-->
संपादकीय पान--चिंतन-- २३ नोव्हेंबर२०१३च्या अंकासाठी--
--------------------------------------------
स्थलांतरीत मजूरांचा व बाल कामगारांचा प्रश्‍न
-------------------------------------
आपल्या देशात रोजंदारीसाठी वणवण भटकणार्‍या मजुरांची संख्या आठ कोटीहून जास्त आहे. संपूर्ण ग्रेट ब्रिटनच्या लोकंसख्येऐवढी ही लोकसंख्या भरते. हे मजूर देशात एका राज्यातून दुस-या राज्यात जातात तसेच हे मजूर देशातील ३ ते ४ राज्य ओलांडून परराज्यात जातात. वेगवेगळ्या अभ्यासांची सरासरी काढली तर लक्षात येते की, यांच्यासोबत शाळेत जाण्याच्या वयाची किमान ७० लाख मुले असतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की किमान ७० लाख मुले दरवर्षी शिक्षणापासून वंचित राहतात. महाराष्ट्रात ऊसतोड, वीटभट्टी, बांधकाम, दगडखाण, बागायती क्षेत्रात, शेतीकामाला जाणारे भटके-विमुक्त-आदिवासी भागातून नागरी भागात जाणारे मजूर अशी एकत्रित संख्या केली तर ती ५० लाखांच्याही पुढे जाईल.
मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर, नाशिक , यवतमाळ या शहरांच्या आसपास दगडखाणी जास्त आढळतात. या क्षेत्रात काम करणा-या संतुलन संस्थेने केलेल्या अभ्यासात महाराष्ट्रात ९,८३८ दगडखाणी असून त्यावर १७ लाख २१ हजार ६५० इतकी लोकसंख्या अवलंबून असल्याचे म्हटले आहे. या कामगारांमध्ये ६० टक्के विमुक्त जातींचे कामगार सर्वात जास्त आहे. हे कामगार वडार,  रामोशी, लमाण, वंजारी, कैकाडी या समाजघटकातील असतात. १५ टक्के कामगार भटक्या जमातीचे असतात. त्यात बेलदार, कोल्हाटी, लोहार, डोंबारी, हटकर हे  प्रामुख्याने असतात. तर उरलेल्या २५ टक्क्यांत अनुसूचित जाती- जमातीचे कामगार असतात.
साधारणत: ६ महिने ते २ वर्षे स्थलांतर होण्याचे प्रमाण जास्त आहे. या दगडखाणी गावापासून खूप दूर असल्याने कोणत्याच सुविधा त्यांना मिळत नाहीत. खाणीचे मालकही आर्थिक शोषण करत असतात. आरोग्याच्या कोणत्याही सुविधा नसतात. अपघातांचे प्रमाण महिन्याला शेकड्यात असते. या खाणीत काम करणा-या कामगारांच्या मुलांना अनेक आजार होतात. १९५२च्या खाणकायद्यानुसार खाणीत लहान मुलांना काम करायला बंदी आहे, परंतु खाण उद्योगात बालकामगार मोठ्या प्रमाणात आहेत. दगडखाण कामगारांसोबत असणा-या मुलांची संख्या हजारात नव्हे तर लाखात मोजावी लागेल. दगडखाणी या शहरापासून खूप दूर असल्याने या मुलांना शाळेत नेणे कठीण असते. दगडखाणींसारखे दुर्लक्षित क्षेत्र आहे वीटभट्टी. आज बांधकाम व्यवसाय तेजीत आहे त्यामुळे या वीटभट्ट्या आज प्रत्येक तालुक्यांपासून तर थेट मोठ्या शहरांभोवती पसरल्या आहेत. एकट्या ठाणे, मुंबई परिसरात ५००० वीटभट्ट्या आहेत. वीटभट्टीवर काम करणारा कामगार हा प्रामुख्याने आदिवासी व भिल्ल आहे. यवतमाळ जिल्ह्यातून होणारे स्थलांतर हे प्रामुख्याने या कामगारांचे आहे. अगोदर उचल घेऊन नंतर कामगार येतात, पण आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात आहे. एकूणच दगडखाणी व वीटभट्टी यांच्या प्रश्नात साधर्म्य आहे. दोन्हीकडे स्थलांतरित मजूर आहेत. दोन्हीकडे मालकांकडून शोषण होत असतेे. मजुरांच्या मुलांच्या शाळा दूर आहेत आणि या दोन्ही क्षेत्रांत काम करणा-या संस्थाही खूप कमी आहेत. शासनाकडे या दोन्ही क्षेत्रांतील कामगारांची संख्या, मुलांच्या संख्येची नोंदसुद्धा नाही. शिक्षणासाठी वेगळा विचार करणे दूरच राहिले. वीटभट्टी मजुरांसाठी काम करणा-या उल्का महाजन सुचवितात की, हे मजूर जिथून येतात त्या तालुक्यात त्यांची नोंद झाली पाहिजे व प्रत्येक तालुक्यात स्थलांतरित होणा-या मजुरांच्या मुलांसाठी आश्रमशाळा आवश्यक आहेत. असंघटीत क्षेत्रातील या मजुरांच्या प्रश्‍नाकडे सरकार कधी लक्ष घालणार किंवा नाही असा प्रश्‍न पडतो.
----------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel