-->
संपादकीय पान--चिंतन-- २७ नोव्हेंबर२०१३च्या अंकासाठी--
--------------------------------------------
आता सर्वसामान्यांसाठी ए.टी.एम.
-----------------------------
देशात बँकिंग व्यवस्था जर तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवायची असेल तर प्रत्येक गावात किंवा गल्लीत बँकांच्या शाखा उघडणे काही शक्य नाही. कारण प्रत्येक ठिकाणी शाखा उघडणे कोणत्याच बँकेला परवडणारे नाही. त्यामुळे त्यावर उपाय म्हणून ए.टी.एम. ची मशिन्स सुरु करण्यात आली. मात्र सध्या मोठी शहरे व त्याखालची मध्यम व लहान शहरात ही ए.टी.एम. मशिन्स सुरु करण्यात आली. त्यामुळे ज्या भागात म्हणजे ग्रामीण व निमग्रामीण भागात खरोखरीच ए.टी.एम. ची गरज होती तो भाग मात्र यापासून वंचित राहिला. परंतु आता मात्र रिझर्व्ह बँकेने यावर उपाय शोधून काढला आहे. त्यानुसार बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना ए.टी.एम. सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. यानुसार या कामासाठी सुमारे १७ बिगर बँकिंग कंपन्या उत्सुक होत्या. त्यापैकी टाटा कम्युनिकेशन्सने आपली ए.टी.एम. आता सुरु केली आहेत. त्यासाठी त्यांनी इंडीकॅश हा ब्रँड तयार केला आहे. अशा प्रकारे खास ग्रामीण भागासाठी सुरु करण्यात येणारी ए.टी.एम. म्हणजे भविष्यात येऊ घातलेली बँकिंग क्रांती ठरावी.
ही ए.टी.एम. मशिन्स देशातील सर्व बँकांशी लिंक असतील. त्यामुळे कोणत्याही बँकेत तुमचे खाते असले तरी तुम्हाला या ए.टी.एम. व्दारे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होईल. टाटा कम्युनिकेशन्सने याला व्हाईट लेबल ए.टी.एम. असे नाव दिले आहे. सध्या पहिल्या टप्प्यात ही सुमारे ५०० ए.टी.एम. मशिन्स विविध राज्यात बसविली गेली आहेत. एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या छोट्या शहरात ही ए.टी.एम. मशिन्स प्रामुख्याने बसविली गेली आहेत. तसेच ग्रामीण भागात ही ए.टी.एम. मशिन्स बसविली गेली असल्याने त्याच्यावरच्या सर्व सूचना या स्थानिक भाषेतील असतील. व्हाईट लेबल ए.टी.एम. ही एक प्रकारची बँकच असेल अशा सुविधा यात टप्प्याने पुरविल्या जातील. या ए.टी.एम. मधून प्रत्येक ग्राहकास जास्तीत जास्त दहा हजार रुपये काढण्याची सोय असेल. आपल्याकडे सध्या देशात सुमारे १.३० लाख ए.टी.एम. मशिन्स आहेत. अर्थात आपल्या देशाचा आवाका पाहता ही संख्या नगण्यच आहे. परंतु दरवर्षी या संख्येत जवळपास २७ टक्क्यांची भर पडत चालली आहे. त्यामुळे २०१७ सालापर्यंत आपल्याकडे चार लाख ए.टी.एम. मशिन्स होतील. अमेरिकेत प्रत्येक दहा लाख लोकसंख्येमागे १३९० ए.टी.एम. मशिन्स आहेत तर ब्रिटनमध्ये ५३०, चीनमध्ये २११ तर भारतात केवळ ९८ ए.टी.एम. मशिन्स आहेत. त्यामुळे जगाचा विचार करता आपल्याकडे ए.टी.एम. मशिन्सची संख्या अतिशय कमी आहे. गेल्या दोन वर्षात सरकारने बँकिंग व्यवस्था सर्वसामान्यंापर्यंत पोहोचावी यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. त्यासाठी ग्रामीण भागात बँकिंग कॉरस्पॉंडंन्ट नेमण्याचा प्रयोगही केला. या प्रयोग काही प्रमाणात यशस्वी झाला परंतु अपेक्षेऐवढे त्याला यश आले नाही. त्यामुळे आता ग्रामीण भागात बँकिंग व्यवस्था पोहोचविण्यासाठी ए.टी.एम. मशिन्स स्थापन करण्याच्या कामात बिगर बँकिंग कंपन्यांना सहभागी करुन घेण्यात आले आहे. याचा तरी सकारात्मक उपयोग होईल अशी अपेक्षा आहे. आपल्यासारख्या अवाढव्य पसरलेल्या देशात बँकिंग सेवा कानाकोपर्‍यात पोहोचविणे हे एक मोठे आव्हान ठरलेले आहे. ग्रामीण भागात सहकारी बँका तसेच जिल्हा सहकारी बँकांनी आपले जाळे गावोगावी विणून बँकिंग सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा जरुर प्रयत्न केला आहे. परंतु महाराष्ट्रात सहकारी बँकांचे जसे जाळे आहे तसे संपूर्ण देशात नाही. आता मात्र नव्याने येणारी ही ए.टी.एम. बँकिंग व्यवस्थेचे चित्र पालटू शकते.
------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel