-->
संपादकीय पान--अग्रलेख--१६ नोव्हेंबर २०१३च्या अंकासाठी--  
-------------------------------------------
सचिनमय देश आणि आपण
--------------------------
सचिनचेे कसोटीतील शेवटच्या सामन्यात शतक न झाल्याने क्रिकेटरसिकांवर नैराश्येचे सावट येणे आपण समजू शकतो. आता दुसर्‍या डावाकडे सर्व क्रिकेटरसिकांचे लक्ष लागले आहे. सचिनचा सध्या सुरु असलेला मुंबईतील वानखडेवरील शेवटचा कसोटी सामना पाहाण्यासाठी क्रिकेटरसिकांनी जी गर्दी केली होती ती पाहता संपूर्ण देशच सचिनमय झाला आहे. अशा प्रकारचा निराप कोणत्याही क्रिडापटूच्या भाग्यात नाही. १९८९ साली १५ नोव्हेंबर रोजीच सचिनने पाकिस्तानविरुध्दच्या कसोटीत कराची येथे पहिला सामना खेळून आपल्या कारर्किदीची सुरुवात केली होती. त्यावेळी हा १६ वर्षाचा क्रिकेटपटू जागतिक किर्तीचा होईल असे कुणाला वाटलेही नव्हते. परंतु सचिनने आपल्या बॅटच्या बळावर अनेक विक्रम केले आणि आज त्याच शेवटचा सामना सध्या सर्व जग बघतोय. अर्थात ज्या देशात क्रिकेट खेळले जात नाही त्या देशातही सचिनच्या शेवटच्या सामन्याची चर्चा चालू आहे. सचिन हा क्रिकेटपटू असला तराही खर्‍या अर्थाने भारताचा एक जागतिक आयकॉन ठरला आहे. सचिनची निवृत्ती ही सचिन यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना जाहीर झाल्याने त्याचा जास्त गवगवा होत आहे. सहसा क्रिडापटूंच्या बाबतीत असे होत नाही. त्यांचा फॉर्म गेला तरी ते खेळत राहातात आणि त्यांना सक्तीने निवृत्त केले जाते. सचिनचे मात्र नेमके उलटे झाले. क्रिकेट रसिकांना तो अजून खेळावाला वाटत असताना तो निवृत्त होत आहे. परंतु आता गेले २३ वर्षे झंझावती धावा काढणारा आपला सचिन पुढील सामन्यात नसणार हे वास्तव आता क्रिकेटप्रमींना स्वीकारावे लागणार आहे. जवळपास तीन वर्षांपूर्वी सचिनचा धावा काढण्याचा वेग मंदावला होता. त्यावेळी सचिनने आता निवृत्त व्हावे असा सल्ला अनेकांनी दिला होता. परंतु सचिनने आपला गवसलेला फॉर्म पुन्हा मिळवून आपल्या विरोधकांची तोंडे गप्प केली होती. एखाद्याने उच्च शिखरावर असताना निवृत्त होण्यात एक वेगळा आनंद आहे. सचिनने हा आनंद मिळवला आहे हे त्याच्या यशाचे मोठे गमक आहे. सचिननेे निवृत्त होताना त्याच्या जगात पसरलेल्या करोडो जीवाला त्याने चटका लावला. क्रिकेट या खेळाभोवती आता मोठे वलय निर्माण झाले आहे. त्यात पैशाची बरसात होते. ललना तुमच्या भोवती फेर देऊन नाचत असतात. आय.पी.एल.ने या सर्वांचा कळस गाठला होता. असे असताना केवळ क्रिकेटमध्येेच रममाण होणे हे सोपे नसते. सचिनने हे करुन दाखविले. त्यावरुन त्याचे या खेळावरील प्रेम, निष्ठा ठळकपणे जाणवते. आपल्या कारर्किदीत सचिनने कोणताही बट्टा लावून घेतला नाही यात त्याचे मोठेपण आहे. क्रिकेट हा खेळापेक्षा व्यवसाय झाला असला तरीही त्यातील सट्टेबाजी आणि त्यात क्रिकेटपटूंचा सहभाग या सर्वांपासून सचिन नेहमीच अलिप्त राहिला. दहावी- बारावीच्या परिक्षेत नापास होणारा विद्यार्थी सहसा आयुष्यातील सर्वच परिक्षांत फेल होणार असा सर्वांचा सर्वसाधारणपणे समज असतो. अर्थातच पुस्तकी ज्ञानातील अभ्यास हा प्रत्येकवेळी करिअर ग्राफ उंचावण्यासाठी काही उपयोगी पडत नाही, हे सचिनने दाखवून दिले आहे. सचिनला क्रिकेटरसिकांना देवत्व दिले. त्याच्या क्रिकेटमधील महानतेचा तो एक सर्वोच्च बिंदू होता. परंतु या देवत्वामुळे सचिनच्या खेळावर कधीच परिणाफ झाला नाही. त्या देवत्वामुळे च्या डोक्यात हवा जाऊन आपल्या कार्यापासून कधीच ढळला नाही. त्याफुळे त्याचे देवत्व हे अधिकच बळकट झाले. सुनिल गावस्कर पाठोपाठ अशा प्रकारे एवढे प्रेम कुणालाच मिळाले नाही. सचिन हा खरोखरीच उत्कृष्ट खेळाडू, एक चांगला माणूस आहे. म्हणूनच त्याच्यात लोकांनी देवत्व पाहिले. सचिनचा हा मोठेपण आता भविष्यात तो पॅव्हेलियनमध्येे गेला तरी टिकणार आहे. कारण त्याची निवृत्ती ही वयाच्या चाळीसाव्या वर्षी असली तरीही प्रत्येकाला चटका देणारी ठरली आहे. क्रिकेट आणि बॉलिवूड हे असे दोन विषय आहेत की जे देशाची सीमा देखील झुगारुन दिल्या जातात. भारत-पाकिस्तानात कितीही वैमनस्य असले तरी या दोन क्षेत्रात भारतीयांच्या ज्या देवता म्हणजे अमिताभ बच्चन, शाहरुखखान, सलमान खान असो किंवा सचिन आहेेत. त्यांनाही पाकिस्तानात तेवढाच मान-सन्मान आदर मिळतो. त्यामुळे क्रिकेटने भारत-पाक संबंधातली दरी बुजविण्याचे मोठे काही गेेल्या काही वर्षात केले आहे. आणि यात सचिनची भूमिका फार मोलाची ठरली आहे. आज सचिनच्या यशाकडे मागे वळून पाहाताने एक बाब जाणवते की, या त्याच्या यशामागे त्याचे कष्ट मोठे महत्वाचे आहेत.केवळ प्रसिध्दीच्या मागे न लागता निष्ठेने आपण एकादे काम करतो त्यावेळी त्याला यश ही मिळतेच. अर्थातच सचिनसारखे व्यक्तीमत्व हे शतकातून एकदाच निर्माण होते. प्रत्येक जण सचिन होऊ शकत नाही हे वास्तव आहे. आपण जरी सचिन होऊ शकलो नाही तरी तो एक आपल्या सर्वांसाठी प्ररेणास्थान म्हणून निश्‍चितच ठरणार आहे. सचिन हा शिक्षणात कच्चा होता परंतु त्याने आपले क्रिकेटमध्ये करिअर घडविले. असा प्रकारे त्याने त्यासाठी घेतलेले कष्ट जर आपण केले तर आपणही प्रत्येक कामात यशस्वी होऊ शकतो. क्रिकेटप्रेमी त्याचा उदोउदो जरुर करतील. परंतु त्याचा केवळ मानसन्मान करुन फायदा नाही तर त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आपण काम केले पाहिजे. सचिनने देशाचे नाव जगात नेले. आपणही आपल्या कामात जिद्द बाळगून निष्ठेेने काम केल्यास त्या-त्या क्षेत्रातील सचिन होऊ शकतो. यातूनच देश मोठा होणार आहे. आज सर्वत्र निर्माण झालेल्या सचिनमय वातावरणातून आपण हीच प्रेरणा घ्यावयाची आहे.
---------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel