भविष्यातील ऊर्जा
मंगळवार दि. 23 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख
-----------------------------------------------
भविष्यातील ऊर्जा
भविष्याचा विचार करता आपल्याला आता सौर ऊर्जेकडे मोठ्या प्रमाणात वळावे लागणार आहे. सर्वात स्वस्त ऊर्जा असल्याने निसर्गाने दिलेली ही ऊर्जा स्वीकारण्याची आता वेळ आली आहे. सुरुवातीला जलविद्युत त्यानंतर औष्णिक ऊर्जा व सर्वात स्वस्त म्हणून जगात ओळखली गेलेली अणुऊर्जा अशा टप्प्यात जगाने ऊर्जा विकसित केली. मात्र, आता सौर ऊर्जा ही आपल्याला या सर्वांसाठी उत्तम पर्याय म्हणून पुढे आली आहे. दहा वर्षांपूर्वी डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अणुऊर्जेचा करार करुन यासाठीची कवाडे खासगी उद्योगांसाठी म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी खुली केली. त्यावेळी सरकारला पाठिंबा देणार्या डाव्यांनी या मुद्द्यावरुन सरकारचा पाठिंबा काढून घेतला. सरकार काही कोसळले नाही. समाजवादी पक्षाने दिलेल्या टेकूच्या आधारावर मनमोहन सिंग सरकार तरले. मात्र, ज्या मुद्द्यावर सरकार पडण्याचा प्रयत्न झाला, त्या अणुऊर्जेचा एकही प्रकल्प गेल्या दहा वर्षात उभा राहिला नाही. या करारांतर्गत उभाण्यात येणारा जैतापूरचा कोकणातील प्रकल्प अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे. येथील वीज उत्पादनास किमान पाच वर्षे लागतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे अणुऊर्जा प्रकल्प हे झटपट उभारता येत नाहीत व आपल्याकडे तर कोणत्याही प्रकल्पास विरोध होत असल्याने सर्वच प्रकल्प लांबतात. असो, 2005 साली डॉ. मनमोहन सिंग व बुश यांच्यात झालेल्या करारानुसार, भारतात मोठ्या प्रमाणावर अणुऊर्जा प्रकल्प उभारले जाणार होते. त्यावेळच्या प्राथमिक अंदाजानुसार, अमेरिका, फ्रान्स, जपान व रशिया हे देश प्रत्येकी सहा प्रकल्प उभारणार होते. अणुऊर्जा ही अतिशय स्वच्छ असल्याने तसेच स्वस्तही असल्याने 2005 साली त्याच्याशिवाय अन्य कोणताही पर्याय दिसत नव्हता. याच्या उत्पादनात कार्बन उत्सर्जन होत नसल्याने जगाने यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले होते. त्यामुळे भारतानेही या पर्यायाकडे आपली पावले वळविली होती. मात्र, त्यानंतर पाच वर्षातच जपानमधील फुकिशामा येथे अणु प्रकल्पातील झालेला अपघात पाहिल्यावर जग हादरले. त्यानंतर अणु ऊर्जेकडे विकसित जगाचा पाहण्याचा दृष्टीकोन एकदम बदलला. या घटनेनंतर जगातील जुने अणु ऊर्जा प्रकल्प बंद करण्याकडे कल सुरु झाला तसेच नवीन प्रकल्प उभारण्याच्या कामाला खीळ बसली. अनेक नव्याने उभारण्यात येणारे प्रकल्प थांबविण्यात आले. फ्रान्सची अरिवा ही कंपनी फिनलँडमध्ये उभारत असलेल्या प्रकल्पाचा खर्च वाढत गेला व शेवटी ही कंपनी आर्थिकदृष्ट्या तोट्यात आली. फ्रान्सची ईडीएफ या कंपनीने अरिवाला या आर्थिक संकटातून वाचविले खरे, परंतु त्यांचा ब्रिटनधील प्रकल्प अडचणीत आला. शेवटी या प्रकल्पात चायना न्यूक्युलर इलेक्ट्रीक या कंपनीने 33 टक्के भांडवल घेतले व हा प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, या प्रकल्पातून 8 रुपये प्रति युनिट वीज उत्पादन खर्च आहे व हा खर्च आजवरचा सर्वाधिक आहे. जपानच्या तोशिबा कंपनीच्या मालकीच्या वेस्टीनहाऊस या कंपनीने अमेरिकेत दोन अणु प्रकल्प उभारताना मोठा तोटा सहन केला व ही कंपनी दिवाळ्यात गेली. यातून मूळ तोशिबा कंपनीस 9.9 अब्ज डॉलरचा तोटा सहन करावा लागला. शेवटी या कंपनीने अणु प्रकल्प उभारणीचे काम सोडून दिले. आता मात्र वेस्टीनहाऊस या कंपनीचे भवितव्य अंधारात आहे. एकूणच अणु प्रकल्प उभारणे ही अवघड बाब असते व तिच्या उभारणीचा कालावधीही मोठा असतो. त्यामुळे अनेकदा त्याच्या पूर्ण उभारणीपर्यंत कोणतीही अडचण येऊ शकते. सुरुवातीला आपल्याकडेही अणु प्रकल्पातून तयार होणारी वीज ही प्रति युनिट 2.50 रुपयांनी पडेल असा अंदाज होता. आता हा दर चार रुपयांवर गेला आहे. रशियाने तामिळनाडूतील कुंडाकुलम प्रकल्पातील 3 व 4 प्रकल्पातील वीज 6.30 रुपयांनी वीज पडेल, असा अंदाज बांधला आहे. अरिवा या कंपनीने भारतात अणु प्रकल्प उभारुन प्रति युनिट 7 रुपयांनी वीज देण्याचे मान्य केले होते. आता मात्र ही वीज प्रत्यक्ष उत्पादनानंतर 12 रुपयांवर जाण्याचा धोका आहे. त्या तुलनेत राजस्थानात उभारल्या जाणार्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पातून प्रति युनिट 2.62 रुपयांनी वीज मिळणार आहे. अणु प्रकल्प असो किंवा सौर ऊर्जा प्रकल्प या दोघांनाही स्वस्त जमीन, विविध करसवलती, सबसीडी या दिल्या जातात. मग त्यातूनही जर सौर ऊर्जा ही स्वस्त मिळत असेल तर तो एक उत्तम पर्याय ठरणार आहे. सौर ऊर्जेच्या प्रकल्पाच्या उभारणीचा खर्च दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्याचबरोबर त्याच्या उभारणीचा कालावधीही कमी आहे. त्या तुलनेत अणु वीज प्रकल्पाच्या उभारणीचा कालावधी हा आठ ते दहा वर्षांचा असतो. यात कितीही नवीन तंत्रज्ञान आले तरी हा कालावधी काही कमी झालेला नाही. त्यामुळे सौर ऊर्जेचा हा एक मोठा फायदा आहे. भविष्यात सौर ऊर्जेच्या प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात उभारणी केल्यास त्याचा उत्पादन खर्च एक रुपयाच्याही खाली येईल. त्यासाठी आपल्याकडे संशोधन होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्यासारख्या विकसनशील देशाने सौर ऊर्जेचा पर्याय स्वीकारण्याची आवश्यकता आहे. ही ऊर्जा स्वस्त तर आहेच, शिवाय याच्या प्रकल्पाच्या उभारणीस खर्च कमी येतो तसेच कालावधीही कमी लागतो. अर्थात, मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे सूर्यप्रकाशही असल्याने आपल्यासाठी ही जमेची बाजू आहे. भविष्यात अणु ऊर्जेची जागा ही सौर ऊर्जा घेणार हे नक्की आहे. याची सुरुवात आतापासून भारताने केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. भविष्यातील ऊर्जा म्हणूनच सौर ऊर्जेकडे आपण पाहिले पाहिजे.

0 Response to "भविष्यातील ऊर्जा"
टिप्पणी पोस्ट करा