-->
संपादकीय पान--अग्रलेख-- ०४ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी--
-------------------------------------------
शिवसेनेतील खदखद
-----------------
शिवसेनेचे पाच वेळा निवडून आलेले माजी खासदार व एकेकाळी भारतीय विद्यार्थी सेनेतून घडलेले नेते मोहन रावले यांनी शिवसेनेच्या विद्यमान नेतृत्वावर जोरदार टीकेचा भडीमार करीत हल्लाबोल केल्याने रावले यांची पत्रकार पऱिषद सुरु असतानाच शिवसेनेने रावले यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली. रावले यांनी शिवसेना हा दलालांचा पक्ष झाल्याची टीका केल्याने त्यांची हकालपट्टी होणे स्वाभाविकच होते. रावलेंना देखील हकालपट्टी होण्याचीच अपेक्षा होती. त्यामुळेच त्यांनी अत्यंत जहरी टीका केली होती. आता त्यांची हकालपट्टी झाल्याने अन्य पक्षात म्हणजे बहुदा मनसेमध्ये त्यांचा जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अलीकडेच माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी उद्धव यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर शिवाजी पार्कच्या जाहीर सभेत जोशी सरांचा अपमान करण्यात आला होता. त्यानंतर मात्र सरांनी उद्धव यांच्यापुढे लोटांगण घालून आपला माफीनामा पाठविला होता. सरांच्या या माफीनाम्यानंतर सेनेतली ही खदखद आता तरी थांबेल असे वाटत होते. परंतु रावले यांच्या आरोपानंतर ही खदखद वाढली आहे. रावले हे एकेकाळी बाळासाहेबांच्या अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जात असत. परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाची सूत्रे आल्यापासून रावले हे अडगळीत टाकल्यासारखे होते. त्यामुळे आपल्याला आता शिवसेनेत काही स्थान राहीले नसल्याची भावना त्यांच्या मनात बळावत चालली होती. यातून त्यांनी अलीकडे राज ठाकरे यांची भेट घेतल्याने रावलें संदर्भात चर्चेचे उधाण आले होते. गेल्या आठ वर्षात शिवसेनेतून बाहेर पडलेले रावले हे तिसरे मोठे नेते आहेत. यापूर्वी नारायण राणे व राज ठाकरे हे बाळासाहेब असताना पक्षातून बाहेर पडले होते. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेतून बाहेर पडलेले रावले हे पहिले नेते ठरले आहेत. राज ठाकरे व नारायण राणे यांनी बाहेर पडताना शिवसेनेत मोठी फूट पाडली होती. तशी फूट काही रावले यांच्या जाण्याने पडणार नाही. या तिघांनीही बाहेर पडताना आपापल्या शैलीत उद्धव यांच्यावर व त्यांचे स्वीस सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका केली होती. रावले हे आता बाहेर पडल्याने शिवसेनेतील ही खदखद आणखी तीव्र्र होणार आहे. रामदास कदम, ठाणे जिल्ह्याध्यक्ष एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत हे देखील नाराज असल्याची बरीच चर्चा होताना दिसते. मात्र ते या खदखदीला रावलेंसारखे ते देखील तोंड लगेचच फोडणार की त्यासाठी अजून काही काळ थांबावे लागणार आहे हे समजेलच. रावले यांनी पक्ष सोडताना जी नेतृत्वावर कडवी टीका केली आहे तिच्यावर खरेतर गंभीरतेने विचार करण्याची वेळ शिवसेना नेतृत्वावर आली आहे. कारण मिलिंद नार्वेकर पक्ष चालवितात अशी टीका काही नव्याने होत नाही. यापूर्वीही नारायण राणे व राज ठाकरेंनी पक्ष सोडताना अशी टीका केली होती. शिवसेना हा पक्ष सर्वसामान्य मराठी माणसांचा पक्ष म्हणून नेहमीच मुंबई-ठाण्यात ओळखला गेला आहे. शिवसेनेच्या शाखेत अनेक लोकांचे प्रश्‍न सोडविले जातात. आता जर तिकडे दलालीचे व्यवहार होणार असतील तर रावलेंनी टीका केली म्हणून नव्हे तर पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी यासाठी काही उपाययोजना केली पाहिजे. पक्ष नेतृत्वात ज्यावेळी बदल होतो त्यावेळी अनेक बदल हे काळाच्या ओघात होत असतात. नवीन नेतृत्वाला जुने नेते हे कालबाह्य वाटणे स्वाभाविक असते. परंतु त्यासाठी त्यांना अडगळीत टाकणे हे उत्तर असू शकत नाही. जुने जाणते नेते व पक्षातील नवीन पिढी या दोघांनाही बरोबर घेऊन जाणे यातच पक्ष नेतृत्वाची कसोटी ठरते. सध्या शिवसेनेतील ज्या जुन्या जाणत्या नेत्यांच्या तक्रारी पहाता उध्दव ठाकरे हे पक्षातील दोन्ही पिढ्यांना बरोबर घेऊन जाण्यात असमर्थ ठरले आहेत. त्याचबरोबर बाळासाहेब हे शाखाप्रमुखापर्यंत प्रत्येकाला भेटत असत. यातून त्यांचा जनतेशी संपर्क साधला जात असे. अशा भेटींमुळे आपल्या नेत्याबद्दलही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या पक्षातील मधल्या व तळातील फळीबाबत आदर निर्माण होत असतो. पक्षाची वाढ होण्यासाठी सतत कार्यकर्त्यांच्या भेटी या आवश्यक ठरतात. बाळासाहेबांनी हे सर्व जपले होते. परंतु उद्धव यांची कार्यशैली पाहता ते फक्त आपल्या विश्‍वासातील काही ठराविक लोकांनाच भेटतात. यामुळे पक्ष कार्यकर्ते व नेते यांच्यातील दरी फोफवत जाते. शिवसेनेसारख्या पक्षाला अशी दरी रुंदावणे परवडणारे नाही. रावले हे पाच वेळा लोकसभेवर निवडून गेलेले होते. शिवसेनेने त्यांना मोठे केले हे खरे असले तरीही त्यांच्यासारख्या विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता असल्यापासून ते माजी खासदार अशी पदे उपभोगलेल्या नेत्याला अशाप्रकारे वाळीत टाकणे योग्य नव्हते. आज रावलेंच्या मागे मोठ्या संख्येने कार्यकर्ते नाहीत, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. परंतु रावलेंच्या हकालपट्टी ही बाब परळ-लालबाग विभागातील शिवसैनिकांच्या मनाला चटका लावणारी ठरणार हे देखील तेवढेच सत्य आहे. सेनेचे नेते अशा प्रकारे पक्ष सोडायला लागले तर त्याचा पक्षावर परिणाम हा होणारच आहे, याचे भान उद्धव ठाकरेंनी ठेवण्याची आवश्यकता आहे. यातून पक्ष वाढणार नाही. रावले कदाचित मनसेत प्रवेश करतील आणि दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवितील अशी अटकळ आहे. तसे झाल्यास ते शिवसेनेचीच मते खाणार आहेत. यामुळे अर्थातच नुकसान शिवसेनेचे होईल. शिवसेनेच्या या खदखदीतून तिसर्‍याचाच लाभ होण्याची शक्यता जास्त आहे.
-----------------------------------


Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel