-->
बिगुल फुंकले

बिगुल फुंकले

संपादकीय पान बुधवार दि. ०५ ऑक्टोबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------- 
बिगुल फुंकले
रायगड जिल्ह्यात आता राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष व शेतकरी कामगार पक्ष या दोन समविचारी पक्षांनी एकत्र येऊन आगामी निवडणूका लढविण्याचा मानस जाहीर केला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या इमारतीमधील नुतनीकरण झालेल्या सभागृहाचे प्रभाकर पाटील सभागृह असे नामकरण करण्याच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे व शेकापचे नेते भाई जयंत पाटील हे एकत्र आले होते. या निमित्ताने या दोन्ही पक्षांनी आपल्या आगामी राजकारणाचे बिगुल फुंकले आहे. यातून भविष्यात रायगड जिल्ह्यातील राजकारण कोणते रंग घेणार आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. आता आगामी काळात येणार्‍या निवडणुका म्हणजे नगरपंचायती, नगरपरिषदा, जिल्हा परिषद या राष्ट्रवादी व शेकापतर्फे एकत्रित लढविल्या जाणार आहेत. रायगड मधील जनता या आघाडीचे स्वागतच करील, यात काही शंका नाही. आज देशात जो प्रवाह सुरु आहे त्यानुसारच जिल्ह्यात समविचारी पक्ष एकत्र येऊ येऊ लागले आहेत. केंद्रात भाजपा सत्तेत आल्यापासून त्यांनी देशातील वातावरण गढूळ करण्यास सुरुवात केली आहे. देशात जातियतेचे विष पेरले जात असून देशाचा गाभा असलेल्या सर्वधर्मसमभाव या संकल्पनेलाच तडा दिला जात आहे. हिंदुत्वाचा अतिरेक मांडला जात आहे व त्याचा बागुलबुवा उभा करुन हिंदूंची मते एकवटण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी देशाच्या घटनेशी प्रामाणिक राहून सेक्युलर पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. याचा पहिला प्रयोग बिहारमध्ये यशस्वी झाला आणि भाजपाला पाणी पाजण्यात नितिश कुमार व लालू प्रसाद यादव हे यशस्वी ठरले. केंद्रात व राज्यात भाजपा व त्यांचे सहकारी पक्ष सत्तेत आल्यापासून समाजातील प्रत्येक घटक अस्वस्थ आहे. एकतर भाजपाने निवडणुका जिंकण्यासाठी जनतेला खोटी आश्‍वासने देऊन त्यांच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या. आता त्यांची पूर्तता त्यांना करणे शक्य नसल्यामुळे भाजपा-शिवसेना आघाडीविषयी नाराजी मोठ्या प्रमाणात जनतेत आहे. मराठा समाजाचे मोर्चे जे निघत आहेत ते त्याचे प्रतिक समजावे, असेच आहेत. देशात सीमेवर अस्वस्थता आहे. सरकारने आपण सर्जिकल स्ट्राईक केल्याचा मोठा आवेश आणला व त्यातून राजकीय फायदा घेण्याचा आता प्रय्तन चालविला आहे. खरे तर अशा प्रकारच्या कारवाया यापूर्वीच्या सरकारने तब्बल चार वेळा केल्या होत्या. मात्र त्याचा गाजावाजा कधीच केला नाही. अर्थात तसा गाजावाजा करणे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही योग्य नसते. मात्र देशातील प्रश्‍नांना बगल देण्यासाठी मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईकचे भांडवल सुरु केले आहे. अशा वेळी देशातील सेक्युलर पक्षांनी एकत्र येण्याची नितांत आवश्यकता आहे. आजच्या स्थितीत मोदी सरकार व त्यांचे सर्व घटक पक्ष जनतेची जी दिशाभूल करीत आहेत त्याकडे लोकांचे लक्ष वेधून जनतेला वास्तव दाखविणण्याची गरज आहे. केवळ इन्व्हेट मॅनेजमेंट करुन सरकार चालू शकत नाही. त्यादृष्टीने देशात पुरोगामी शक्ती व त्यांच्या समर्थनार्थ असलेले पक्ष आता एकवटू लागले आहेत. त्याचा एक छोटा प्रयोग रायगडात होऊ घातला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस व शेकाप यांची विचारधारा एकच असली तरी त्यांच्या काही काही मुद्यांवर मतभेद होते. यासाठी ते कधी कधी एकमेकांच्या विरोधात लढले हा इतिहास आहे. मात्र हा इतिहास असूनही आता नवीन काळाला सामोरे जाण्यासाठी त्यांनी एकत्र येण्याचा मानस जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांनी शेकापच्या अभ्यासू नेत्यांचे नेहमीच कौतुक केले आहे तसेच शेकाप नेते जयंत पाटील यांनी देखील सुनिल तटकरे यांच्या कार्यशैलीचे व संघटना कौशल्याचे कौतुक केले आहे. सोमवारी झालेल्या कार्यक्रमात तर इतिहासाची पाने चाळली गेली. तटकरेंनी ापण जिल्हा परिषद अध्यक्ष असतानाचे किस्से सांगितले. यातून तरुण पिढीने शिकले पाहिजे. बॅ. ए.आर. अंतुले, दि.बा.पाटील, प्रभाकर पाटील, दत्ता पाटील, मोहन पाटील यांच्या काळातील राजकारण, त्यांचा राजकीय प्रश्‍नावर असलेला विरोध मात्र त्याच बरोबर वैयक्तिक पातळीवर असलेली दोस्ती, त्यांच्या काळातील राजकारण, राजकीय कुरघोड्या हा इतिहास तरुणांनी अभ्यासून त्यातून अनेक चांगल्या बाबी आत्मसात करण्याची तटकरे यांनी व्यक्त केलेली अपेक्षा महत्वाची आहे. गेल्या दशकात राजकारण फार बदलले आहे. या बदलेल्या राजकारणात आता चांगले राजकारणी शोधावे लागतात. हे चांगले राजकारणी देण्याचे काम शेकाप-राष्ट्रवादी करु शकेल. रायगड जिल्ह्यात शेकाप-राष्ट्रवादी यांनी एकत्र निवडणुका लढवून एक पाऊल जिल्ह्यात पहिल्यांदा टाकले आहे. यात खरे तर यात कॉँग्रेसलाही समाविष्ट केले जाऊ शकते. मात्र कॉँग्रेसने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. शिवसेना व भाजपा हे दोघेही स्वबळावर निवडणुका लढविणार असे दिसते. कारण या दोघांनाही अति आत्मविश्‍वास आहे. यातच ते परस्परात पाय अडकून पडणार आहेत. मात्र सेक्युलर मतांचे विभाजन होऊ नये व जिल्ह्यातील विकासकामांना वेग यावा यासाठी राष्ट्रवादी-शेकाप एकत्र लढविणार आहेत व त्यांचा हा बार निश्‍चितच रायगडच्या जनतेच्या हिताचा ठरेल. जिल्हा परिषदेत या दोन्ही पक्षांनी गेल्या दोन वर्षात अनेक महत्वाची कामे करुन दाखवून आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे. रायगडात आता विधानसभेची मिनी निवडणूक लढविली जाणार आहे. त्यानंतर हे दोन पक्ष आपला मोर्चा विधानसभेकडे वळवितील, याबाबत काही शंका नाही.
-----------------------------------------------------------------  

Related Posts

0 Response to "बिगुल फुंकले"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel