-->
संपादकीय पान--चिंतन-- ०३ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी--
-------------------------------------------
तेहलका मासिकाचा मृत्यू अटळ? 
---------------------------
तेहलका मासिकाचे मालक व संपादक तरुण तेजपाल यांना अखेर गोवा पोलिसांनी अटक केल्याने या मासिकाचा मृत्यू जवळ आला आहे अशी चर्चा सुरु झाली आहे. हे मासिक सुरु करण्यात तरुण तेजपाल यांचा मोलाचा वाटा होता. त्यापूर्वी ही वेबसाईट होती. नंतर याचे मासिकात रुपांतर करण्यात आले. तरुण तेजपाल यांनी अनेक पुढार्‍याचे पोल खोल करुन आपले नाव दिल्लीच्या राजकीय वर्तुळात कमाविले होते. त्यांच्या नावाचा दबदबा होता तो त्यांच्या आक्रमक पत्रकारितेमुळेच. भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीचे सरकार सत्तेवर असताना भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांना लाच घेतानाचे स्टींग ऑपरेशन केले आणि तेहलकाचा तिखटपणा सर्वांना पहिल्यांदा जाणवला. या घटनेने तरुण तेजपाल यांना एका नव्या लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. त्यानंतर तेहलका म्हटले म्हणजे काही तरी तिखट लेख, बातमी असे सूत्रच तयार झाले. त्या बळावर तेहलकाने देशातील साप्ताहिकांच्या बाजारपेठेत आपले एक स्थान निर्माण केले. प्रथम इंग्रजीत व नंतर हिंदीत अशा दोन भाषेत हे साप्ताहिक निघू लागले. तरुण तेजपाल यांची यावर पूर्णत: मालकी नसली तरीही बहुतांशी समभाग त्यांच्याकडे होते. सध्याच्या व्यवस्थापिका शोमा चौधरी यांच्याकडे या कंपनीचे दहा टक्के समभाग आहेत. त्याशिवाय काही राजकारण्यांकडेही या कंपनीचे काही अल्प प्रमाणात समभाग असल्याची चर्चा होती. अर्थात हे साप्ताहिक देशभर सतत गाजत असले तरीही येथे काम करमारे पत्रकार मात्र कधीच समाधानी नव्हते. येथे काम करणार्‍या पत्रकारांना बातमीसाठी देशात कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य होते. मात्र अनेकांना कामाचे समाधान लाभत नव्हते. पूर्वी एका संपादकाने एका महिला पत्रकाराला त्याच्याबरोबर सिनेमाला येण्याचा आग्रह केला होता. तिने तसे करण्यास नकार दिल्याने तिला कोणतेही काम काही काळ दिले जात नव्हते. नंतर या संपादकाची उचलबांगडी झाली. मात्र महिला पत्रकाराची छळणूक केली म्हणून नव्हे. अर्थात या साप्ताहिकाचा आत्मा हा तरुण तेजपाल होता. त्याच्या डोक्यातून विविध स्टोरीज निघायच्या. आता हाच गजाआड गेल्याने तेहलकाचा आत्मा निघून गेला आहे. सध्या हिंदी आवृत्तीच्या संपादकांना तेहलकाचे काम पाहण्यास सांगण्यात आले आहे. व्यवस्थापिका शोमा चौधरींनीही राजीनामा दिल्याने त्यांच्याजागी कोण येणार हे देखील अजून निश्‍चित नाही. सध्याच्या घडामोडींमुळे काही जाहीरातदारांनी जाहीराती रद्द करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तेहलकाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. तेजपाल आणि शोमा हे देघेेही या कंपनीला चांगला व्यवसाय व चांगल्या बातम्या आणत होते. आता त्यांच्या जाण्यामुळे हा ओघ आटणार आहे. तहलकाचे प्रकाशन करणारी रितसर कंपनी असली तरीही तरुण तेजपाल या एकमेव खांबावर ही कंपनी अवलंबून होती. अशा प्रकारे एका व्यक्तीवर एखादी संस्था अवलंबून असते त्यावेळी तिचे अस्तित्व ती व्यक्ती दूर झाल्यावर संपुष्टात येऊ शकते. तेहलकाचेही तसेच होण्याच्या मार्गावर आहे. तेहलकाला पुन्हा जीवदान देण्यासाठी तरुण तेजपाल यांच्यासारखाच एखादा आक्रमक संपादक त्यांना शोधावा लागेल. मात्र असा संपादक मिळाला तरीही सध्या या मासिकाची जी पत गेली आहे ती पुन्हा मिळविणे कठीण जाईल. संंपादक एखादा नवा मिळेल पण गेलेली पत पुन्हा कमविता येणार नाही हे वास्तव आहे. पूर्वी लोकांना या साप्ताहिकाविषयी जी आपुलकी होती ती यापुढे राहाणार नाही. त्यामुळे तहलकाचा मृत्यू भविष्यात होणार हे सत्य आहे. अनेकांच्या छातीत धडकी भरविणार्‍या अशा या मासिकाचा असा अंत होणे ही पत्रकारितेतील एक दुदैवी गटना म्हणावी लागेल.
-------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel