-->
संपादकीय पान गुरुवार दि. २० फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
छनछनाट बंद करा
-------------------------
पनवेल परिसरातील लेडीज बारमधील छनछनाट पुन्हा एकदा जोरात सुरु झाला आहे. सध्या लेडिज बारवर बंदी आहे, त्यामुळे सर्व्हिस बार तर कधी ऑकेस्ट्राच्या नावाखाली हे बार सुरुच आहेत. अलीकडेच येथील बारमध्ये काम करणार्‍या तीन हजारहून मुलींची चाचणी केली असता त्यापैकी ६५ जणींना एड्‌सची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे या डान्सबारमुळे केवळ सामाजिक प्रश्‍न भेडसावित नाही तर त्या जोडीला आरोग्याचाही प्रश्‍न आहे. पनवेलच्या या परिसरात मोठ्या प्रमाणावर लॉज आहेत. येथे जवळपास ६५च्या वर लॉज असण्याचे मुख्य कारण हे येथे वेश्याव्यवसाय चालतो आणि एड्‌स झालेल्या या मुलींची संख्या पाहता मोठ्या प्रमाणावर या जीवघेण्या रोगाची लागण दररोज शेकडो जणांना होण्याचा धोका आहे. गेल्या काही वर्षात डान्स बारवर बंदी घातल्यावर येथे छनछनाट बंद झाला होता. मात्र आता पुन्हा विविध रुपाने हा व्यवसाय बहुरु लागला आहे. याला जबाबदार आहेत ते पोलिस खाते. सरळसरळ हाप्ते खाऊन येथे पोलिस हे अवैध धंदे सर्रास सुरु ठेवतात. पोलिसांच्या आशिर्वादाशिवाय हे धंदे सुरु राहणे अशक्य आहे. आपल्याला ठोस कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितल्यामुळे या लेडीज बारवर अंकुश कोणाचा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र पोलीस व उत्पादन शुल्क अधिकार्‍यांचे हात ओले होत असल्यामुळे ते काही ना काही तरी कारण दाखवून आपले हात कसे बांधलेले आहेत असे दाखवित असतात. जर पोलिसांनी व या उत्पादन शुल्कवाल्यांनी ठरविले तर ते हे बार बंद पाडू शकतात. पनवेल परिसरात २३ लेडीज बार आहेत. मात्र या बारवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. शहरातील या सर्वच बारमालकांनी सरकारी दरबारी हजेरी लावून आपला मार्ग सुकर केल्याचे चित्र दिसून येते. नोकरनामे घेताना राज्य उत्पादन शुल्क विभाग त्या बारमधील महिला कर्मचार्‍यांची योग्यरित्या पडताळणी करत नाही, त्यामुळे अनेकदा लेडीज बारमध्ये काम करणार्‍या मुली या बांगलादेशी नागरिक असल्याचा आरोप पोलिसांवर होतो. केवळ आरोपच नाही तर येथे बांगला देशी मुली काम करीत आहेत आणि याकडे योयीस्कररित्या डोळेझाक केली जाते. अधिकार कमी असूनही प्रसारमाध्यमे आणि समाजात पोलीस दल या बारसंस्कृतीमुळे बदनाम होत असल्याची हतबलता सहायक आयुक्त सूर्यवंशी यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. पोलिसांच्या कृपादृष्टीशिवाय हे अवैध धंदे सुरुच राहाणार नाहीत. शुल्क विभाग बारममध्ये काम करणार्‍या महिलांना नोकरीचे परवाने देतात. हे परवाने मुंबई विदेशी दारू१९५३ कायद्याच्या कलम ४९ अन्वये पोटकलम २ नुसार बारमालकांच्या देखरेखीखाली देते. बारमध्ये काम करणार्‍या महिला या सरकारी नव्हे तर खासगी डॉक्टरांचे एचआयव्ही नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, ओळखपत्र, वयाचा पुरावा, राहण्याचा पत्ता असे स्वत:चे प्रतिज्ञापत्र करून या विभागाकडे जमा करतात. या मुलींचे प्रतिज्ञापत्र पडताळणी प्रमाणपत्र पोलिसांकडून पडताळणी करून देण्यासंबंधीचा नियम नाही. तशी कायद्यामध्ये तरतूद करणे गरजेचे आहे. मनोरंजन,खाद्य परवाना तसेच ऑर्केस्ट्रा परवाने पोलीस विभागाकडून दिल्यानंतर या बारच्या परमिट रूमच्या परवान्याबाबत कार्यवाही सुरू होते, असे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. पंरतु हे सर्व नियम व कायदे सर्व धाब्यावर बसविले जातात. डान्स बारमुळे अनेकांचे संसार उद्धस्थ झाले. पनवेल हा परिसर या व्यवसायासाठी अत्यंत मोक्याचा आहे. मुंबई-पुण्यापासून जवळ त्यामुळे या दोन महानगरातील नवश्रीमंत, काळे धंदे करुन पैसा कमविलेले सरकारी नोकर येथे येऊन लाखो-करोडो रुपये उडवित असत. त्याशिवाय पनवेल व त्याच्या परिसरातील जमीनींना सोन्याचे दर आल्यामुळे एका झटक्यात करोडपती झालेले या विभागातले तरुण या छनछनाटाावर पैसे उधळण्यास शिकले. यातून हजारो लोक एका रात्रीत रस्त्यावर आले. अनेक बायका व त्यांची कुटुंबे देशोधडीला लागली. शेवटी सरकारने या डान्स बारवर बंदी घातली, खरी परंतु या पैशातून गब्बर झालेल्या बार डान्सच्या मालकांनी न्यायालयीन लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढविली. शेवटी न्यायालयाने डान्स बारवरील बंदी उठविली. मात्र यासाठी लागणारे परवाने पुन्हा न देण्याबाबत सरकार ठाम असल्याने या डान्स बारचे दरवाजे अधिकृतरित्या काही उघडले नाहीत. शेवटी कायद्याच्या पळवाटा शोधीत हे बार वेगवेगळ्या सेवांच्या नावाखाली सुरु झाले. सरकारने या डान्स बारवर बंदी घातली. मात्र येथे काम करणार्‍या बार बालांचा काही विचार केला नाही. त्यांना मात्र उघड्यावर टाकले. खरे तर त्यांचे पुर्नवसन केले असते तर त्या वेश्याव्यवसायात ढकलल्या गेल्या नसत्या. परंतु सरकारने डान्सबारवर बंदी घातली खरी मात्र त्याचे होणारे अन्य सामाजिक-आर्थिक परिणाम काही तपासले नाहीत. डान्सबारने गेल्या दशकभर आपला समाज ढवळून काढला आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे ते येथे डाऊन पैसे उधळतात, ज्याच्याकडे पैसा आहे ते भविष्याची कोणतीही चिंता न करता पैशाची उधळण करतात. यातून काही मोजक्या बारबाला करोडपती झाल्याची उदाहरणे ाहेत. एकूणच बार संस्कृतीमुळे आपल्याकडील सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक तोल ढासळला आहे. याचा कुणीच विचार करावयास तयार नाही. डान्सबार मग ते कोणत्याही नावाखाली असोत त्यावर बंदी घातली गेली पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी कडकरित्या झाली पाहिजे. ज्या पोलिस अधिकार्‍यांच्या हद्दीत डान्सबार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. तरच हे डान्सबार बंद होतील आणि हा छनछनाट बंद होईल.
-----------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel