-->
संपादकीय पान--चिंतन--४ नोव्हेंबर २०१३च्या अंकासाठी--
----------------------------------
नामविस्ताराने सावित्रीबाईंचा यथोचित गौरव
-----------------------------
गेल्या काही वर्षात नामांतर किंवा नामविस्तार म्हटले की त्याला पहिला विरोध तरी होतो किंवा त्यामागे काही तरी राजकारण तर असतेच. परंतु नुकत्याच झालेल्या पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांच्या बैठकीत विद्यापीठाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ असा नामविस्तार व्हावा, असा निर्णय झाला आहे आणि या मागणीचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. याला मंजुरी मिळाल्यावर पुणे विद्यापीठाचे नामविस्तार होईल. एकप्रकारे या महान क्रांतिकाकर महिलेचा यथोचित गौरवच होणार आहे.
पुणे शहर म्हणजे महाराष्ट्रासहित संपूर्ण देशाचं सांस्कृतिक वैभव! आजवरच्या प्रत्येक शैक्षणिक चळवळीत, परिवर्तनवादी चळवळीत हे शहर पुढारलेलं आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याने जगभरात आपली ओळख आणि परंपरा निर्माण केलेली आहे. १९४८ मध्ये स्थापन झालेल्या पुणे विद्यापीठाने आजवर अनेक नामांकित व्यक्ती जगाला दिल्या आहेत, ज्यांनी पुढे जाऊन जग घडवण्यात मोलाची कामगिरी केली आहे. अशा या विद्यापीठाचा येत्या काळात नामविस्तार होणार आहे. कर्मठ पुण्याची सांस्कृतिक पुणे ओळख निर्माण करण्यासाठी महात्मा फुले यांनी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नांत सावित्रीबाई खंबीरपणे जोतिबांच्या मागे उभ्या राहिल्या. ज्या समाजात स्त्रियांना ज्ञानार्जनबंदी होती, त्या समाजाच्या विरोधात उभे राहून परिवर्तनाचा एल्गार पुकारणारे हे दांपत्य ख-या अर्थाने या देशाचे कोहिनूर ठरले. चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये स्त्रियांना पंचम वर्ग म्हणून मान्यता होती. अस्पृश्यांपेक्षा कठोर वागणूक या स्त्रीवर्गाला  भोगावी लागली होती. दास्यपणाची, गुलामगिरीची जाणीव शिक्षणाशिवाय रुजू घालू शकत नाही हे महात्मा फुले यांनी ओळखलं आणि स्त्री शिकली की, समाज शिकेल आणि कर्मठ प्रथा बंद होतील, हे जाणून त्यांनी आपल्या पत्नीला, म्हणजेच सावित्रीबार्इंना शिक्षण दिलं. स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबा्इंचा जन्म झाला; पण बंधनांचा अर्थच ज्या वयात कळत नाही, त्या वयापासूनच त्यांनी आपल्या कार्याला त्यांच्याही नकळत सुरुवात केली. १८५१ मध्ये पुण्यातच स्त्रियांसाठी भिडे वाड्यात त्यांनी सुरू केलेली मुलींसाठीची शाळा त्यांच्या दूरदृष्टीची आजही साक्ष देत आहे.
आज महिलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तर आकाशाला गवसणी घालणा-या, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा अशा सगळ्या क्षेत्रांत ज्या महिला दिसत आहेत त्या सावित्रीबा्इंच्या ऋणी आहेत. काल जर  त्यांनी स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रचली नसती, तर महिला सक्षमीकरणाचा पायंडा पडलाच नसता. बालविवाहाला विरोध करणा-या सावित्रीबाई,   बलात्कारामुळे गरोदर असलेल्या बाईचं बाळंतपण करणारी सावित्रीबाई, पोटापाण्यासाठी शरीरविक्री करणा-या माय-माउलीला दुष्टांच्या तावडीतून सोडून आणणारी सावित्रीबाई आणि प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांना आईच्या मायेप्रमाणे शुश्रूषा करणा-या सावित्रीबाई आजदेखील एक अद्भुत रसायन वाटतात.  त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या नामविस्तारामुळे सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीस नक्कीच न्याय मिळणार आहे. त्यांच्या कर्मभूमीत असलेल्या या विद्यापीठाला एक आणखी एक नवी ओळख मिळेल आणि येणा-या अनेक पिढ्यांसाठी त्यांच्या कार्याचा महिमा हा विद्यापीठरूपाने सर्वांच्या नजरेत राहणार आहे. पुणे विद्यापीठ नामविस्ताराला कुणाची हरकत असेल असे चित्र सध्या तरी दिसत नाही; परंतु भविष्यात काही समाजविघातक शक्तींकडून याला विरोध होऊ शकतो. याच सुसंस्कृत पुण्यात ज्येष्ठ विचारवंत नरेंद्र दाभोलकरांची हत्या करण्यात आली होती. धर्मांध शक्तीकडे पुणे परत तर वळले जात नाही ना? अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या एकजुटीचे प्रदर्शन दाखवून महाराष्ट्राची सुज्ञ जनता, पुरोगामी विचारांशी प्रामाणिक राहील अशी ग्वाही द्यायला हवी. पुण्याचे पुरोगामीत्व या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखीत होईल.
-------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel