्ट दिसते. लूप मोबाईल ही कंपनी आता बहुदा नजिकच्या काळात भारती एअरटेलमध्ये विलिन होण्याची शक्यता असल्याने देशातील ही सर्वात जुनी मोबाईल कंपनी आता संपुष्टात येणार आहे. आपल्याकडे मुंबई-दिल्ली या शहरात पहिली मोबाईल सेवा सुरु झाल्यावर ज्या कंपन्या स्थापन झाल्या त्यात लूप मोबाईल ही कंपनी होती. त्यावेळी तिचे नाव ह्युचसन मोबाईल असे होते. मुंबईची मोबाईलची बाजारपेठ ही अत्यंत प्रीमियम बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. अशा या बाजारपेठेत आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी व्होडाफोन व एअरटेल या दोन कंपन्यांत जबरदस्त स्पर्धा असते. आता लूप ताब्यात आल्याने त्यांचे सुमारे ३० लाख ग्राहक, ४०० टेलिकॉम टॉवर, लूपच्या नेटवर्कची इलेक्ट्रॉनिक उपकरणे आता भारतीच्या ताब्यात येणार आहेत. मुंबईतील लूपचा ग्राहक हा बहुतांशी पोस्ट पेड असून त्यांचे उत्पन्नही चांगले आहे. आता त्यांचे हे ३० लाख ग्राहक गृहीत धरले तर एअरटेलच्या मुंबईतील ग्राहकांची संख्या आता ७१ लाकांवर पोहोचणार आहे. त्याखालोखाल व्होडाफोनचे ग्राहक ६९ लाख आहेत. त्यामुळे भारतीने मुंबईच्या बाजारपेठेत आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळविले आहे. दिल्ली बाजारपेठेतही एअरटेलचाच वरचश्मा आहे. देेशातील झपाट्याने वाढणार्‍या मोबाईल टेलिकॉमच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर कंपन्यांची विलिनीकरणे झाली होती. परंतु २००८ पासून या उद्योगातील विलिनीकरणाची प्रक्रिया थंडावल्यासारखी झाली होती. २००८ साली आयडिया सेल्युलर या कंपनीने स्पाईस टेलिकॉम ही कंपनी खरेदी केल्यानंतर या क्षेत्रात एकही विलिनीकरण झाले नव्हते. आता पुन्हा एकदा ही प्रक्रिया सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत. गेली दशकभर टेलिकॉम उद्योग आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढत असताना या उद्योगात अनेक कंपन्या आल्या होत्या. व्होडाफोनसारखी बहुराष्ट्रीय कंपनीही आली. मात्र यात भारतीय कंपन्यांनी आपली पावले दमदारपणे रोवली होती. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आव्हान एअरटेल, आयडिया, टाटासारख्या भारतीय कंपन्यांनी पेलले. मात्र अनेक कंपन्या काळाच्या ओघात अन्य कंपन्यांत तरी विलिन झाल्या किंवा त्यांना आपले दुकान बंद करावे लागले. आता मोबाईलची बाजारपेठ मंदावत चालली असताना आपल्याकडे पुन्हा एकदा कंपन्यांच्या ताब्यात घेण्याची प्रकरणे होणार आहेत. यातील बी.एस.एन.एल. ही सरकारी कंपनी सरकारच्या आर्थिक पाठबळावर पांढरा हत्ती म्हणून उभी आहे. मात्र खासगी कंपन्यांमध्ये अजून काही कंपन्या विकल्या जातील अशी अपेक्षा आहे. गेल्या दोन वर्षात मोबाईलची बाजारपेठ विस्तारण्यावर अनेक मर्यादा आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर काही मोबाईल कंपन्यांची दमछाक झाली आहे. परिणामी अनेक कंपन्या ताब्यात घेण्याची व विलिनीकरणाची प्रक्रिया सुरु होणार आहे.
------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel