-->
रायगड बाजाराने कात टाकली

रायगड बाजाराने कात टाकली

संपादकीय पान बुधवार दि. ३० डिसेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
रायगड बाजाराने कात टाकली
अलिबाग व त्याच्या परिसरातील ग्राहकांचा मानबिंदू असलेल्या रायगड बाजाराची नवीन वास्तू मोठ्या दिमाखात अलिकडे उभी राहिली होती. आजपासून ही वास्तू पुन्हा एकदा ग्राहकांच्या सेवेत रुजू झाली आहे. सध्याच्या बदलत्या काळाचा मागोवा घेत उभारण्यात आलेली ही वास्तू पाहताच रायगड बाजाराने आता कात टाकली आहे असे म्हणावे लागेल. ३० वर्षापूर्वी रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष प्रभाकर पाटील उर्फ भाऊ व तत्कालीन विरोधी पक्षनेते दत्ता पाटील यांनी अलिबागमधील जनतेला स्वस्त किंमतीत चांगल्या प्रतिचे धान्य मिळावे हा हेतू डोळ्यापुढे ठेवून रायगड बाजाराची स्थापना केली. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही त्यांची काही खाजगी कंपनी नव्हती तर सहकार क्षेत्रातील ही संस्था होती. त्याकाळी पश्‍चिम महाराष्ट्रात सहकाराचे बीज चांगलेच रोवले गेले होते, परंतु कोकणात फारसे सहकार क्षेत्रात काही काम झाले नव्हते. त्यामुळे सहकार क्षेत्रातील हा प्रयोग पुढे चालून चांगलाच यशस्वी झाला. अपना बाजार, वारणा बाजार या सहकारी भांडारांनी ग्राहोपयोगी वस्तू विक्रीच्या क्षेत्रात आपले चांगलेच पाय रोवले होते. रायगड बाजाराचीही वाटचाल त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून झाली. रायगड बाजाराची वास्तू अलिबागमध्ये उभी राहिली आणि अल्पावधीतच त्यांची साखळी संपूर्ण जिल्ह्यात उभी राहिली. प्रभाकर पाटील, दत्ता पाटील यांच्या नंतर माजी आमदार मीनाक्षीताई पाटील व आमदार जयंतभाई पाटील यांच्याकडे याची सूत्रे आली. रायगड बाजारच्या विस्ताराचे श्रेय खरे तर त्यांच्याकडे जाते. रायगड बाजाराने अल्पावधीतच आपला एक ब्रँड तयार केला. बाजारावर ग्राहकांची मर्जी एवढी बसली की, किराणा व्यापार्‍याकडे जाण्यापेक्षा आपल्याला बाजारात जाणेच योग्य आहे हे त्यांना पटले. केवळ स्वस्तात माल मिळतो यासाठी नव्हे तर चांगल्या मालाची खात्री येथे होती. त्याकाळचे ग्राहक आजही मोठ्या विश्‍वासाने सांगतात की, रायगड बाजार येण्यापूर्वी अलिबागमधील व्यापारी मालावर एम.आर.पी.पेक्षा दोन-चार रुपये जास्तच आकारीत. त्यावेळी जकात द्यावी लागत असल्यामुळे जास्त पैसे घ्यावे लागतात असे कारण पुढे केले जाई. मात्र रायगड बाजारात तर एम.आर.पी.पेक्षा दोन-चार रुपये कमीच घेतले जात. ८०च्या दशकात दोन-चार रुपयांनाही फार महत्व होते. अशा प्रकारे रायगड बाजाराने ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला. सहकारी क्षेत्राने रायगड बाजार हा सर्व रायगडातील ग्राहकांना दिलेला एक मोठा आधार होता. २००० सालानंतर आपल्या देशातील आर्थिक वातावरण बदलत गेले. सहकार क्षेत्रात भ्रष्टाचार माजला. त्यामुळे सहकार क्षेत्राबद्दल नाराजी व्यक्त होऊ लागली. रायगड बाजार मात्र ठामपणे उभा राहिला. भ्रष्टाचाराची किड त्याला लागणे शक्य नव्हते. कारण मिनाक्षीताई व जयंतभाईंच्या मार्गदर्शनाखाली त्याची वाटचाल यशस्वीरित्या सुरु होती. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे पाटील कुटुंबियांने आपल्या कुटुंबातील एक घटक म्हणून रायगड बाजार वाढविला. जयंतभाईंनी उद्योगात आपली पताका यशस्वीपणाने फडकावित ठेवली होती, त्यामुळे त्यांच्या दृष्टीने रायगड बाजारामुळे जनतेला जो फायदा होत होता त्यातच त्यांना जास्त समाधान वाटणे स्वाभाविक होते. तीस वर्षाच्या  यशस्वी वाटचालीनंतर रायगड बाजाराने कात टाकून नव्याने उभे राहणे ही काळाची गरज वाटू लागली होती. देशातील आर्थिक, सामाजिक रचना गेल्या दोन दशकात झपाट्याने बदलली होती. प्रामुख्याने आर्थिक सुधारणा सरकारने हाती घेतल्यानंतर खासगी उद्योगांना रिटेल क्षेत्राची दारे खुली केली होती. त्यामुळे या उद्योगात बिग बाजारच्या किशोर बियाणींपासून मुकेश अंबांनी, टाटा उद्योगसमूह यांनी उड्या घेतल्या. त्यांच्या या प्रवेशामुळे रिटेल उद्योगाचा चेहरामोहराच पार बदलून गेला. ग्राहकांना अनेक वस्तू स्वस्तात देताना त्यांनी मार्केटिंगचे नवे तंत्र अवलंबिले. यामुळे मोठ्या शहरातील किराणा व्यापारी जसा धोक्यात आला तसेच सहकारी तत्वावर चालविल्या जाणार्‍या ग्राहक भंडारांपुढे अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला. अलिबागसारख्या लहान शहरात किंवा संपूर्ण रायगड जिल्ह्यात पनवेल वगळता या रिटेल कंपन्यांचा प्रवेश काही झाला नाही. मात्र असे असले तरी रायगड बाजाराने बदलत्या परिस्थितीत कात टाकणे गरजेचे झाले होते. यातून रायगड बाजाराची नवी वास्तू उभी राहिली. यात अनेक कोर्टकज्जे झाले, विघ्नसंतोशींनी अनेक काड्या घालून पाहिल्या. रायगड बाजार पुन्हा कसा उभा राहाणार नाही यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली गेली. अर्थात यात ग्राहकांचा तोटा होता व व्यापार्‍याचा फायदा होता. अशा स्थितीत रायगड बाजाराचे अनेक ग्राहक बाजार कधी सुरु होतो याकडे लक्ष ठेवून होते. आज आता तो दिवस उजाडला आहे. संस्था कधीच जुनी होत नाही, संस्थेला कालानुरुप नवीन उभारी द्यावी लागते तरच ती टिकते. रायगड बाजाराचेही असेच झाले आहे. आजचा रायगड बाजार पाहिला तर युरोपातील एखाद्या हायवे वरील एखादा सुसज्ज मॉल वाटावा असे त्याचे देखणे रुप आहे. रायगड बाजाराच्या या नव्या रुपाला आमच्या शुभेच्छा.
------------------------------------------------------------------------    

0 Response to "रायगड बाजाराने कात टाकली"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel