-->
पुन्हा एक अतिरेकी हल्ला

पुन्हा एक अतिरेकी हल्ला

बुधवार दि. 12 जुलै 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
पुन्हा एक अतिरेकी हल्ला
अमरनाथ यात्रेतील दहशतवादी हल्ल्यामागे दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा हात असून पाकिस्तानी दहशतवादी इस्माईल या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महनिरीक्षक मुनीर खान यांनी दिली. दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात 7 भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह 32 जखमी झाले होते. मृतांमध्ये सहा महिला यात्रेकरू आहेत. या यात्रेकरुत दोन जण महाराष्ट्रातील आहेत. ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. ही बस देवस्थानकडे नोंद नसल्याची बातमी अतिरेक्यांपर्यंत पोहोचली होती व त्याला सुरक्षा नसल्यामुळे अतिरेक्यांना हा हल्ला करणे शक्य झाले. ही बस सोनमर्गहून आली होती. अमरनाथांचे दर्शन घेतल्यानंतर याचमार्गे यात्रेकरू जम्मूच्या मार्गावर होते. रात्री सात वाजेनंतर महामार्गावर यात्रेकरूंचे वाहन चालविण्याची परवानगी नाही. असे स्पष्ट निर्देश असतानाही यात्रेकरूंसाठी असलेल्या वाहतूक नियमांचे बसचालकाने उल्लंघन केले, असा दावा पोलिसांनी केला आहे तो चुकीचा नाही. असा प्रकारे या यात्रेसाठी असलेले सुरक्षा कवच भेदून जाण्याची या बस चालकाला व प्रवाशांनाही काही आवश्यकता नव्हती. मात्र त्याने नियमांचे उल्लंघन केले आणि हा दुदैवी प्रकार घडला. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी जम्मूतील यात्रेकरूंच्या तळापासून ते काश्मीरमधील पहलगाम किंवा बाल्टालस्थित यात्रेकरूंचा तळ एस.ओ.जी. आणि सी.आर.पी.एफ.च्या पहार्‍याखाली असतो. वाहन नोंदणीकृत नसताना ही बस अमरनाथपर्यंत कशी गेली; हे मोठे गौडबंगालच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेचा निषेध करीत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याशी संपर्क साधून हल्ल्याचा तपशील मागवला. यात्रेकरूंच्या ज्या बसवर हल्ला झाला ती गुजरातमधील बलसाड येथील होती. प्रवास सुरु करताना अनेक वाहने एकदम निघाली होती व त्यांच्यासोबत सुरक्षा दलांची सुरक्षा व्यवस्था होती. ही बस जेवणासाठी रस्त्यात मध्येच थांबली व इतरांपासून वेगळी पडली. नेमकी हिच संधी साधून अतिरेक्यांनी हा हल्ला केला. बसच्या चालकाने सातनंतर बस महामार्गावरून नेऊन या नियमाचे उल्लंघन केले. अमरनाथ यात्रेवर झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. याआधी सन 2000 च्या यात्रेत जुलै महिन्यात अतिरेक्यांनी यात्रेकरूंच्या पहेलगाम येथील बेस कॅम्पवर बॉम्ब फेकून व बेछुट गोळीबार करून केलेल्या हल्ल्यात 27 यात्रेकरू ठार तर 36 जखमी झाले होते. नंतर सुरक्षा दलांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात दोन दहशतवादी मारले गेले होते. मृत पावलेल्या भाविकांमध्ये महिलांची संख्या जास्त असून यामध्ये महाराष्ट्रातील दोन महिलांचा समावेश आहे. उषा सोनकर आणि उर्मलाबेन ठाकोर अशी त्यांची नावे आहेत. या दोघीही पालघर येथील डहाणूच्या रहिवासी होत्या. जखमींमध्येही महाराष्ट्रातील आठ जणांचा सामवेश आहे. अमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ल्याचा ट्विटरवरून निषेध नोंवताना मोदी म्हणाले, अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. या हल्ल्यात मुत्युमुखी पडलेल्यांना मी श्रद्धांजली वाहतो. तर जखमी झालेल्यांची प्रकृती सुधरावी यासाठी प्रार्थना करतो. भारत अशा भ्याड हल्ल्यासमोर कधीही झुकणार नाही. मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी अमरनाथ यात्रेकरुच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर बोलताना हा सर्व मुस्लिम आण काश्मिरींवर एक डाग असल्याचे म्हटले आहे. अनंतनाग येथे रुग्णालयात जखमींची भेट घेतल्यावर त्यांनी या घटनेमुळे काश्मिरींची मान शरमेने खाली झुकली असल्याचे त्यांनी सांगितले. ही घटना सर्व काश्मिरी आणि मुस्लिमांवर एक डाग आहे. आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेसंदर्भात जनतेतून व विविध थरातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त झाला आहे. बॉलिवूड स्टार यात आघाडीवर आहेत. शाहरुख खानने या घटनेचा निषेध केला आहे. दहशतवादविरोधी जनता यामुळे पेटून उठल्यासारखी स्थिती आहे. हे कृत्य लष्कर-ए-तोयबाने केल्याचे स्पष्ट झाले आहे. ही संघटना पूर्णपणे पाकिस्तानने पोसलेली व त्यांच्या पाठिंब्यावर जगत असलेली अतिरेकी संघटना आहे. त्यामुळे याचा अर्थ स्पष्टच आहे की, हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृतच आहे. भारताने पाकिस्तानची ही मस्ती आता या घटनेनंतर उतरविण्याची वेळ आली आहे. खरे तर भारत सरकारला वाटत होते की, आपण केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानला चांगलाच धडा शिकविला गेला आहे. परंतु तसे काहीच झालेले नाही. पाकिस्तानने यातून काही बोध घेतलेला नाही. उलट त्यांच्या कारवाया या गेल्या काही महिन्यात सतत वाढत गेल्या आहेत. सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकने आपले नागरिक असलेल्या कुलभूषण जाधव यांना भारतीय हेर असल्याचे जाहीर करुन त्यांच्यावर फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या सर्व घटना या कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच अशा थाटातल्या आहेत. अशा वेळी आता पाकिस्तानला चांगलाच धडा शिकविण्याची वेळ आता आली आहे, असेच दिसते. अशा वेळी सर्वांच्या नजरा पंतप्रधानांनवर खिळल्या आहेत.
------------------------------------------------------------------

0 Response to "पुन्हा एक अतिरेकी हल्ला"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel