-->
संपादकीय पान शुक्रवार दि. १२ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
मोबाईल क्रांती नव्या वळणावर नेणार
----------------------------------------------
सध्या मोबाईल ही एक जीवनावश्यक वस्तू झाली आहे. मोबाईल निर्मिती क्षेत्रात अनेक कंपन्या कार्यरत असल्या तरी ऍपल या स्टीव्ह जॉब्स यांच्या कंपनीने आपला उत्कृष्ट दर्जा टिकवून नेहमीच तंत्रज्ञानात भरारी मारली आहे. आता ऍपलने नवीन फोन लॉन्च करुन ममोबाईल क्रांतीमध्ये आणखी मोलाची भर घातली आहे. कंपनीचा बहुचर्चित ऍपल ६ आणि ऍपल ६प्लस याचबरोबर आयवॉचचे नुकतेच अनावरण करण्यात आले. ऍपलच्या या उत्पादनांमुळे स्मार्टफोन अधिक स्मार्ट झाला आहे तर आयवॉचमुळे आपल्या जीवनशैलीवर वॉच राहणार आहे. ऍपलचे सर्वेसर्वा स्टीव्ह जॉब्ज यांच्या निधनानंतर ऍपल या कंपनीचे काय होणार अशी सर्वांना चींता लागली होती. मात्र या कंपनीने जॉब्ज यांच्या पश्‍चातही आपली भरारी सुरुच ठेवली आहे. जॉब्ज यांच्या निधनानंतर ऍपलने काही उपकरणे बाजारात आणली पण त्यातील आयपॅड मिनी वगळता इतर सर्व उपकरणांच्या जडणघडणीत जॉब्ज यांचा सहभाग होताच. नुकत्याच बाजारात आलेली उपकरणे ही जॉब्ज यांच्या निधनानंतर त्यांचा सहभाग नसलेली तशी पहिली उत्पादने आहेत. जॉब्ज यांनी पहिला मॅक आणि आयमॅकचे अनावरण ज्या महाविद्यालयाच्या सभागृहात केले होते त्याच सभागृहात या नवीन उपकरणांचे अनावरण झाले. या अनावरणाबाबत जगभरातील ऍपलप्रेमी खूप उत्सुक होते. ऍपलच्या संकेतस्थळावर लाइव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी अनेकांनी संकेतस्थळावर लॉगइन केले होते. तर अमेरिकेतील ऍपलप्रेमींनी ऍपल स्टोअर्सच्या बाहेर गर्दी केली होती. जगभरातून हा कार्यक्रम ऍपलप्रेमिंनी एकाच वेळी पाहिला. हा ही एक तंत्रज्ञानाचा चमत्कार म्हटला पाहिजे. ऍपलने नव्याने बाजारात आणलेले आयफोन ६ आणि ६प्लस हे दोन्ही मोबाईल हे नवीन तंत्रज्ञानाचा एक परिपूर्ण अविष्कार असलेली उपकरणे आहेत. या मोबाईलची तुलना अन्य कोणत्याही मोबाईलशी करता येणार नाही. स्टीव्ह जॉब्स यांचे हेच वैशिष्ट होते. अत्याधुनिक तंत्रज्ञान घेण्याची लोकांची तयारी आहे. त्यासाठी लोकांची पैसे खर्च करण्याचीही तयारी आहे. मात्र लोकांना म्हणजे ग्राहकांना जगातले  सर्वोकृष्ट उत्पादन दिले पाहिजे हा स्टीव्ह जॉब्स यांचा आग्रह होता. आता त्यांच्या पश्‍चातही हेच धोरण त्यांचे वारसदार कंपनीत चालवित आहेत हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. अँड्रॉइड वॉचनंतर ऍपलने आपल्या घडयाळाचे अनावरण केले आहे. पण हे घडयाळ ग्राहकांच्या मनगटावर येण्यासाठी नव्या वर्षांची वाट पाहावी लागणार आहे. हे घडयाळ म्हणजे खर्‍या अर्थाने आपल्यावर वॉच ठेवणारे आहे. म्हणजे यामध्ये देण्यात आलेल्या सुविधांमुळे आपल्या आरोग्यावर करडी नजर राहतेच याशिवाय आपली अनेक कामे हे घडयाळ करू शकणार आहे. ऍपल वॉच, ऍपल स्पोर्ट्स वॉच आणि वॉच एडिशन अशा तीन प्रकारात स्मार्ट घडयाळाचे अनावरण करण्यात आले आहे. वॉच एडिशनमध्ये १८ कॅरेट सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. हा प्रकार भारतात सर्वाधिक चालेल, असा विश्वास कंपनीला आहे. हे सोनेरी मुलाम्याचे घडयाळ ३८ एमएम आणि ४२ एमएम आकारात उपलब्ध आहे. स्पोर्ट्स ब्रँडमध्ये सहा विविध प्रकारची घडयाळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
घडयाळाला रेटिना डिस्प्ले आहे. यामध्ये मफोर्स टचफचा पर्याय आहे. यामुळे टॅप आणि प्रेस यामधील फरक समजणार आहे. घडयाळात एखादे ऍप सुरु करायचे असेल तर आपण ते टॅप करायचे आणि त्या ऍपवर नियंत्रण करावयाचे असेल तर आपण ते प्रेस करून ठेवू शकतो. भारतात या घडाळ्याची किंमत सुमारे २२ हजार रुपये असेल. त्यामुळे देशातील मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात हे घड्याळ असेल. मोबाईलप्रमाणे भविष्यात हे घड्याळ लोकांची गरज ठरणार आहे. याशिवाय घडयाळाला वायफाय आणि ब्ल्युटूथ ची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य, फिटनेस, कॉल्स, मेसेजिंग, स्टॉक्स, ई-मेल्स, वर्ल्ड क्लॉक, अलार्म, टाइमर, स्टॉपवॉच, म्युझिक, ऍपल टीव्ही, आय टयून असे ऍप्स देण्यात आले आहेत. घडयाळयाच्या माध्यामातून ऍपलचा टीव्ही तसेच आयफोनच्या कॅमेराचेही नियंत्रण करता येऊ शकते. इतकेच नव्हे तर तुमच्या ओळखीच्या ऍपल वॉच वापरकर्त्यांला तुमच्या हृदयाचे ठोकेही या माध्यमातून ऐकवता येऊ शकतील. हे सर्व पाहता मोबाईल क्रांती आता नव्या वळणावर आपल्याला नेणार आहे, हेच खरे.
---------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel