-->
संपादकीय पान--अग्रलेख--०७ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी--
-------------------------------------
क्रांतिसूर्य मावळला
----------------------
दक्षिण आफ्रिकेची वर्णव्देषी राजवट संपुष्टात आणणारे व शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते तसेच गांधीवादी नेते नेल्सन मंडेला यांच्या निधनाने जगाच्या क्षितीजावरील क्रांतिसूर्य मावळला आहे. नेल्सन मंडेला हे केवळ दक्षिण आफ्रिकेचे नेते नव्हते तर जागतिक पातळीवरील स्वातंत्र्य चळवळीचे प्रणेते होते. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत गोर्‍या वर्णव्देशी राजवटीविरुध्द आंदोलन उभे केले. केवळ वर्णाच्या आधारावर दक्षिण आफिकेतील कृष्णवर्णीयांचे हक्क डावलले जात होते. त्यांना कोणतेही हक्क मिळत नव्हते आणि समानतेची वागणूकही नव्हती. खरे तर या कृष्णवर्णीयांना आपल्या हक्कांची जाणीवच नव्हती. ती जाणीव नेल्सन मंडेला यांनी निर्माण करुन दिली आणि वर्णव्देशी सरकारच्या विरोधात चळवळ उभारली. आपल्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेेडकरांनी जसे दलितांना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन दिली आणि त्यांना माणूस म्हणून जगण्यास शिकविले तशीच शिकवण नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांना दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनीच दक्षिण आफ्रिकेच्या या महान नेत्याचा मृत्यू व्हावा हा एक योगायोगच म्हटला पाहिजे. नेल्सन मंडेला हे ९० वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य जगले. त्यातील त्यांची जवळपास २७ वर्षे ही कारावासात गेली. यातून ते डगमगले नाहीत किंवा आपल्या निष्शयापासून ढळले नाहीत. महात्मा गांधी यांचे अहिंसेचे तत्वज्ञान त्यांनी आत्मसात केले. तरुणपणी त्यांनी मार्क्सवादाचे धडे घेतले होते. याच मार्क्सवादाने त्यांना वर्णव्देशी राजवटीविरुध्द लढण्याचे बळ दिले. उर्वरीत आयुष्यात मात्र त्यांच्यावर गांधीवादाची मोठी पकड होती. महात्मा गांधी ज्यावेळी दक्षिण आफ्रिकेत होते आणि त्यांना वर्णभेदावरुन रेल्वेच्या डब्यातून ढकलून देण्यात आले होते, त्याच गांधीजींनी भारतात परतून ब्रिटीशांविरुध्द लढा पुकारला. भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. मात्र गांधीजी ज्या घटनेमुळे भारतात परतले त्या दक्षिण आफ्रिकेतील वर्णव्देष संपुष्टात यायला ९० चे दशक उजाडावे लागले आणि नेल्सन मंडेला यांना भर तारुण्यात कारावास भोगावा लागला. त्यांच्या या प्रर्दी लढ्यामुळे नेल्सन मंडेला हे सर्व मानवाला समानतेवर आणणारे नेते ठरले. त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील वर्णव्देशी राजवटीविरुध्द दिलेल्या लढ्याची नोंद ही इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदविली गेली आहे. दक्षिण आफ्रिका हा या भूतलावरील वर्णव्देषाच्या वाईट प्रथेतून मुक्त होणारा शेवटचा देश होता. एक काळ असा आला होता की दक्षिण आफ्रिकेतील मुजोर वर्णव्देशी राजवट नेल्सन मंडेलांना बाहेरचे जग बघायला देणार नाही असे वाटत होते. परंतु त्याकाळी अलिप्त राष्ट्र देशांनी आन्तरराष्ट्रीय पातळीवर याबाबत दबाव वाढविला आणि मंडेला हे मुक्त झाले. १९९४ साली त्यांचा दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष म्हणून शपथविधी झाला आणि या देशाला पहिला कृष्णवर्णीय अध्यक्ष त्यांच्या रुपाने लाभला. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मंडेला यांनी अलिप्त राष्ट्र चळवळीला नेहमीच सहकार्य केले व ही चळवळ कशी बलवान होईल हे पाहिले. नेल्सन मंडेला हे अध्यक्ष झाल्यावरचा काळ हा मोठ्या जागतिक घडामोडींचा होता. सोव्हिएत युनियन हा देशच जगाच्या नकाशावरुन फुसला गेला होता. त्यामुळे अमेरिकेची एकहाती आता जगावर सत्ता राहाणार असे चित्र होते. अशा काळात अलिप्त राष्ट्र चळवळही क्षीण होत चालली होती. असे असले तरीही एक नवस्वातंत्र्य मिळालेला देश असूनही मंडेला यांच्या अध्यक्षपदाच्या काळात आपला वरचश्मा जागतिक राजकारणात उमटविला. जगात शांतता निर्माण व्हावी यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्यामुळेच त्यांना शांततेचे नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आला. हा केवळ त्यांचा सन्मान नव्हता तर संपूर्ण कृष्णवर्णीयांचा व समानतेच्या चळवळीचा सन्मान होता. मंडेला यांचा जन्म हा थिंबू राज घराण्यातील होता. घरची उत्कृष्ट आर्थिक स्थिती असतानाही त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर आपले सारे आयुष्य चळवळीला वाहून घेण्याचे ठरविले. सुरुवातीला आफ्रिकन कम्युनिस्ट पक्ष न नंतर आफ्रिकन नॅशनल पक्षाशी जोडले गेले. यातच त्यांना तत्कालीन वर्णव्देषी राजवटीने तुरुंगात डांबले. त्यापूर्वी मंडेला यांनी आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात संघटन सुरु केले होते. आफ्रिकन नॅशनल कॉँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जाऊ लागले. त्यामुळे त्यांना ज्यावेळी अटक झाली त्यावेळी त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष झाल्यावरही त्यांनी खरे तर आयुष्यभर हे पद ठरविले असते तर उपभोगू शकले असते. परंतु त्यांनी आपणाला एक मर्यादा घालून दिली व त्यानंतर सहजरित्या अध्यक्षपद सोडले आणि सुत्रे दुसर्‍याच्या हाती दिली. अध्यक्षपदावरुन खाली उतरल्यावर त्यांनी आपल्याला समाजसेवेला वाहून घेतले. एडस् विरोधी कार्यात त्यांनी जनजागृती सुरु केली. त्यात त्यांची पत्नी विनी मंडेला यांचीही साथ होती. परंतु काही काळाने त्यांचे पत्नीशी मतभेद झाल्याने त्यांचा घटस्फोट झाला. अर्थात त्यांच्या वैयक्तीक जीवनाचा समाजकार्यावर कधीच परिणाम झाला नाही. त्यांच्या या कार्याची जगाने दखल घेतली. भारताचे ते एक सच्चे मित्र म्हणून नेहमीच ओळखले गेले. भारतानेही दक्षिण आफ्रिकेच्या लढ्याला नेहमीच पाठबळ दिले होते. त्यामुळे त्यांची भारताशी मैत्री अधिकच दृढ झाली. त्यामुळे भारताने त्यांना भारतरत्न या किताबाने गौैरविले. रशियाने त्यांना ऑर्डर ऑफ लेनिन हा सर्वोच्च किताब व अमेरिकेने त्यांना अध्यक्षांचे विशेष मेडल देऊन सन्मानित केले होते. अशा प्रकारे जगातील सर्वोच्च मान मिळविणारे ते एकमेव नेते ठरले आहेत. त्यांच्या जाण्याने केवळ आफ्रिकन जनतेचे नुकसान झालेले नाही तर जगाने एक मोठा क्रांतीकारी नेता गमावला आहे. नेल्सन मंडेला यांच्या जाण्याने जगातील शांतीदूत, वर्णव्देशी राजवट संपविणारा व सर्व मानवाला समानतेच्या पातळीवर आणणारा क्रांतिसूर्य मावळला आहे.
------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel