-->
संपादकीय पान--अग्रलेख--११ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी--
-------------------------------------
पराजिताचे जीणे...
---------------------
पराजिताचे जीणे हे फार वाईट असते. त्याला चारही बाजूने पराभवानंतरचा होणारा भडका अंगावर घ्यावा लगतो. केंद्रातील सत्ताधारी कॉँग्रेस पक्षाला चार राज्यात मोठा पराभव पत्करावा लागल्यावर पक्ष व पक्षनेतृत्वापुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. पराभवानंतर कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी पत्रकारांपुढे येऊन मोठ्या धीराने पराभव स्वीकारला असला तरीही भविष्यात अनेक संकटे येऊ घातली आहेत. त्यामुळे सध्याचे केंद्रातले सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करु शकेल किंवा नाही अशी शक्यता वाटू लागली आहे. सध्या असलेले सहकारी कदाचित सोडूनही जातील असा अंदाज व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगेचच ब्लॉग व्दारे आपली लेखणी सरसावून आपल्या मित्रपक्षाचे नेतृत्व कमजोर असल्याची टीका केली आहे. शरद पवारांची ही टीका आपण समजू शकतो, कारण पवारांना कुपणावर सतत बसण्याची सवयच आहे. त्यामुळेच त्यांनी तिसर्‍या आघाडीपासून ते भाजपाच्या आघाडीत आपले दोस्त ठेवले आहेत. आज कॉँग्रेस सत्तेत असल्याने त्यांची गरज पवारांना वाटते. असे असले तरी राष्ट्रवादीचा राज्यातला पहिला शत्रू हा कॉँग्रेस पक्षच आहे. पवारांची वैयक्तीत महत्वाकांक्षा पंतप्रधान होण्याची आहे आणि ती काही लपून राहिलेली नाही. अशा स्थितीत कॉँग्रेसची सत्ता पुन्हा येणार नाही हे अगदी स्पष्ट झालेले असताना पवार कॉँग्रेस कळपात राहणे कसे पसंत करतील? कॉँग्रेसचा पराभव जसा नक्की आहे तसेच भाजपा आघाडीलाही काही स्पष्ट बहुमत मिळू शकत नाही. अशा स्थितीत पवारांचा केंद्रात बाजी मारण्याचा इरादा असू शकतो. त्यासाठी सर्व पक्षात असलेली मैत्री तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील वजन पवाराच्या बाजूने झुकू शकते. पुन्हा एकदा केंद्रात देवेगौडा प्रयोग झाला तर पवार उडी मारायला तयार आहेत. म्हणूनच कॉँग्रेस नेतृत्वावर आत्ताच टीका करुन पवारांनी भविष्यातील सत्तेच्या समीकरणाची बेगमी करुन ठेवली आहे. कॉँग्रेस आता गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, दिल्ली, बिहार, उत्तरप्रदेश, पश्‍चिम बंगाल, झारखंड, तामीळनाडू व ईशान्ये कडील बहुतांशी राज्यात नाही. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ या राज्यांवर लोकसभेच्या जागांसाठी काहीसा भरवसा ठेवू शकते. महाराष्ट्रातही कॉँग्रेससोबत सत्तेची विभागणी राष्ट्रवादीची असल्याने व या सरकारबाबत जनतेत नाराजी असल्याने इकडेही लोकसभेच्या जागा कमी होणार आहेत. अशा स्थितीत कॉँग्रेस पक्षाला पुढील लोकसभेत विरोधातच बसावे लागणार आहे. म्हणजे त्यांच्या खासदारांची संख्या तीन आकड्यांवरही पोहोचणार नाही ऐवढी नाराशाजनक कामगिरी असेल. त्यातच कॉँग्रेस पक्षाने जर घाई करुन राहूल गांधी यांच्या नावाची पंतप्रधानदासाठी घोषणा केली तर कॉँग्रेसला आणखीनच फटका बसणार आहे. पराभूत झालेल्या कॉँग्रेसला आता चारी बाजूने घेरण्यास सुरुवात आता झाली आहे. वेगळ्या तेलंगणाला विरोध असणार्‍या कॉँग्रेसच्या सहा खासदारांनी मनमोहनसिंग सरकारविरुध्द अविस्वासाचा ठराव मांडण्यासाठी प्रस्ताव पाठवून कॉँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. चार राज्यातला पराभव झाल्यावर या खासदारांचे आता बळ वाढले आहे. जर कॉँग्रेस पराभूत झाली नसती तर या खासदारांचे हे धारिष्ट झाले नसते. छोट्या राज्यांच्या स्थापनेला विरोध करणार्‍या पक्षांना एकत्र करुन सरकारला पेटात पकडण्याचा हा डाव आहे. या प्रस्तावाचे नेमके काय होईल ते लवकरच स्पष्ट होईल, मात्र सध्या तरी त्यांनी कॉँग्रेसला अडचणीत आणले आहे. तर दुसरी कडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कॉँग्रेसबरोबर न जाण्याचे आपले धोरण असल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या काही महिन्यात त्यांनी भाजपाची साथ सोडल्यावर नितिशकुमार हे कॉँग्रेसच्या जाळ्यात अडकणार अशी चर्चा होती. परंतु आता ताज्या निकालामुळे ते पुन्हा दूर गेले आहेत. त्यांनी आम आदमी पार्टीच्या केजरीवाल यांची स्तुती केल्याने काही नवीन समीकरणे शिजू शकतात. येत्या काही दिवसात सध्या कॉँगे्रेस कळपात असलेल्या पक्षांचा कल भाजपाच्या आघाडीच्या दिशेने वाढण्याची शक्यता आहे. किंवा निवडणुकांनंतर भाजपाला दीडशेच्या वर जागा मिळाल्यास सत्ता स्थापनेसाठी अनेक पक्ष मदत करतील. परंतु यातील अनेकांना नरेंद्र मोदींचा चेहरा असलेले सरकार नको आहे अशा वेळी सुषमा स्वराज किंवा अडवाणींसह अन्य भाजपा नेत्याला पंतप्रधानपदाची लॉटरी लागू शकते. चार राज्यातल्या निवडणुकीच्या निकालानंतर एक संदेश दिल्लीकरांनी स्पष्ट दिला आहे की, कॉँग्रेस व भाजपा यांच्या व्यतिरिक्त जो सशक्त पर्याय देईल त्याला चांगले भवितव्य आहे. अशा स्थितीत तिसर्‍या आघाडीने आतापासून मोर्चे बांधणी केल्यास त्याचे चांगले परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसू शकतील. या आघाडीत सर्व डाव्या पक्षांच्या जोडीला जनता दल (युनायटेड), बिजू जनता दल, समाजवादी पक्ष यांना बरोबर घेता येऊ शकेल. पराभूत कॉँग्रेस पक्षाचे मनोधैर्य येत्या काही दिवसात आणखीन खच्ची होणार आहे. लोकसभा निवडणुका झाल्यावर काडीमोड सत्ताधारी कॉँग्रेसशी काडीमोड घेणार्‍यांची संख्या मोठी असेल तसेच काही नवीन राजकीय समीकरणे येत्या काही महिन्यात मांडली जातील अशी चिन्हे आहेत. पराभूताच्या बरोबर कुणी राहात नाही, त्यामुळे कॉँग्रेसबरोबर असलेल्यांची संख्या रोडावत जाणार आहे. त्यामुळे आता नविन विटी नवीन दांडू या सूत्राप्रमाणे राजकीय गणितेही नवीन मांडली जातील अशी चिन्हे आहेत.
-----------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel