-->
संपादकीय पान--अग्रलेख-- २१ नोव्हेंबर२०१३च्या अंकासाठी--
--------------------------------------------
केजरीवालांचा सत्तेचा सारीपाट
---------------------------------
अरविंद केजरीवाल हे नाव दोन वर्षांपूर्वी फारसे कुणाला ठाऊक नव्हते. परंतु अण्णांनी भ्रष्टाचाराविरुध्द उभारलेल्या आंदोलनात या केरजीरालांची देशाला पहिली ओळख झाली. त्यावेळी अण्णांच्या आंदोलनात जी गर्दी उसळू लागली त्यावरुन अरविंद केजरीवाल यांच्या आशा-आकांक्षा व त्या जोडीला महत्वाकंाक्षाही जागृत झाल्या. या आंदोलनाच्या माध्यमातून आपण अण्णांना हाताशी घेऊन आपण सत्तेचा सारीपाट मांडू शकतो अशी त्यांची गृहितके होती. परंतु अण्णा हे राजकारण करीत नसल्याचा आण आणीत असले तरी ते पक्के राजकारणी आहेत. त्यांना कोणत्या राजकारण्यांविरुध्द आंदोलन छेडायचे व ते कधी मागे घ्यायचे याचे त्यांना बरोबर भान असते. अण्णांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यासमवेत असलेले लोक वा कार्यकर्ते फारतर एखाद-दोन वर्षे राहातात. त्यानंतर ते त्यांना सोडून जातात किंवा आपले नवे दुकान थाटतात. अण्णांना त्याचे काही देणे घेणे नसते. जो आपल्याबरोबर असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा, विचाराचा असो ते आपल्याबरोबर घेऊन आंदोलन करतात. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनात कधीच सुसूत्रता नसते. केजरीवाल यांचेही असेच झाले. दिल्लीत अण्णांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन छेडल्यावर किरण बेदी, अरविंद केजरीवाल यांना आता अण्णा देशात क्रांतीच करीत आहेत असा भास झाला. दिल्लीतील आंदोलनानंतर मुंबईतील उपोषण हे प्लॅप झाले आणि अण्णांच्या या आंदोलनाला घरघर लागली. त्यावेळी अण्णांनी आपण राजकारणात उतरणार नाही आणि कोणताही राजकीय पक्ष स्थापन करणार नाही अशी ठाम भूमिका घेतल्यावर केजरीवाल यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला आळा बसणार होता. त्यामुळे केजरीवाल यांनी अण्णांपासून घटस्फोट घेतला आणि आपला राजकीय पक्ष जन्माला घातला. आपला हा राजकीय पक्ष अर्थातच भ्रष्टाचारापासून मुक्त असेल असे आश्‍वासन देत त्यांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत प्रचार सुरु केला. अण्णांच्या आंदोलनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने छुपा पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर आंदोलनाच्या जागी गर्दी करण्याची व्यवस्था संघानेच केली होती हे नंतर उघड झाले. आता प्रश्‍न असा उद्दभवतो की केजरिवाल यांना संघ कशासाठी पाठिंबा देईल? कारण संघाची मतदान करण्यासाठी अधिकृत शाखा म्हणजे भाजपा असताना ते केजरिवालांना मदत कशासाठी करतील? असे असतानाही केरजीवाल यांनी आपल्या हिंमतीवर ही निवडणूक लढविण्याचा संकल्प सोडला होता. अर्थातच आपल्या देशात निवडणूक लढविणे हा निव्वळ पैशाचा खेळ आहे. केजरिवाल यांची पूर्वीपासून स्वयंसेवी संघटना असल्याने त्यांनी या निवडणुकीसाठी विदेशातून पैसा उभारण्याचे ठरविले. हा पैसा कसा उभारावयाचा याचे तंत्र त्यांना स्वयंसेवी संघटना असल्यामुळे ज्ञात होते. आपल्या विदेशातील अनिवासी मित्रांकडून व पाठिराख्यांकडून २० कोटी रुपये उभारण्याचा त्यांनी सोडलेला संकल्प काही दिवसातच पूर्ण झाला. विदेशातील देणगीदारांच्या दृष्टीने ही रक्कम डॉलरचा विचार करता नगण्यच होती. विदेशातील या गुंतवणूूकदारांनी या देणग्या देण्यामागे व्यवहारी विचार केला. जर समजा केजरीवाल यांनी काही चांगल्या संख्येने जागा पटकाविल्या तर आपली ही एक आत्तापासूनची चांगली गुंतवणूक ठरु शकते. थोडक्यात त्यांनी गाजराची पुंगी... या म्हणीप्रमाणे केजरीवाल यांच्यांत ही देणगीच्या रुपाने गुंतवणूक केली. दिल्ली निवडणुकीत केजरीवाल हे किंगमेकर ठरणार असल्याचे नित्कर्ष जनमत चाचणी निकालाने दिले आणि केजरीवाल यांच्या राजकीय महत्वाकांक्षा आता पूर्ण होणार असे दिसू लागले. मात्र केजरीवाल यांना किंगमेकर होण्यात विशेष रस नाही तर किंग व्हायचे असल्याने त्यांनी आण्णांच्या नावाचा वापर करुन आपल्याकडे मतदार आणखी कसे खेचले जातील हे पाहाण्यास सुरुवात केली. चाणाक्ष असलेल्या अण्णांनी केजरीवालांची ही खेळी ओळखली आणि आपणाला राजकारणात कोणी ओढू नये असे बजावले. अण्णांनी केजरीवालांचे पालकत्व नाकारणे, आंदोलन काळात पैशाचा दुरुपयोग झाल्याचा निर्वाळा देणे, अण्णांचा समर्थक असल्याचा दावा करणार्‍या एकाने केरजीवालांवर काळी शाई फेकणे या सर्व घडामोडी केजरीवाल यांना मागे नेणार्‍या ठरणार आहेत. अण्णांच्या आंदोलनाला संघाने पाठिंबा दिला होता म्हणून संघ दिल्लीत केरजीवालांना पाठिंबा देणे शक्य नाही. कॉंग्रेस व भाजपा नको तर आमचा एक स्वच्छ पर्याय म्हणून आम आदमी पार्टी आहे असे सांगत केजरीवाल यांनी सुरुवातीला लोकांचा पाठिंबा मिळविला हे खरे आहे. परंतु केजरीवाल ही या दोन्ही पक्षाहून काही वेगळे नाहीत असे दिसू लागल्यावर लोक त्यांना कशासाठी मते देतील असा प्रश्‍न उद्भवतो. केरजीवाल यांनी अशा प्रकारे सत्तेचा सारीपाट भ्रष्टाचारमुक्तीचा मोठा आव आणीत मांडला खरा परंतु त्यांचेच गुरु असलेल्या अण्णांनी त्यांच्या आरोप करुन हा सारीपाट विस्कटून टाकला आहे. यावेळच्या दिल्लीच्या निवडणुकीत केजरीवाल यांच्या पक्षाला फारसे काही हाती लागणार नाही असाच अंदाज आहे. हा अंदाज खरा ठरल्यास अण्णांच्या आंदोलनाचा तो एक मोठा पराभव ठरेल. अण्णांना राजकीय पक्ष स्थापन करणे आणि चालविणे हे सोपे काम नाही याची पूर्ण कल्पना होती. त्यामुळेच त्यांनी पक्ष स्थापन करण्यास विरोध केला होता. परंतु केजरीवाल यांनी त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी हे धाडस केले. त्यामुळे त्यांचा सत्तेचा मांडलेला सारीपाट उधळला गेल्यास अण्णांचे राजकारण नको हे धोरणच योग्य ठरले हे खरे ठरेल.
--------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel