-->
संपादकीय पान--चिंतन-- २२ नोव्हेंबर२०१३च्या अंकासाठी--
--------------------------------------------
सोने खरेदीत चीनची आघाडी
----------------------------
सोन्याच्या खरेदीत आपला जगात असलेला पहिला क्रमांक यंदा टिकणार नसून चीनने आपल्यावर मात केली आहे. गेल्या वर्षी आपली सोन्याची खरेदी एक हजार टन होती. मात्र यंदा ही खरेदी शंभर टनांहून कमी होऊन ९०० टनांच्या खाली जाण्याची अंदाज वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने व्यक्त केला आहे. चीन मात्र आपल्यावर बाजी मारेल व त्यांची वर्षातील सोने खरेदी एक हजार टनांवर पोहोचेल असा अंदाज आहे. यंदा आपल्याकडे लोकांनी सोने खरेदी कमी करावे यासाठी सरकारने जाणूनबूजून प्रयत्न केले आहेत. त्या प्रयत्नाला यश येईल असे दिसते. तसे झाल्यास सरकारला त्याचा फायदा होईल. सोने खरेदीचे वेड आपल्याकडे पूर्वापार चालत आलेले आहे. त्यापेक्षाही सोने खरेदी ही कोणत्याही वर्गातील व्यक्तीसाठी फार सुलभ ठरते असे आढळले आहे. यामागचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे सोन्याची खरेदी व विक्री आपण कुठेही व केव्हांही करु शकतो. म्हणजे एखाद्याला खेडेगावतही अचानक पैशाची गरज लागल्यास तो आपल्या घरातील पदरी असलेले सोने विक्रीस काढून आपली गरज भागवू शकतो. सोन्याच्या या बाजारातील तरलतेमुळे सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात फायदेशीर ठरते. तसेच सोन्यातील गुंतवणुकीवर आजवर सतत लाभ वाढतच गेले आहेत. काही अपवादात्मक वर्ष वगळता दरवर्षी सोन्याच्या किंमती वाढतच गेल्याने सोन्यातील गुंतवणूक ही लाभदायक ठरते. त्यामुळे आपल्याकडे सोन्यातली गुंतवणूक लाभदायक ठरल्याने यातील गुंतवणूक गेल्या काही वर्षात वाढत जात सुमारे एक हजार टनांवर गेली होती. आपण जरी सोन्याची खरेदी आपल्या लाभासाठी करीत असली तरीही सोने खरेदीमुळे देशाच्या तिजोरीवर मात्र भार पडत असतो. कारण सोने आपल्याला आयात करावे लागतेे. त्यामुळे देशाचे अमूल्य परकीय चलन आपल्याला खर्च करण्यशिवाय अन्य काही मार्ग शिल्लक राहात नाही. सध्या आपण सर्वाधिक परकीय चलन हे पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीवर खरेदी करतो. ही खरेदी करण्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नाही. कारण आपल्याकडे पेट्रोलियम पदार्थांची जेवढी गरज आहे त्याच्या ८० टक्के उत्पादन हे आयातच करावे लागते. आपली विकसनशील अर्थव्यवस्था असल्याने ही आयात कमी करता येणार नाही. एकवेळ सोने खरेदीला लगाम आपण लावू शकतो. परंतु पेट्रोलियम पदार्थांची खरेदी थांबवू शकत नाही. अशा वेळी सरकारने आपल्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी सोने खरेदीवर काही निर्बंध लादले. त्यामुळे सोन्याची खरेदी कमी होईल व परकीय चलन आपले वाचू शकेल हा मूळ हेतू होता. यंदा जवळपास शंभर टनांहून सोन्याची खरेदी कमी झाल्याने सरकारचा हा हेतू बर्‍यापैकी यशस्वी झाला असे म्हणता येईल. सोन्याच्या किंमती या जागतिक पातळीवर ठरतात. सध्या जागतिक पातळीवर प्रामुख्याने युरोपीयन देशांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने त्यातील काही देश आपल्याकडील सोन्याचा साठा विक्रीस काढीत आहेत. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. अर्थात भारतात व चीनमध्ये खरेदी होत असली तरीही त्यामुळे किंमती काही वाढत नाहीत. याचे कारण युरोपातील देशांच्या सोन्याच्या विक्रीमुळे सोन्याच्या किंमतीवाढीवर निर्बंध येत आहेत. सोन्याच्या किंमती घसरत्या असल्यामुळे आपल्याकडेही सोने खरेदीतील उत्साह कमी झाला आहे असे म्हणतात. मात्र मुळातच भारतीयांना सोने खरेदीचा हव्यास आहे. तसेच सोन्यातील गुंतवणूक ही अत्यंत सुरिक्षत व या गुंतवणुकीवर सतत वाढील लाभ मिळाला असल्याने आपल्याकडील सोन्यातील गुंतवणूक ही वाढतच जाईल. सद्याचा खरेदीचा ओघ घसरलेला असला तरी ही कालखंड फार काही काळ टिकणारा नाही, हे देखील वास्तव विसरता येणार नाही.  
----------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel