-->
संपादकीय पान--अग्रलेख-- २५ नोव्हेंबर२०१३च्या अंकासाठी--
--------------------------------------------
चौसष्ठ घरांच्या राजाची हार
-----------------------------
गेले पाच वेळा जागतिक बुध्दीबळातील जेतेपट पटकाविणार्‍या विश्‍वनाथन आनंद याला चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेत त्याच्यापेक्षा अर्ध्याहून कमी वय असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याच्या हातून पराभव पत्करावा लागला आहे. भारतीयांना विश्‍वनाथन आनंदचा नेहमीच अभिमान वाटत आला आहे. वयाच्या १८व्या वर्षी त्याने ज्यावेळी ग्रँडमास्टर स्पर्धा जिंकली त्यावेळी हा तरुण आपले जगात नाव काढणार हे सिध्द झाले होते. अर्थातच ते खरे झाले. विश्‍वनाथन आनंद हा जागतिक बुध्दीबळ पटावर एक नवा तारा जन्माला आला आणि त्याने एक नव्हे तर तब्बल पाच वेळा चौसष्ठ घरांच्या या खेळाचे जेतेपट पटाकावले. आता मात्र वयाच्या ४४ वर्षी आनंद यांच्या जेतेपदाला आव्हान निर्माण झाले आणि या राजाची हार झाली. गेल्या काही वर्षांतील या दोन खेळाडूंच्या लढतींचा आढावा घेतला तर असे दिसून येते की, गेल्या तीन वर्षांत आनंदने कार्लसनला क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत एकाही डावात हरविलेले नाही. २०१३मध्ये त्यांच्यात सहा लढती झाल्या, त्यात पाच डाव बरोबरीत सुटले तर या स्पर्धेपूर्वीचा अखेरचा डाव १८ जून २०१३ मध्ये ताल मेमोरियल स्पर्धेत खेळला गेला आणि त्यात कार्लसनने आनंदला सहजरित्या हरवले. कदाचित, अलिकडेच झालेल्या या पराभवामुळे आनंदचे मानसिक खच्चीकरण झाले असावे. त्याचाच परिणाम म्हणून स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आनंदने बचावात्मक धोरण स्वीकारायचे ठरविले होते. तिसर्‍या डावामध्ये विजयाच्या अतिशय जवळ आल्यानंतरही आनंदच्या डावात निर्णायक क्षणी चुका झाल्या होत्या. पूर्ण डाव कार्लसन दबावाखाली आनंद खेळत होता. त्याची मोहरी पटाच्या कोपर्‍यात गेली होती. आणि जो डाव आनंद सहज जिंकेल, असे वाटत होते, तोच डाव कार्लसनने योग्य बचाव करून वाचविला. बरोबरीतील पोझिशन आणण्यात यश मिळविले. परिस्थिती बरोबरीची असल्यामुळे आनंदने कार्लसनसमोर बरोबरीचा प्रस्ताव मांडला. डावात दम नसतानासुद्धा कार्लसनने तो प्रस्ताव फेटाळला. अशाप्रकारे बरोबरी नाकारणे हा एक कार्लसनचा डावपेचांचा भाग होता. या नकारामुळे प्रतिस्पर्ध्यावरचे मानसिक दडपण वाढते याची त्याला कल्पना होती. अर्थात, थोड्या चालीनंतर पटावर फक्त राजे राहिल्याने त्याने बरोबरी मान्य केली. या डावामुळे त्याच्या लक्षात आले की अत्यंत खराब परिस्थितीतसुद्धा आपण डाव वाचवू शकतो. आतापर्यंत चाचपडत खेळणा र्‍या कार्लसनचा आत्मविश्वास नंतर एकदम वाढलेला दिसला. चौथ्या डावातील बरोबरीनंतर त्याने पाचव्या आणि सहाव्या डावात आनंदच्या शैलीतील कमकुवतपणाचा फायदा उठविला. आता अशा परिस्थितीत जर आपले जगज्जेतेपद कायम टिकवायचे असेल तर आनंदला अतिशय आक्रमक खेळण्याची आवश्यकता होती, परंतु, सातव्या आणि आठव्या डावात विजयाचा प्रयत्न करण्यापेक्षा न हरण्याचा प्रयत्न करण्यावर त्याने भर दिला, असेच म्हणावे लागेल. कदाचित, दोन डाव हरल्यानंतर मानसिकदृष्ट्या सावरण्यासाठी हे वेळकाढू धोरण त्याने अवलंबिले असेल. तसे असेल तर नवव्या डावात तो आक्रमक खेळ करून विजयी होऊ शकत होता. परंतु आनंदचे बहुतांशी खच्चीकरण झाल्यासारखे दिसत होते आणि कार्लसन हा अत्यंत विश्‍वासाने खेळत होता. बुध्दीबळ हा खेळ तरुणांचा खेळ म्हणून ओळखला जातो. कारण झपाट्याने निर्णय घेऊन चाली खेळण्याचे मानसिक सामर्थ्य हे तरुणपणात जास्त असते. सहसा चाळीशी नंतर बुध्दीबळपटूंचा उतरता काळ असतो असा जगातील अनुभव आहे. आनंदचे देखील काहीसे तसेच झाले आहे. वयाच्या ४४ व्या वर्षी पाचव्यांदा जेतेपद मिळविल्यावरही आनंद यांच्या चाली काही प्रमाणात मंदावल्या होत्या. यात आनंदचा दोष नाही. चाळीशी नंतर प्रत्येक बुध्दीबळपटूत हा बदल घडतो. त्याउलट कार्लसन हा केवळ २२ वर्षाचा असल्याने आक्रमक होता. तो वयाच्या १३व्या वर्षी ग्रँडमास्टर झाला होता. जगातील हा सर्वात तरुण ग्रँडमास्टर होता. केवळ दहा सेकंदात तो कोणती चाल खेळावयाची याचा निर्णय घ्यायचा. त्यामुळे कार्लसन हा वरचढ ठरला. ११९७ साली आय.बी.एम.च्या सुपरकॉम्प्युटरने रशियन बुध्दीबळपटू कास्पारोव्ह याला पराजीत केले होते. त्यावेळी जगात माणसाविरुध्द मशिन असा मोठा वाद निर्माण झाला होता. परंतु नंतर या चर्चेला विराम मिळाला आणि चांगल्या प्रकारची मशिन्स ही माणसालाही हरवू शकतात हे मानवजातीने मान्य केले. याबाबत मात्र कार्लसन याने फार मार्मिक उत्तर दिले आहे. त्याच्या सांगण्यानुसार, मी संगणकाशी खेळत नाही. कारण आपल्या समोर असलेल्या जीवंत माणसाशी खेळण्यात खरी मजा आहे. कॉम्पयुटरला हरविण्यात मजा नाही आणि जर आपण त्याच्याविरुध्द खेळताना हरलो तर ती फार दुख:त गोष्ट ठरते. अर्थात कोणत्याही खेळात हरणे ही दुख:त बाबच असते परंतु हरणे हे देखील खिलाडूवृत्तीने घ्यावे लागते. विश्‍वनाथन आनंद यांच्यावर आपल्या स्वत:च्या देशात खेळत असल्याने एक वेगळे दडपण होतेच शिवाय त्याच्या बरोबरच्या स्पर्धकाला त्याने कधी हरविलेलेे नसल्यामुळे त्याच्यावर एक मानसिक दडपण होते. बुध्दीबळ हा तर बुध्दीचा खेळ आहे. त्यामुळे कार्लसन असो किंवा आनंद त्यांची बुध्दी पणाला लागलेली असते. दोघेही खेळाडू तुल्यबळच होते. परंतु सध्यातरी कार्लसन हा त्यांच्यांत सरस ठरला आहे. या पराभवामुळे आनंदचे करिअर संपुष्टात आले असे मात्र नव्हे. त्याचा आत्मविश्‍वास पुन्हा संपादन झाल्यास आनंद पुन्हा त्याच इर्षेने स्पर्धेत उतरुन जेतेपद पटकावू शकतो. मात्र एक बाब विसरता येणार नाही की, असा चौसष्ठ घरांचा हा आनंदी राजा सध्यातरी देशात होणे नाही.
----------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel