-->
संपादकीय पान शनिवार दि. ११ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
राजअस्त्र मोदींवर
---------------------------
अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर सणकून टिका केली. गेले दोन वर्षे राज ठाकरे हे मोदी यांच्या बरेच प्रेमात होते. मोदी यांनी त्यांना आपल्या राज्यात आमंत्रण देऊन विकास कसा केला आहे बघायला बोलाविले होते. त्यानंतर राज ठाकरे हे तिकडे जाऊ आल्यापासून मोदींवर स्तुती स्तुमने उधळत होते. त्याबद्दल अनेकांना आश्‍चर्यही वाटत होते. त्यांच्या या मोदी प्रेमापोटी बहुदा शिवसेना भाजपा यांची युती तुटून भाजपा-मनसे अशी नवी युती जन्माला येईल किंवा भाजपा-शिवसेना-मनसे असा नवा त्रिकूट तयार होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु ही सर्व गणिते आता संपुष्टात आली आहेत. युतीने रामदास आठवलेच्या जोडीला आता राजू शेट्टींना आपल्यात समावून घेतल्याने मनसेचा यंदाही एकला चलो रे चा नारा असेल असे दिसते. किंवा मनसे अन्य कुणाबरोबर जाणार या प्रश्‍नाचे उत्तरही राज यांनी दिलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे यांनी मोदी यांच्यावर टीका करणे याला विशेष महत्व आहे. त्यांच्या या टीकेमुळे अनेक राजकीय निरिक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अर्थात राज ठाकरे हे मोदींसारख्या आत्मप्रौढी व्यक्तींचे नेत्ृत्व स्वीकारुन त्यांच्याबरोबरीने जाणे अशक्य होते. त्याचबरोबर राज ठाकरे हे मराठीव्देष कधीही सहन करणार नाहीत. नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून हा व्देश वेळोवेळी दिसला आहे. मोदी यांच्या झालेल्या मुंबई जाहीर सभेत त्यांनी मनसेला सोडा पण शिवसेनेलाही आमंत्रण दिले नव्हते. तसेच त्यांनी गुजरातच्या विकासाची छबी रंगवित असताना महाराष्ट्राला जे कमी लेखण्याचा धंदा केला ते राज यांना कपादी मान्य होणारे नव्हते. त्याचबरोबर मोदी यांनी आपल्या या सभेत शिवरायांचा उल्लेखही न करता सरदार वल्लभाई पटेल यांची स्तुती करण्याचा जो चंग बांधला होता ते देखील राज यांना पटणारे नव्हते. त्यामुळे राज यांनी बरेच दिवस आपले असलेले मौन मोदी यांच्यावर टिकास्त्र करुन अखेर सोडले. मोदींच्या या टीकेमुळे एक बाब स्पष्ट झाली की राज हे आता मोदींबरोबर जाणार नाहीत. त्यामुळे राज आपल्याबरोबर येतील ही भाजपाची भाबडी आशा संपुष्टात आली आहे. राज यांनी मोदी यांच्यावर टीका करताना उपस्थित केलेले मुद्दे हे महत्वाचे आहेत. पंतप्रधान हा एका राज्याचा नसावा, तो संपूर्ण देशाचा असावा ही राज यांनी मांडलेली भूमिका सर्वांना मनापासून पटणारी आहे. महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांना हे पटणार नाही. कारण त्यांचे ते नेते आहेत आणि त्यांची अशी ठाम समजूत झालेली आहे की मोदी हे आपल्यासाठी मते खेचणारे मशिन ठरणार आहे. परंतु तसे काही होणार नाही हे दिल्लीतील निवडणूक निकालाने दाखवून दिले आहे. भाजपाच्या नेत्यांचा मोदी यांच्यावर टीका केल्याने झालेला तिळपापड हा मनसे आपल्याबरोबर न येणार असल्यामुळे झालेला हा सात्विक संताप आहे. पंतप्रधानाने संपूर्ण देशाचा विचार केला पाहिजे, हे खरेच आहे. मोदी हे जिकडे जातील तिकडे गुजरातच्या विकासाची टिमकी वाजवित असतात. गुजरातचा विकास ही किती भंकस आणि पोकळ आहे हे अनेकांनी आकडेवारी दाखवून सिध्द केले आहे. परंतु मोदी व त्यांचे भाट हे न झालेले ठणकावून सांगत असल्याने आता खोट्या गोष्टीही खर्‍या वाटू लागल्या आहेत. राज ठाकरे हे देखील गुजरातचा विकास हा चकाचक रस्ते पाहून भूरळून गेले आणि त्यांनी स्तुती करण्यास सुरुवात केली होती. मात्र आता मोदी यांच्या भाषणात मराठीव्देशाचा वास आल्याने राज त्यांच्यावर बरसले आहेत. आजवर आपल्याला जे कुणी पंतप्रधान लाभले त्यांच्याकडे राष्ट्रीय दृष्टी होती. पक्षीय राजकारणाच्या बाहेर जाऊन देशाच्या हितासाठी काम करण्याची ज्याची तयारी आहे तोच पंतप्रधानपदी बसू शकतो. भाजपाच्या यापूर्वीच्या एन.डी.ए. आघाडीचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे एक खर्‍या अर्थाने राष्ट्रीय नेते होते. गुजरात दंगलीच्या काळात म्हणूनच त्यांनी मोदींना राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला होता. परंतु मोदींनी त्यांचा सल्ला मानला नव्हता. कारण मोदींना धर्मांद शक्तींनी वेढलेे होते, यात अजूनही बदल झालेला नाही. एखाद्या राज्यापुरती विकासाची संकुचित दृष्टी वाजपेयींकडे नव्हती. त्यामुळेच ते पंतप्रधान झाले होते याची दखल मोदींनी घेण्याची आवश्यकता आहे.
त्यामुळे मोदी हे पंतप्रधानपदी बसण्यास योग्य नाहीत हे राज यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. राज यांनी सोडलेले हे अस्त्र मोदींच्या व त्यांच्या महाराष्ट्रातील समर्थकांच्या वर्मी बसला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी विविध आघाड्यांची नांदी या निमित्ताने सुरु झाली आहे. राज ठाकरे हे एकटे जाणार की अन्य कोणाबरोबर जाणार हे अद्याप निश्‍चित झालेले नाही. त्यातूनच विजय कोणाचा होणार हे ठरणार आहे.
---------------------------------------    

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel