-->
संपादकीय पान--अग्रलेख-- ०३ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी--
-------------------------------------------
सोशल मिडियाचा विळखा
---------------------------
फेसबूक, व्टिटर, यूट्यूब व व्हॉटस्ऍप या सोशल मिडियाचा वापर करुन काही राजकीय पक्ष आपल्या स्पर्धकांची बदनामी करीत असल्याचा भांडाफोड अनिरुध्द बहल यांच्या कोब्रा पोस्ट या वेबसाईटने केला आहे. काही राजकीय पक्ष म्हणजे त्यांचा अप्रत्यक्षरित्या आरोप हा भाजपावर आहे. याबाबत भाजपानेही प्रतिक्रिया देताना फार सावधरित्या दिली आहे. नरेंद्र मोदींच्या प्रचारामुळे कॉँग्रेसची हवा गूल झाली असून त्यामुळेच कॉँग्रेस पक्ष कोब्रा पोस्टला हाताशी धरुन असे आरोप करीत आहे, असे म्हटले आहे. मात्र त्यांची ही प्रतिक्रीया म्हणजे मूळ विषयाला बगल देण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न आहे. आम्ही सोशल मिडियाचा वापर करुन कोणत्याही प्रकारे अन्य पक्षांचा विरोध व गलिच्छ प्रचार केलेला नाही असे स्पष्ट प्रतिपादन खरे तर भाजपाने करावयास हवे होते. परंतु त्यांनी तसे न करता भलतेच उत्तर दिले आहे. मात्र या निमित्ताने सोशल मिडियाच्या आभासी जगाचा विळखा किती वाईटरित्या आपल्यावर पडला आहे हे स्पष्ट जाणवते. यंदाच्या निवडणुकीत सोशल मिडिया प्रभाव पाडणार असा अनेकांचा होरा आहे. त्यामुळे देशातील सर्वच राजकीय पक्षांनी हे व्यासपीठ काबीज करण्यासाठी गेल्या वर्षापासून प्रयत्न सुरु केले. यातील या माध्यमावर पहिला पगडा बसविला तो भाजपाने. अर्थात देशातील एकूणच माध्यमांवर भाजपाचा प्रभाव सर्वात जास्त आहे. त्यामुळे सोशल मिडियावर आपले वर्चस्व स्थापन करणे त्यांना सहज शक्य झाले. सर्वात उशीरा जाग ही कॉँग्रेस पक्षाला आळी आणि आता अलिकडे निवडणुकीच्या तोंडावर या माध्यमाकडे आपली पावले वळविली. यंदाच्या वर्षात होणार्‍या सर्व निवडणुकांमध्ये सुमारे १५ कोटी हे नवमतदार आहेत. हे नवमतदार तरुण असल्याने त्यांच्यावर अर्थातच सोशल मिडिया मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडू शकणार आहे. त्यामुळे या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपाने सोशल मिडियावर लक्ष केंद्रीत केले. बरे या माध्यमाचा वापर करुन जर तुम्ही रितसर प्रचार व प्रसार केला तर आपण समजू शकतो. मात्र त्यांनी असे करीत असताना अन्य पक्षांना बदनाम करण्यासाठी मोठी मोहीम उघडली. यासाठी डझनभर आय.टी. उद्योगातील काही कंपन्यांना करोडो रुपयांची कामे दिली गेली. या कंपन्यांनी लाखो बनावट नावाने नवीन आय.डी. सुरु करुन विरोधी पक्षांची बदनामी करण्यास प्रारंभ केला. नरेंद्र मोदींचे काही लाख फॉलेअर्स असल्याचे दाखवून बोगस नावाने अकाऊंट सुरु करण्यात आले. त्या खात्यांच्याव्दारे नरेंद्र मोदीं हे कसे उत्कृष्ट नेते आहेत आणि त्याच्याशिवाय अन्य नेता या देशात कसा नाही असे चित्र तयार केले गेले. केवळ एवढेच नव्हे तर गलिच्छ मार्गाने काही विरोधी पक्षांच्या चित्रफिती व्हॉटस्ऍपवरुन फिरविल्या गेल्या. कोब्रा पोस्टने हे सर्व बनावट मार्गाने कसे करण्यात आले त्याचे स्टींग ऑपरेशन केले आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला आपला प्रचार करण्यास मुभा आहे. परंतु त्याने दुसर्‍याचा गलिच्छ मार्गाने प्रचार करण्यास अजून आपल्याकडे निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली नाही. असे असताना तरुणांना आकर्षित करण्यासाठी या नव्या माध्यमांचा वापर करण्यात आला आहे. यातून सोशल मिडियाचा किती गैरवापर केला जाऊ शकतो हे उघड झाले आहे. आज भाजपाने अशा मार्गाने दुसर्‍या पक्षांची बदनामी केली आहे. भाजपाच्या पावलावर पाऊल ठेवून उद्या कॉँग्रेस पक्ष भाजपाची बदनामी सुरु करेल. यामुळे एकूणच राजकारणातले चित्र आणखी गढूळ होईल. आय.टी. उद्योगात तुमची बाजारपेठ ही जग आहे. मात्र या विश्‍वात तुम्ही खोटे बोलूच शकत नाही. जर तुम्ही भारतात एखादी चोरी करण्यासाठी विदेशातील आय.पी.च्या मार्गाचा अवलंब केलात तरी तुमची चोरीही कधी तरी पकडली ही जाणारच. माणूस एकवेळ खोटे बोलेल मात्र संगणक तुम्हाला खर्‍याचे खोटे करण्यासाठी साथ देईलही मात्र तो घडलेले जे काही आहे ते वास्तव तुमच्यापुढे दाखवेल. त्यामुळे संगणापेक्षा आपण शहाणे आहोत असे समजून जर तुम्ही गुन्हा केलात तर ते उघड हे होणारच आहे. सत्तेत येण्याची घाई असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी गैरमार्गाचा वापर करुन अन्य पक्षांची बदनामी केली तरी हा गुन्हा संगणक उघड करुन दाखविणारच आहे. कोब्रा पोस्टने हेच उघड केले आहे. सोशल मिडियाचा वापर हा चांगल्या कामासाठी व्हावा, यातून चांगल्या माहितींचे आदान-प्रदान व्हावे व यातून जास्तीत जास्त माहीती लोकांपर्यत पोहोविणे हे काम करणे केव्हाही चांगले. मात्र या माध्यमाचा गैरवापर करुन त्याचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी उपयोग करुन घेणे चुकीचे आहे. यातून मोदींची मते वाढणार नाहीत तर तरुणांमध्ये नैराश्य निर्माण होऊन भाजपाच्या विरोधी मतदान होण्याची शक्यता जास्त आहे. सत्तेची शिडी चढण्याची घाई झालेल्या भाजपाच्या नेत्यांना हे वास्तव उमजल्याशिवाय राहाणार नाही. निवडणूक आयोगाला याबाबत जास्त दक्षता बाळगावी लागणार आहे. सोशल मिडियासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे आखावी लागणार आहेत. मतदारांपर्यंत कुणाबद्दलही चुकीचा संदेश पोहोचून त्याची दिशाभूल होता कामा नये. माध्यम कोणतेही असो त्यातून लोकांची दिशाभूल होता कामा नये. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी दक्ष राहिले पाहिजे. आज भाजपाने विरोधकांची प्रतिमा डागाळण्यासाठी खेळी केली आहे. उद्या त्यांच्यावरही हे बालंट उलटू शकते, हे लक्षात घ्यावे. आपली लोकशाही यातून दुबळी होणार नाही यासाठी राजकीय पक्षांनी राजकीय प्रगल्भता दाखविण्याची गरज आहे.
--------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel