-->
संपादकीय पान--चिंतन-- २१ नोव्हेंबर२०१३च्या अंकासाठी--
--------------------------------------------
महिला सबलीकरणातील एक महत्वाचे पाऊल
-------------------------------
देशातील पहिल्या खास महिलांसाठी सुरु केलेल्या भारतीय महिला बँकेचे उद्घाटन मंगळवारी मुंबईत झाले. आजवर आपल्याकडे बँकिंग क्षेत्रात महिला साध्या कारकुनपदापासून ते थेट बँकेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदापर्यंत पोहोचल्या आहेत. असे असले तरीही खास महिलांनी महिलांच्या भल्यासाठी चालविलेली बँक आपल्याकडे नव्हती. ती आता उणीव भरुन निघाली आहे. गेल्या अर्थसंकल्पात त्याची घोषणा करण्यात आली होती. आता या बँकेची पहिली शाखा मुंबईत सुरु झाली आहे. यापाठोपाठ सात शहरात या बँकेच्या शाखा सुरु होतील. या बँकेने पहिल्याच दिवशी पाच महिला उद्योजकांना कर्जे दिली आहेत. ती कर्जे पाहता अगदी तळातील महिलांना, ज्यांना घरातल्या घरात स्वकष्टावर व्यवसाय करावयाचा आहे त्यांना ज्या लहान-मोठ्या भांडवलाची गरज असते ती आता याव्दारे पुरविली जाणार आहे. पहिलीच कर्जे ही पाळणाघरांपासून ते खानावळीचा व्यवसाय करण्यासाठी दिली गेली आहेत. यातून महिला सबलीकरणाचे एक महत्वाचे पाऊल उचलले जाणार आहे. आपल्याकडे महिला सरपंचपदापासून ते राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचल्या आहेत. असे असले तरी अजूनही सर्वसामान्य महिला मात्र अनेक बाबतीत आर्थिकदृष्टा मागास राहिल्या आहेत. त्यांच्याकडे काबाडकष्ट करुन कमविण्याची हिंमत आहे, काही तरी छोटा-मोठा स्वयंरोजगार करुन आपल्या घराला हातभार लावण्याची त्यांच्यात हिंमत आहे. परंतु त्यांना अनेकदा भांडवली मदत मिळत नाही आणि त्यांचे घोडे अडकते. ग्रामीण भागात आता बचत गटांनी लहान पातळीवर अशा महिलांना अर्थसहाय्य करुन देऊन त्यांच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न जरुर केला आहे. परंतु हे देखील पुरेसे नाही. यासाठी महिलांच्या उद्धारासाठी झटणारी एखादी बँक हवी होती. आपल्याकडे जसे बँकांना शेतकर्‍यांसाठी, लघुउद्योजकांसाठी कर्जे ठरावीक प्रमाणात द्यावीच लागतात तशी महिलांसाठी काही कर्जे देण्याची सक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांना भांडवल उभारणी करणे हा एक मोठा प्रश्‍न असतो. आता ही उणीव महिला बँक भरुन काढेल. महिला बँकेमध्ये केवळ महिला कर्मचारीच असतील असे नाही तर बहुतांशी महिला कर्मचारी असतील व काही प्रमाणात पुरुषही असतील. सघ्या सुमारे २५ ते ३० टक्के पुरुषांचे प्रमाण असेल. मात्र संचालक मंडळात सर्व महिला व प्रमुख पदावर महिलाच असतील. मात्र खातेदार, ठेवीदार व कर्जदार या महिलाच असतील. त्यामुळे ही बँक खर्‍या अर्थाने महिलांची असेल. अर्थात आपल्या शेजारच्या पाकिस्तानने १९८९ सालीच महिलांसाठी खास बॅक स्थापन करुन आपल्यावर बाजी मारली आहे. ही बँक आता उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. एका मुस्लिम देशाने महिलांसाठी खास बँक काढावी हे कौतुकास्पदच म्हणावे लागेल. त्यातुलनेत आपल्याकडे ही संकल्पना उशीरा रुजत आहे. आपल्याकडेही महिला बँक यशस्वी होईल यात काही शंका नाही. २०२० सालापर्यंत महिला बँकेने ६० हजार कोटी रुपयांची उलाढाल करण्याचे उदिष्ट निश्‍चित केले आहे. हा आकडा मोठा वाटत असला तरी आपल्या देशातील लोकसंख्या पाहता व आपल्या देशातील महिलांची उद्योजकतेची गरज पाहता हे गाठणे काही जड जाणार नाही. सरकारने बँका आता थेट गावपातळीवर पोहचून प्रत्येकाचे एक तरी बचत खाते असावे यासाठी अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. आता आधार कार्डावर ज्या सवलती दिल्या जाणार आहेत त्या बँक खात्याशीच निगडीत असणार आहेत. अशा वेळी महाला बँक ग्रामीण भागातील महिलांसाठी एक महत्वाचे काम करु शकेल. सर्वात महत्वाचे म्हणजे ही बँक सार्वजनिक क्षेत्रात सुरु झालेली असल्याने सर्वांना या बँकेच्यासंदर्भात सरकारी हमी असेल त्यामुळे महिला आपल्या पैसा सुरक्षित राहिल याची खात्री बाळगू शकतात. एकूणच पाहता यामुळे महिलांचे सबलीकरण होण्याची प्रक्रिया यामुळे वेग घेईल.
-----------------------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel