-->
26 Nov 13 Chintan
सुशगात गोव्याच्या पर्यटनाचे अतिरेकी धुमशान
गोवा म्हटलं की तिकडचे सृष्टीसौंदर्य व पर्यटकांना भुलविणारा निळाशार समुद्र आणि त्याच्या जोडीला गोव्याची संस्कृती. अर्थात हे सौंदर्य संपूर्ण कोकणपट्टीलाच लाभले आहे. मात्र गोव्याने आपल्या या सौंदर्याची जाहीरात करुन पर्यटकांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले आहे. प्रामुख्याने विदेशी पर्यटकांनी गोव्याला अक्षरंक्षहा वेड लावले आहे. यामुळे गोव्याची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षात पार बदलून गेली. मात्र सुशगात असलेल्या या गोव्यात पर्यटनाचे अतिरेकी धुमशान सुरु झाल्याने येथील संस्कृती, जीवनमान धोक्यात येण्याची शक्यता जास्त निर्माण झाली आहे. अलिकडच्या काळात नायजेरियन नागरिकांनी जो उच्छाद मांडला आहे तो पाहता गोव्याचे हे पर्यटन या सुंदर राज्याला रसातळाला पोहोचविणार असेच दिसते. गोव्याची लोकसंख्या जेमतेम १४ लाख मात्र दरवर्षी येणारे पर्यटक २५ लाखांच्यावर अशी स्थिती आहे. पर्यटनाच्या सोबतीला मादक पदार्थांचे सेवन, वेश्याव्यवसाय, रशियन माफियांचा झालेला सुळसुळाट यामुळे गोव्याची संस्कृती पारबदलून गेली आहे. त्यामुळे हिंसाचार व गुन्हेगारीचे प्रकार गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढले. अर्थात या गुन्हेगारीत स्थानिकांपेक्षा विदेशी नागरिकच जास्त सहभागी असतात. गेल्या महिन्यात गोव्यात नायजेरियातील २०० तरुणांच्या जमावाने हिंसक मारामार्‍या केल्या. त्यामुळे काही भागात तणाव निर्माण झाला. यातील अनेक नायजेरियन तरुण हे मादक पदार्थांच्या व्यवसायात गुंतलेले होते. काही जणांकडे अवैध पासपोर्ट होते हे देखील सिध्द झाले. विदेशी नागरिकांचा गेल्या दहा वर्षात गोव्यात राबता वाढल्यावर येथील अर्थव्यवस्था पार बदलून गेली आहे. लोकांच्या हातात जास्त पैसा खुळखुळू लागला आहे. मात्र त्याचबरोबर अवैध धंदे फोफावले. गोव्याच्या काही भागात तर दुकानांवरही रशियन भाषेतल्या पाट्या झळकलेल्या दिसतात. रशियन पर्यटक हे मोठ्या संख्येने येऊ लागल्यावर तेथे अनेक गैरव्यवहार सुरु झाले. अनेकांनी अवैध मार्गांनी जमिनी देखील खरेदी केल्या किंवा भाड्याने राहू लागले. दोन वर्षांपूर्वी गोव्यातील रशियन नागरिक जमीन खरेदी कशी करु शकतात असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी सरकारने ही खरेदी अवैध असल्याचे जाहीर केले होते. असे असले तरीही रशियन माफियांनी अनेक ठिकाणी जागा खरेदी केल्याच आहेत. चालू वर्षी ५२० रशियन नागरिक हे बिझनेस व्हिसावर गोव्यात राहात आहेत. स्थानिक नागरिकही आपल्याला पैसे मिळत असल्याने मूग गिळून गप्प आहेत. त्याचबरोबर पोलिसांनाही रितसर विदेशी पर्यटकांकडून हाप्ते मिळत असल्याने ते ही गप्प असतात. अनेक रशियन व विदेशी नागरिक सहा महिने विदेशात काम करुन इकडे सहा महिने रहावयास येतात. कारम विदेशात ते कमवितात ते पुढील सहा महिने गोव्यात खर्च करण्यास पुरेसे असते. त्यामुळे गोव्यात जागांची भाडी व एकूणच महागाई वाढली आहे. अलीकडे नायजेरिन पर्यटकांनी धिंगाणा घातल्यावर या सर्व बाबी उघड झाल्या आहेत. गेल्या तीन वर्षात गोवा पोलिसांनी २४१ नायजेरिन तरुणांना अटक केली आहे. अनेकदा त्यांना भारतात रहावयाचे असल्याने मुद्दाम गुन्हा करतात व इकडे राहातात. गोव्यात सध्या विविध ६० देशातील नागरिक राहात आहेत. त्यातील ४,४१७ जणांनी गोवा आपले कायमचे निवासस्थान केले आहे. काही जणांनी उद्योगधंदे थाटून ते त्यात यशस्वी झाले आहेत. काही विदेशी नागरिकांनी गोवा हे निवृत्तीनंतरचे ठिकाण म्हणून निवडले आहे. मात्र गेल्या पाच वर्षात गोव्यात विदेशी गुन्हेगारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यमुळे गोव्याची संस्कृती लयाला चालली आहे ही सर्वात वाईट बाब आहे. गोव्यात भाजपाचे सरकार आहे. आपली संस्कृती जपण्याचा घोशा लावणार्‍या या पक्षाचे सरकार असताना ही स्थिती याचे दुख वाटते. पर्यटन हा अर्थव्यवस्थेला हातभार लावणारा उद्योग आहे. मात्र त्या पर्यटनाचा अतिरेक झाला की कोणते टोक गाठले जाते याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोवा आहे.
---------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel