-->
पाक भेटीचे नाटक

पाक भेटीचे नाटक

संपादकीय पान मंगळवार दि. २९ डिसेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पाक भेटीचे नाटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेश दौरे हा एक सध्या केवळ सोशल मिडियातच नव्हे तर सर्वसामान्य जनतेत टिंगल टवाळीचा विषय झाला आहे. देशाच्या पंतप्रधानाने विदेश दौरे केलेच पाहिजे, त्यामुळे अन्य देशांशी राजकीय, आर्थिक संबंध प्रस्थापीत होऊन देशाला त्याच फायदाच होतो. मात्र विरोधात असताना हेच मोदी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या विदेश दौर्‍यावर जोरदार टीका करीत व आता स्वत: पंतप्रधान झाल्यावर विदेश दौर्‍यांचा सपाटा त्यांनीच लावला आहे, खरे तर या विदेश दौर्‍यामुळे खरोखरीच देशाला नेमका काय फायदा झाला हा एक संशोधनाचा विषय ठरेल. बरे पंतप्रधानांनी त्याचया पदाला शोभेल असे वर्तन केले पाहिजे, तसे काही मोदींकडून होत नाही. अनेक देशात तर त्यांनी यापूर्वीच्या सत्ताधार्‍यांवर विदेशात टीका करुन आपली राजकीय दिवाळखोरी जाहीर केली आहेच. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यापेक्षा मोदींचे विदेश दौरे जास्त झाले असावेत अशी शंका वाटते. नुकतेच त्यांनी चार दिवसांपूर्वी काबूलहून परतताना अचानकपणे पाकिस्तानला भेट दिली. याचे सर्व मिडीयात स्वागत झाले. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा वाढदिवस होता व त्यांच्या नातीचे लग्नही होते ते निमित्त साधून मोदी अचानकपणे लाहोरला उतरले व काही तासात गुफ्तगू करुन भारतात परतले. अशा प्रकारे त्यांनी काबूलला नाश्ता, कराचीत जेवण व भारतात रात्रीचे जेवण केले. पंतप्रधान मोदींच्या या पाक भेटीतून फारसे काही होणार नाही, कारण सध्याची पाकिस्तानातील स्थितीच दोलायाम अवस्थेत आहे. सत्तेवर आल्यानंतर मोदी यांनी सर्व शेजारी देशांशी मित्रत्वाचा हात पुढे केला होता. त्या वेळी स्वदेशातील विरोध सहन करून शरीफ मोदींच्या शपथविधीसाठी दिल्लीला आले होते. मात्र, त्यानंतर हुरियत नेत्यांना भेटण्यावरून दोन्ही देशांचे बिनसले. साध्यासुध्या भेटीही रद्द होऊ लागल्या. किंबहुना पाकिस्तानबद्दल मोदी सरकारचे धोरण धरसोडीचे आहे, असे देशात व परदेशात बोलले जाऊ लागले. पाकिस्तानशी बोलणी केली पाहिजे, सतत कडवी भूमिका घेऊन चालणार नाही, हे सरकारचे धोरण असल्याचे मोदी दाखवत आहेत. म्हणजे विरोधात असताना ते ज्याप्रकारे कडवेपणाने पाकिस्तानविषयी बोलत होते तो कडवेपणा कधीच संपला आहे. त्यावेळी या पाकिस्तानशी चर्चा कसल्या करता सरळ त्यांच्या देशात सैन्य घुसवा व एकदाच काय तो लक्षात राहिल असा धडा शिकवा, अशी भाषा मोदींची होती. आज अजूनही शिवसेनेची हीच भूमीका कायम आहे. अर्थात ही भूमीका चुकीचीच आहे, परंतु भाजपाने आपल्या भूमीकेत गेल्या दोन वर्षात कसे यू टर्न घेतले ते बघण्यासारखे आहे. कोणत्याही देशाशी राजनैतिक संबंध ही एक प्रक्रिया असते व त्यामध्ये अनेक चढउतार येत असतात. पाकिस्तानसारख्या देशाशी व्यवहार करताना तर अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. पाकबरोबरचे संबंध साकळले होते व अजूनही ते तसेच आहेत. सर्वात महत्वाचा मुददा लक्षात घेतला पाहिजे की, पाकिस्तानचे लष्कर हे तेथे फार महत्वाचे आहे. पाकिस्तानातील पंतप्रधान हा त्या लष्कराच्या हातातील बाहुले आहे. त्याला लष्कराच्या तालावर नाचावेच लागते. अन्यथा त्याची खूर्ची कधी खेचली जाईल हे सांगता येणार नाही. देशांतर्गत राजकारणात नवाज शरीफ हे सर्व करण्यात तरबेज आहेत. एकीकडे अतिरेक्यांनी घातलेला हैदोस असो किंवा भारतातील लष्कराची घुसखोरी या सर्व प्रकरणी पाक लष्कर जी भूमीका घेते त्यानुसारच शरीफ आपली पावले टाकतात. शरीफ यांना भारताशी संबंध खरोखरीच सुधारावयाचे असतीलही परंतु त्यासंबंधी लष्कराची भूमीका वेगळी असल्याने त्यांचे हात बांधले गेले आहेत. मुंबई हल्यातील अतिरेक्यांवर खटला चालवा व हाफिस सईद याला शिक्षा घडवा हे शरिफ यांना कितीही मान्य असले तरीही पाक लष्कर तसे करु देणार नाही. पाक लष्कराला भारताशी सतत संघर्ष करावयाचा आहे, हे विसरता येणार नाही. अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील सौदार्हाची बस सुरु करुन एक पाऊल पुढे टाकले होते परंतु त्याचे पुढे काय झाले हे आपण पाहतच आहोत. अशा घटनांतून बोध घेऊन पुढे जाताना मोदी दिसत नाहीत. अर्थात अशा प्रकारे अचानक भेट देऊन पाकिस्तानच्या दारात जाण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही मान्य होणार नाही. उभय देशाचा प्रश्‍न हा चर्चेनेच सुटणार आहे, यात काहीच शंका नाही. मात्र त्यासाठी चर्चा करताना अतिरेक्यांना पाठिंबा देण्याचे थांबविणे, दाऊदला हवाली करणे, मुंबई हल्यातील आरोपींवर खटला चालवून त्यांना शिक्षा देणे यासंबंधी एकमत होऊन त्यादृष्टीने पावले पडली पाहिजेत. तसे होणे सध्यातरी काही शक्य नाही. त्यामुळे पाक भेटीचे हे मोदींचे नाटकच ठरणार आहे.
------------------------------------------------------------------

0 Response to "पाक भेटीचे नाटक"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel