-->
संपादकीय पान--चिंतन-- २० नोव्हेंबर२०१३च्या अंकासाठी--
--------------------------------------------
वृत्तपत्र स्वातंत्र्याचा बुरुज ढासळला
-------------------------------
देशातील वृत्तपत्र स्वातंत्र्याचे एक प्रणेते रामनाथ गोएंका यांच्या पुढच्या पिढीतील वारस विवेक गोएंका यांनी नरिमन पॉँईंट येथील एक्सप्रेस टॉवर्स ही टोलेजंग इमारत विकावयास काढली आहे. पुण्यातील एक विकासक पंचशील रिएलिटीने ही इमारत तब्बल ९०० कोटी रुपयांना खरेदी केल्याचे वृत्त मुंबईतील एका आर्थिक दैनिकाने प्रसिध्द केली आहे. लवकरच या करारावर सह्या होतील आणि एकेकाळी वृत्तपत्र स्वातंत्र्यांचा बुरुज म्हणून ओळखलेला गेलेला हा एक्सप्रेस टॉवर ढासळलेला असेल. मुंबईच्या समुद्रकिनारी नरिमन पॉईंट या व्यापारी केंद्र असलेल्या भागातील ही इमारत म्हणजे इतिहासाच्या अनेक घटनांची साक्षीदार होती. इंडियन एक्सप्रेस या वृत्तसमूहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या सर्व चळवळींचे ही इमारत म्हणजे मुख्य केंद्र होते. रामनाथजींनी ऐके काळी इंदिरा गांधींच्या धोरणांना कडाडून विरोध केला आणीबाणीविरुद्द दंड थोपटले. सत्ताधारी पक्षाला आंगावर घेतले या सर्व घडामोडी या इमारतीने पाहिल्या. जयप्रकाश नारायण, नानाजी देशमुख हे मुंबईत आल्यावर याच इमारतीतल पेंट हाऊसमध्ये रामनाथजींचे पाहुणे म्हणून उतरत असत. अरुण शौरी, माधव गडकरी यांच्यासारख्या दिग्गज पत्रकारांनी येथूनच आपली लेखणी चालविली. अशी ही इमारत आता केवळ एक व्यापारी केंद्र म्हणून शिल्लक राहिल. गेल्या पाच-सात वर्षापूर्वीच एक्सप्रेस समूहांच्या वृत्तपत्रांची कार्यालये येथून हलवून थेट नवीन मुंबईतील महापे येथे नेण्यात आली होती. खरे तर त्याचवेळी ही इमारत आता भविष्यात विकली जाणार याचे सुतोवाच झाले होते. ज्या मजल्यावर अरुण शौरी व माधव गडकरी यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी आपल्या लेखणीव्दारे सरकारला आव्हाने दिली त्याच जागी रात्री नंगानाच चालणारा पब यावा हे मोठे दुदैव होते. महाराष्ट्र सरकारने ज्यावेळी समुद्र बुजवून भराव टाकून प्लॉट विकले त्यावेळी कवडीमोल दराने ही जागा एक्स्प्रेसला दिली आणि त्याजागी ही टोलेजंग इमारत उभी राहिली.१९७२ साली जोसेफ ऍलेन स्टेन या नामवंत अमेरिकन वास्तुशास्त्रज्ञाने ही इमारत बांधली. त्यावेळी ही इमारत म्हणजे देशाची शान होती. ही इमारत बांधल्यानंतर दोन वर्षे दक्षिण आशियातील सर्वात उंच इमारत म्हणून डौलाने उभी होती. त्यानंतर दोन वर्षांनी दक्षिण आशियात याहून उंच इमारती उभ्या राहिल्या. खास करुन ही इमारत वृत्तपत्र कार्यालयासाठी व खालची जागा ही छपाई मशिनन्ससाठी राखून ठेवण्यात आली होती. एकेकाळी एक्स्प्रेसचे साम्राज्य ऐन भरात होते त्यावेळी येथून दररोज सहा दैनिक व अनेक मासिके, साप्ताहिके प्रकाशित होत असत. येथे कामास असणार्‍या पत्रकारांपासून ते साध्या कर्मचार्‍यापर्यंत आपण या कंपनीत व इमारतीत नोकरीला आहोत याचा गर्व वाटत असे. परंतु रामनाथ गोएंकांच्या नंतर हा समूह अस्ताला जाऊ लागला. अनेक वृत्तपत्रे बंद पडली. रामनाथजींनी वृत्तपत्र हे नफा कमविण्यासाठी कधीच चालविली नाहीत. तर आता नफा हे उदिष्ट ठेवून ही कंपनी चालविली जाऊ लागली. पाच वर्षांपूर्वी एक्स्प्रेस टॉवरमधील ४९ टक्के भांडवल आय.सी.आय.सी.आय. व्हेंचर कॅपिटलला ३६० कोटी रुपयांना विकण्यात आले. आणि आता ही संपूर्णच इमारत विक्रीला काढली आहे. सरकारने खरे तर ही जागा वृत्तपत्र चालविणार्‍या कंपनीला सवलतीच्या दरात दिली होती. परंतु येथून वृत्तपत्रांची कार्यलयेच गायब झाली. नवीन जागा महापे येथे घेण्यात आली ती देखील सरकारी सवलती घेऊनच. अशा प्रकारे सरकारी स्वस्तात जमीन घेऊन तिथे उभी असलेली इमारत विकण्याचा अधिकार कुणाला आहे? याचा सरकारने खुलासा करण्याची गरज आहे. यापूर्वी गिरण्यांच्या जमिनी अशाच सरकारकडून कवडीमोल किंमतीने खरेदी करणार्‍या मालकांना जर सरकार वठणीवर आणू शकते तर वृत्तपत्रांच्या मालकांना वेगळा नियम का? असा प्रश्‍न उपस्थित होतो.
----------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel