-->
संपादकीय पान सोमवार दि. ३ फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
महाराष्ट्र क्षयरोगाची राजधानी का?
-------------------------------
आर्थिकदृष्ट्या संपन्न व चांगले दरडोई उत्पन्न असलेल्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात क्षयरोग झपाट्याने वाढत आहे. २०१३ सालची आकडेवारी पाहिल्यास आपल्याला असे आढळते की, देशाचा विचार करता महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १.४ लाख रुग्ण आढळले. त्याखालोखाल आंध्रप्रदेश, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, मध्यप्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक या राज्यांचा क्रमांक लागतो. खरे तर आपल्या देशातून क्षयरोगाचे प्रमाण गेल्या दशकात कमी झाले होते. परंतु अलीकडच्या काळात क्षयरोग पुन्हा उफाळून वर आल्याचे जाणवत आहे. त्यात महाराष्ट्र हे या रोगाची राजधानी ठरली आहे. क्षयरोगाची औषधी ही पूर्णपणे मोफत दिली जातात. याचे वितरण राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे केले जाते. मात्र ज्या गतीने हा रोग फैलावत आहे ते पाहता या औषधांचे योग्य वितरण होत नसल्याची शंका व्यक्त होत आहे. काही ठिकाणी रुग्ण हे क्षयरोगांच्या औषधाला योग्य प्रतिसाद देत नसल्याचेही आढळले आहे. त्यामुळे आता ज्या रुग्णांना औषधांचा गुण येत नाही त्यांना औषधे बदलून देण्यात येणार आहे. मुंबईसारख्या महानगरात दरवर्षी ३० हजार क्षयरोग झालेल्या रुग्णांची नोंद होते. सध्या क्षयरोगावर पाच टप्प्यात उपचार केले जातात. पहिल्या टप्प्यातील औषधांचा गुण न आल्यास पुढील टप्प्यातील औषधे दिली जातात. शेवटच्या पाचव्या टप्प्यातील औषधांसाठी नऊ महिन्यांचा कालावधी जातो. पूर्वी क्षयरोग या कमी उत्पन्न गटातील लोकांमध्ये सकस आहार न घेतल्याने होतो असे आढळते असे. परंतु आता अनेक उत्तम आर्थिक स्थिती असलेल्या घरातही क्षयरोगाचे रुग्ण आढळल्याने हा रोग आता सर्व आर्थिक थरात पोहोचला आहे, हे सिध्द झाले. हा रोग झपाट्याने वाढत असतानाही आपली सरकारी यंत्रणा मात्र थंड आहे. क्षयरोग हा प्रामुख्याने अजून विकसनशील देशातच आढळतो. विकसीत देशात याचे प्रमाण अतिशय अल्प आहे. भारतात क्षयरोगाचे प्रमाण गेल्या काही पर्षात पुन्हा एकदा वाढू लागले आहे. या आजारामुळे आपल्याकडे १० लाख दिवस उत्पादकतेचे गमावले आहेत असे जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे. क्षयरोग हा आता काही गंभीर राहिलेला नाही. औषध उपचाराने माणूस बरा होऊ शकतो. मात्र यासाठी क्षयरोगाचे निदान वेळेवर होण्याची गरज असते. त्यानंतर रोगी औषध उपचारास लगेच योग्य प्रतिसाद देऊ लागल्यास झपाट्याने त्याची प्रकृती सुधारु शकते. केंद्र सरकारने १९९७ साली क्षयरोगाच्या निर्मुलनासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना हाती घेतल्या. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचेही पाठबळ त्यांना लाभले होते. या योजनेनुसार सरकारने रोग्याला गोळ्यांव्दारे उपाययोजना सुरु केली. यएा औषदांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि जवळपास ८५ टक्के क्षयरोगग्रस्तांना या औषदांव्दारे गुण आला. त्यामुळे सरकारचा हा प्रयोग यशस्वी होण्याची चिन्हे दिसू लागली होती. २०१० साली सरकारने या कार्यक्रमाची दिशा बदलली आणि त्यात क्षयरोगाचे निदान आधुनिक चाचणींव्दारे करणे व औषधे बदलण्यात आली. आपण ज्या प्रकारे आपल्या देशातून पोलियो हद्दपार केला त्या धर्तीवर क्षयरोग देखील संपवून टाकण्याचा निर्धार केला पाहिजे. गेल्या काही वर्षात क्षयरोगाचे रुग्ण वाढू लागलेले असताना त्याची राजधानी महाराष्ट्र असावी ही आणखी एक धक्कादायक बाब आहे. यासाठी सरकारने नव्याने काही ठोस उपाययोजना हाती घेतल्यास आपण क्षयरोगाचे प्रमाण घटवू शकतो.
---------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel