-->
संपादकीय पान--अग्रलेख-- २७ नोव्हेंबर२०१३च्या अंकासाठी--
--------------------------------------------
सुटाबुटातले गुन्हेगार
----------------------------
गेल्या काही वर्षात आपल्याकडे सुटाबुटातल्या लोकांची गुन्हेगारी झपाट्याने वाढली आहे. पूर्वी आपल्याकडे या वर्गातल्या गुन्हेगारांची संख्या नगण्य असे. आता मात्र काळ बदलत चालला असून गुन्हेगार कोणत्याही आर्थिक गटातला असू शकतो. मध्यंतरी थ्रीजी घोटाळा उघड झाला त्यावेळी अनेक आघाडीच्या उद्योगसमूहातील वरिष्ठ अधिकारी गजाआड झाले त्यावेळी काहीसे आश्‍चर्य वाटले होते. त्याशिवाय बँक अधिकार्‍यांमधले गुन्हे देखील सर्रास झाले आहेत. सुटाबुटातल्या या गुन्हेगारांची आठवण होण्याचे कारण म्हणजे सध्या गाजत असलेले पत्रकार व तेहलका या मासिकाचे सर्वेसर्वा तरुण तेजपाल यांच्यावर झालेला विनयभंगाचा आरोप व दिल्लीतील गाजलेल्या राजेश व नुपूर तलवार या डॉक्टर दांपत्याने आपली मुलगी नुपुर व घरातील नोकर हेमराज यांचा निर्घुण केलेला खून. यातील तलवार यांचे प्रकरण बरेच वर्षे गाजत होते. सी.बी.आय.ला देखील हे प्रकरणी न्यायालयात पुरावे सादर करताना बरेच कष्ट घ्यावे लागले होते. कारण हा खून तलवार पती-पत्नीने एखाद्या सराईत गुन्हेगारासारखा करुन जवळपास सर्व पुरावे नष्ट केले होते. बरे तलवार कुटुंब हे दिल्लीतील नामवंत डॉक्टर म्हणून ओळखले जातात आणि अनेक राजकीय व्यक्तींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांना सोडविणे मोठे जीकरीचे झाले होते. अनेकदा हा खून तलवार कुटुंबाने केलेलाच नाही असे वाटत होते. परंतु मोठ्या कष्टाने सी.बी.आय.ने पुरावे मिळवून हा खून न्यायालयात सिध्द केला. त्याचबरोबर गेले काही दिवस गाजत असलेले आणखी एक प्रकरण म्हणजे तेहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांच्यावरील बलात्कारचा आरोप. आजवर मोठी-मोठी भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून अनेक राजकारण्यांना घाम फोडणार्‍या तरुण तेजपाल यांच्यावर अशा प्रकारचा आरोप होईल हे कुणाच्या ध्यानीमनीही नव्हते. तेहलकाची टीम एका कार्यशाळेनिमित्त गोव्याला गेली असताना तेजपाल यांनी आपल्या मुलीची मैत्रीण व तहलकामध्ये पत्रकार असलेल्या एका तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला हे प्रकरण विनयभंग असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र नंतर हा बलात्कार असल्याचे सांगण्यात येऊ लागले. अजूनही आरोप करणार्‍या या तरुणीने पुढे येऊन रितसर तक्रार केलेली नाही. आता बहुदा ती पुढे येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास तेजपाल यांच्यावर आरोप कोणता आहे ते समजू शकेल. त्याचबरोबर हे प्रकरण झाल्यावर ते दडपण्याचा प्रयत्न तेजपाल व तेहलकाच्या व्यवस्थापनाने केला आहे. हा देखील एक गुन्हाच आहे. तेजपाल हे कट्टर भाजपाविरोधी आहेत आणि भाजपाची सत्ता असलेल्या गोव्यातच हा गुन्हा घडला आहे. खरे तर गोव्यातील पोलिसांनी त्यांना ताबडतोब अटक करावयास हवी होती. परंतु त्या तरुणीने गुन्हा न नोंदविलेला असल्याने गोव्यातील पोलीसही दिल्ली वारी करुन हात हलवत परत आले. तरुण तेजपाल हे आघाडीचे पत्रकार व अनेक स्टींग ऑपरेशनव्दारे अनेकांना उघडे पाडणारे म्हणून ओळखले गेले होते. अशा या धडाडीच्या पत्रकाराने से काही अघटीत करावे हे आश्‍चर्यकारकच होते. तेरा वर्षांपूर्वी सुरुवातीला वेबसाईट सुरु करुन तेजपाल यांनी अनेकांना उघडे पाडले आणि ते प्रकाशझोतात आले. या यशाच्या लाटेवर असताना त्यांनी त्यावेळी केंद्रात असलेल्या भाजपाच्या सरकारला सळे की पळो करुन सोडले होते. त्यावेळचे भाजपाचे अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांना लाच स्वीकारतानाचे स्टींग ऑपरेशन करुन त्याकाळी सत्ताधारी आघाडीत खळबळ उडवून दिली होती. एकेकाळचे लढावू नते जॉर्ज फर्नांडिस यांच्या विरोधात झालेल्या स्टींग ऑपरेशनमुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अशा प्रकारे अनेकांना उघडा पाडणारा हा धडाडीचा पत्रकार आज उघडा पडला आहे. आता तेजपाल यांच्यावरील आरोप खरे असोत वा खोटे त्यांच्यावर जे आरोप झाले आहेत त्यामुळे त्यांची पुरती बदनामी झाली आहे. त्यामुळे त्यांची विश्‍वासार्हता पूर्णपणे लयाला गेली आहे. पुढील काळात त्यांनी कितीही स्टींग ऑपरेशन करुन राजकारण्यांना उघडे पाडले तरी त्यांच्यावर कुणी विश्‍वास ठेवणार नाही असी स्थिती आहे. एक पत्रकार म्हणून आणि तेहलका या संस्थेची प्रतिष्ठा पार धुळीला मिळाली आहे. पुढे काही काळाने तेजपाल आपल्यावरील आरोप खोटे होते हे सिध्द करुन दाखवतीलही. मात्र त्यांच्यावर लागलेला हा डाग धुवून निघणारा नाही. लोक त्यांच्यावर विश्‍वास ठेवणार नाहीत. सुरुवातीला तेजपाल यांनी हे प्रकरण माफी मागून मिटविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कोणताही गुन्हा हा माफी मागून मिटविला जाऊ शकत नाही. तेजपाल यांच्यासारख्या जाणत्या पत्रकाराला याची कल्पना नसेल असे नव्हे. तरुण तेजपाल यांच्यासारख्या पत्रकाराच्या कार्यालयात देखील महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत याचे वाईट वाटते. आज शहरात महिला नोकरी करतात. परंतु त्या खरोखरीच सुरक्षित आहेत का असा सवाल या घटनेच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे. मध्यंतरी एका नामवंत आय.टी. कंपनीतही असेच एक प्रकरण बाहेर आले होते. त्यावरुन त्या कंपनीच्या संचालकाला राजीनामा द्यावा लागला होता. ऐवढेच कशाला मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती विरुध्दही अशीच तक्रा र झाली होती. त्यामुळे तरुण तेजपाल असो वा न्यायूर्ती ते पदाने किंवा हुद्याने कितीही मोठे असले तरी कायद्यापुढे ते समान आहेत. गुन्हेगार मग तो सुटाबुटातला असला तरीही त्याने केलेल्या कोणत्याही गुन्ह्यासंदर्भात सवलत मिळता कामा नये.
------------------------------    

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel