-->
चंदू चव्हाणचे काय झाले?

चंदू चव्हाणचे काय झाले?

संपादकीय पान गुरुवार दि. ०६ ऑक्टोबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------- 
चंदू चव्हाणचे काय झाले?
नकळत नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तान गेलेले राष्ट्रीय रायफल्सचे जवान चंदू बाबुलाल चव्हाण आमच्या ताब्यात नाहीत, असे पाकिस्तानने जाहीर करुन या मुद्यावर यू-टर्न घेतले आहे. यावरुन पुन्हा एकदा पाकिस्तानचा खोटारडेपणा चव्हाट्यावर आला आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय जवान चंदू चव्हाण ताब्यात असल्याचे पाकिस्तानी लष्कराने नाकारले आहे. चंदू चव्हाण यांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी भारतीय लष्कराचे रणबीर सिंग यांनी पाकिस्तानी लष्करातील संबंधित अधिकार्‍यांना फोन केला. मात्र, आमच्या ताब्यात कुठलाही भारतीय सैनिक नसल्याचे पाकिस्तानने यावेळी सांगितले. भारताने २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले होते. या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले.  यानंतर काही वेळानेच चंदू चव्हाण हे नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेल्याची माहिती समोर आली होती. भारतीय सैनिक पकडल्याची माहिती खुद्द पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली. मात्र जेव्हा चंदू यांच्या सुटकेसाठी संपर्क साधला असता, भारतीय सैनिक ताब्यात नसल्याचे सांगत पाकिस्तानने या प्रकरणी यू-टर्न घेतले. परंतु पाकिस्तान या प्रकरणी खोटे बोलत आहे हे नक्की. मुळचा धुळे जिल्ह्यातील व ३७ राष्ट्रीय रायफल्समध्ये असलेला जवान चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी केंद्राने प्रयत्न सुरु केल्याचे सांगण्यात येत असले तरी या प्रयत्नांची नेमकी दिशा काय आहे हे समजण्याची आवश्यकता आहे. चव्हाण यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय गृह मंत्र्यांनी यांनी मुख्यमंत्र्यांनाही सांगितले आहे. चंदू चव्हाण पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे समजताच त्याची आजी लिलाबाई पाटील यांना कळताच हृदयविकाराचा झटका आला व त्यांचे निधन झाले. एकूणच ही हृद्रयद्रावक कहाणी आहे. अशा स्थितीत चंदू चव्हाण हे सीमा पार करुन कसे गेले व त्यामागची नेमकी कारणे काय आहेत. लष्कर यात काही लपविते आहे का, याचाही छडा सरकारला लावाला लागेल. पाकमध्ये भारतीय सैन्याने केलेला दहशतवाद्यांवरील हल्ला आणि या जवानाने चुकून पार केलेली नियंत्रण रेषा यांचा काहीही संबंध नाही, अशी माहिती सैन्य दलाने दिली असली तरी त्याची चौकशी करण्यीच आवश्यकता आहे. भारत वा पाकचे जवान नियंत्रण रेखा ओलांडणे या घटना नित्याच्याच आहेत. असे प्रकार अनावधानाने घडत असतात़ त्याबाबत दोन्ही देशांच्या लष्कराकडून एकमेकांना माहिती दिली जाते. कागदोपत्री सोपस्कार पार पडल्यानंतर, दोन्ही देशांतील प्रत्यार्पण करारानुसार जवानांना देशात परत पाठविले जाते. साधारणपणे २० दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होते. असे असले तरी चव्हाण यांच्या जाण्याच्या मागे भारतीय सर्जिकल स्ट्राईकची पार्श्‍वभूमी आहे. त्यामुळे पाकिस्तान चव्हाण यांना सहज सोडणार नाही हे ही तेवढेच खरे आहे. त्यासाठी सरकारने पाकवर सातत्याने दबाव वाढविण्याची गरज आहे.

Related Posts

0 Response to "चंदू चव्हाणचे काय झाले?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel