-->
संपादकीय पान--चिंतन--०९ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी--
-------------------------------------
आम आदमी पक्षाचा उदय
-------------------------
अरविंद केरजीवाल यांच्या आम आदमी पार्टीने अनपेक्षित अशा दुसर्‍या क्रमांकाच्या जागा दिल्ली विधानसभेसाठी पटकावून सर्वांना धक्का दिला आहे. सलग तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या शिला दिक्षित यांचा अरविंद केजरीवाल यांनी दारुण पराभव केला आहे. गेल्या काही दिवसात अरविंद केजरीवाल हे किंग मेकर ठरणार आहेत असा अंदाज बांधला जात होता तो खराच ठरला आहे. जेमतेम एक वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या पक्षाने राजधानी दिल्लीत जोरदार मुसंडी मारली आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनातील एक शिलेदार असलेल्या केजरीवाल यांनी अण्णांच्या पक्ष स्थापन न करण्याच्या भूमिकेपासून फारकत घेऊन आम आदमी पक्षाची स्थापना केली. अण्णा हजारेंना कोणत्याही राजकीय पक्षात थेट प्रवेश किंवा पक्षाला पाठिंबा देण्यास स्पष्ट विरोध केला होता. परंतु केजरीवाल यांच्यासारख्या खर्‍या अर्थाने राजकीय जाण असलेल्या नेत्याने कॉँग्रेस व भाजपाला पर्यायी पक्ष दिल्यास लोकांचा पाठिंबा मिळू शकतो हे बरोबर ओळखले आणि अण्णांपासून दूर जाऊन आम आदमी पक्षाची स्थापना केली. आम आदमी पक्ष हा अण्णांच्या आंदोलनाप्रमाणे या निवडणुकीत संपून जाईल असा अनेकांचा असलेला होरा खोटा ठरला आहे. या पक्षाचा नेमका पाया कोणता आहे? या पक्षाने कोणाची मते खाल्ली? असा आपल्याला प्रश्‍न पडेल. येत्या काही दिवसात त्याचे योग्य विश्‍लेषण होईलच. हा पक्ष फक्त भाजपाचीच मते खाणार हे देखील खोटे ठरले आहे. त्यांनी दोन्ही पक्षांची मते खाल्ली आहेत. मात्र नवशिक्षित, तरुण मध्यमवर्ग ज्याला कॉँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांचा विट आला होता असा वर्ग आम आदमीच्या मागे उभा राहिला असेच दिसते. कारण या वर्गाला एक चांगला पर्याय हवा होता. त्याला देशातील भ्रष्टाचाराबद्दल चीड आहे आणि देशासाठी काही तरी चांगले व्हावे असे वाटणारा हा वर्ग आहे. आजवर हा वर्ग कधीही निवडणुकीत मत द्यायला आला नाही. निवडणुकांच्या दिवशी आलेल्या सुट्टीत पिकनीकला जाण्यात हा वर्ग धन्य मानीत होता. परंतु त्याला आता देशात बदल पाहिजे आहे. आपण जो कर भरतो त्याचा योग्य विनियोग व्हावा, सर्वसामान्य लोकांसाठी दिलेला पैसा योग्य रित्या खर्च व्हावा अशी त्याची प्रामाणिक इच्छा आहे. दिल्लीत बलात्काराच्या घटनेनंतर हाच तरुण वर्ग रस्त्यावर चिडून उतरला होता. पूर्वीपार हा भाजपाचा किंवा कॉँग्रेसचा मतदार आहे. परंतु त्याने हे दोन्ही पक्षांचे कारभार पाहिले आहेत. त्यामुळेच देशात काहीतरी चांगले करण्यासाठी आम आदमी झटत आहे अशी त्याची भावना निर्माण झाल्यानेच त्याने त्यांना मतदार केले. पक्ष स्थापन झाल्यावर लगेचच सत्तेत आल्याचे उदाहरण म्हणून जनता पार्टीकडे पाहता येईल. परंतु हा पक्ष ज्या गतीने स्थापन झाला त्याहून जास्त गतीने संपुष्टात आला. आंध्रप्रदेशातील तत्कालीन लोकप्रिय सिनेनट एन.टी. रामाराव यांच्या तेलगू देसमचे असेच उदाहरण आहे. या पक्षाने आंध्रतील सत्ताधारी कॉँग्रेस पक्षाला नेस्तनाबूत करुन सत्ता काबीज केली. परंतु त्यांना पुढच्या निवडणुकीत पराभव पहावा लागला. आसाम मधील विद्यर्थी चळवळीतून स्थापन झालेल्या प्रफुलकुमार मोहंता यांच्या आसाम गण परिषदेने अशी चळवळीच्या माध्यमातून सत्ता मिळविली होती. त्याची तुलना आता आम आदमी पक्षाशी करता येईल. मात्र हा पक्ष देशात फोफावेल आणि सत्ता काबीज करेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. परंतु आम आदमी पार्टीने भाजपा नको व कॉँग्रेसही नको हे जे सूत्र लावून धरले ते देशात लोकप्रिय होऊ शकते. मात्र यासाठी देशपातळीवर नेतृत्व निर्माण होण्याची गरज आहे. आता आम आदमी पक्षाने भ्रष्टाचारमुक्तीची जी घोषणा दिली आहे त्यावर आधारीत काम करण्यात त्यांची कसोटी लागणार आहे. लोकांचा त्यांनी जो विश्‍वास संपादन केला आहे तो टीकविणे हे एक आव्हान असेल.
----------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel