-->
संपादकीय पान शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
तेलंगणाच्या स्थापनेनंतर...
------------------------------
आंध्रप्रदेशाचे विभाजन करुन तेलंगणा या नवीन राज्याचा जन्म अखेर झाला आहे. एखाद्या राज्याचे विभाजन करुन त्यातील एका तुकड्याला बाजूला काढून त्याचे नवीन राज्य स्थापन करणे ही एक राजकी, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या अवघड प्रक्रिया आहे. स्वतंत्र्य तेलंगणाचा लढा हा गेली तीस वर्षाहून जास्त काळ होता. त्याचबरोबर आंध्र हा एकसंघ राहावा याचे समर्थन करणारेही तेवढेच आक्रमक होते. तेलंगणा संतंत्र राज्य म्हणून स्थापन होण्यासाठी अलीकडच्या काळात मोठी आंदोलने,उपोषणे, हिंसक निषेध झाले. सरकारने स्वतंत्र तेलंगणा करण्याची आश्‍वासने दिली होती. परंतु त्याची पूर्तता कित्येक वर्षे होत नव्हती. गेल्या वर्षभारात प्रामुख्याने निवडणुका जवळ येत असल्याने स्वतंत्र तेलंगणाच्या लढ्याला वेग येत होता. सरकारने स्वतंत्र्य तेलंगणा करण्याचे आश्‍वसान तर दिले होते. मात्र त्याची पूर्तता करेपर्यंत सरकारच्या नाकीनऊ आले. म्हणजे स्वतंत्र्य तेलंगासाठी जेवढा तीव्र लढा होता तेवढाच आक्रमक लढा हा आंध्र प्रदेश एकसंघ राहाण्यासाठी होता. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन कॉँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे राज्यातली सर्व राजकीय गणिते बदलण्याच्या स्थितीत आहेत. गेल्या दशकभरातील घडामोडींनी तेलंगण राज्य निर्माण करणे अपरिहार्यच ठरले होते. आता राज्य निर्माण झाल्यानंतर अनेक शक्यतांना जन्म दिला आहे. त्यांचा अंदाज बांधून पुढील राजकीय डावपेच आखले जातील. खरे म्हणजे तेलंगण राज्यनिर्मितीचा निर्णयसुद्धा अनेक शक्यतांचा अर्कच होता. स्वतंत्र तेलंगण राज्य निर्माण करण्यासाठी तेलंगण राष्ट्र समिती (तेरास) गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करीत होती. तेरासचे नेते के. चंद्रशेखर राव यांचे नेतृत्वच मुळात या एका मुद्दावर टिकून होते. त्यामुळे राव यांच्या दृष्टीने तेलंगण राज्यनिर्मिती अस्तित्वाची लढाई होती. ही लढाई ते त्याच पातळीवर लढत होते. तेलंगण भागातून तेरासला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर तेलंगण राज्य निर्माण करणे ही राजकीय अपरिहार्यता बनली. लोकशाहीत लोकांची इच्छा अंतिम असते. तेलंगण भागातील लोकांना तेलंगण राज्य हवे होते. त्यानुसार ते निर्माण झाले आहे. मोठया राजकीय निर्णयांतून काही लाभ जसे मिळतात, तसेच काही तोट्यांचाही सामना करावा लागतो. एक प्रश्न मिटविल्यानंतर त्यातून दुसरे अनेक प्रश्न होत असतात. ही भारतीय लोकशाहीचीच अपरिहार्यता आहे, असे म्हणावे लागते. तेलंगण राज्याने अशा अनेक अपरिहार्यतांना जन्म दिला आहे. नव्या राज्याची निर्मिती झाल्यानंतर तेलंगण भागात कॉंग्रेसला मोठा राजकीय लाभ होईल, हे निश्‍चित; पण उरलेल्या सीमावर्ती आंध्र प्रदेशाचे काय? तेथील जनभावना पेटविण्याचे काम विरोधी पक्ष करीत आहेत. त्यावर तोड काढण्यासाठी कॉंग्रेसला नवे डावपेच आखावे लागणार आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे कॉंग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. रेड्डी यांचा राजीनामा हा त्यांचा स्वत:चा निर्णय आहे की, कॉंग्रेसच्या डावपेचांचा भाग आहे, हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे. भाषिक भारतीय इतिहास, भूगोल आणि समाजरचना एकजिन्सी नाही. विविधतेने भरलेली आहे. ही रचना इतकी व्यामिश्र आहे की, त्यातून हितसंबंधांचा संघर्ष होणे अटळ ठरते. ही विधिता आजची नाही. काही हजार वर्षांचा इतिहास तिला आहे. तेलंगण आणि आंध्र हे भूभाग स्वातंत्र्यानंतर एकत्र नांदत होते हे खरे; पण ते इतिहासात एक नव्हते. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व किमान दीड हजार वर्षे जुने आहे. दक्षिणेकडील अनेक राजवंशाचा उदय आंध्रच्या भूमीतूनच झाला आहे. याच मुद्यावरून स्वतंत्र तेलंगण राज्याची मागणी होत होती. आधुनिक इतिहासातही हे दोन्ही प्रदेश स्वतंत्रच होते. स्वातंत्र्यपूर्व काळात तेलंगण निजाम राजवटीखाली होते. सीमांध्र प्रदेश निजाम राजवटीचा भाग नव्हता. स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना झाली, तेव्हा हे दोन्ही भाग एकत्र करून आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. या प्रक्रियेत तेलंगणचे अस्तित्वच नष्ट झाले. त्यामुळे तेथे सुप्त असंतोष होता. असंतोषाच्या या सुप्त अग्नीला के. चंद्रशेखर राव यांनी फुंकर मारली. त्यातून भडका उडाला आणि तेलंगण राज्य निर्माण करणे अपरिहार्य ठरले. तेलंगणाच्या निर्मितीनंतर येथील प्रश्‍न सुटलेले नाहीत. उलट या प्रश्‍नांची व्याप्ती अधिकच वाढली आहे. तेलंगणाच्या निर्मितीनंतर आता काही प्रमाणात राजकीय फायदा उठविण्याचा कॉँग्रेस जर करणार असेल तर तो त्यांना मिळेलच असे नाही. कारण तेलंगणाच्या निर्मितीनंतर आंध्रमधील एक मोठा गट नाराज झाला आहे. यात अनेकांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. आता या दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी होणार्‍या हैदराबाद हे शहर सध्याच्या तेलंगणात येत असले तरीही त्यावर आता दोन्ही राज्यांची मालकी असेल. त्यामुळे हैदराबादमध्ये दोघांचेही पाय अडकलेले आहेत. तेलंगणामध्ये १९४९ साली कम्युनिस्टांचा सशस्त्र उठाव झाला होता. हा उठाव सरदार पटेलांनी मोडून काढला. त्यानंतर येथे नक्षलवाद्यांनी आपली पाळेमुळे घट्ट केली. आजही तेलंगणाच्या अनेक भागात नक्षलवादाचे वर्चस्व आहे. त्यामुळे आता स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीनंतर नक्षलवाद डोके वर काढेल अशी भीती व्यक्त ेकली जात आहे. तेलंगणाचा आता झपाट्याने विकास होण्याची गरज आहे. एकीकडे आंध्रप्रदेशाने आय.टी.चे मोठे केंद्र म्हणून नावलौकीक कमविला असताना तेलंगणाने विकासाची कास धरुन तेथील लोकांचा जीवनस्तर कसा वाढेल याकडे पाहिले पाहिजे.
-------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel