-->
संपादकीय पान--चिंतन--१२ नोव्हेंबर २०१३च्या अंकासाठी--  
-------------------------------------------
मुंबईत मेट्रोपाठोपाठ जलवाहतूकही सुरु व्हावी
--------------------------------------
महानगर असलेल्या मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत क्रांतीकारी बदल घडवून आणणार्‍या मेट्रोची
चाचणी यशस्वी झाली. आता ही मेट्रो येत्या महिन्याभरात वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावू लागेल.
देशातील पहिली मेट्रो रेल्वे कोलकात्यात धावली आणि मेट्रोची गरज देशातील महानगरांना भासू लागली.
त्यानंतर दिल्लीने मेट्रो सुरु करण्याचे पाऊल टाकले आणि दिल्लीचा सार्वजनिक वाहतूक
व्यवस्थेत कायापालट झाला. मुंबई व तिच्या उपनगराची अवाढव्य सव्वा कोटी लोकसंख्या व दोन
टोकातील अंतर पाहता मेट्रोचे जाळे तातडीने उभारण्याची गरज होती. परंतु राज्यकर्त्यांनी नेहमीच
मुंबईकडे दुर्लक्ष केले व या महानगराला सावत्र मुलाचा दर्जा दिला त्यामुळे येथील सार्वजनिक
वाहतूक सेवा गेल्या दोन दशकात गंभीर झाली. आता उशीरा का होईना मेट्रो सुरु होते आहे त्याच
स्वागत झाले पाहिजे. मुंबईत आता तीन टप्प्यात मेट्रो सुरु करण्यात येणार आहे त्यातील हा
पिहला टप्पा कार्यान्वित होत आहे. सध्याच्या उपनगर रेल्वेवर जो ताण येतो तो कमी
करण्यासाठी तातडीने काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यातील पहिली योजना
म्हणजे मेट्रो. आता पुढील दहा वर्षात मुंबईत मेट्रोचे जाळे उभारले जाईल. त्याच्याजोडीला मुंबई
हे बेट असल्याने जलवाहतुकीचा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे परंतु याचा शासन का विचार
करीत नाही हे समजत नाही. मुंबईच्या नरिमन पॉँईंट ते बोरिवली ते भाईंदर अशी जल वाहतूक सुरु
केल्यास मुंबईतील चाकरमन्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मुंबईतील उपनगरीय रेल्वे दररोज ७०
लाख लोकांची ये-जा करते. यातील अर्ध्याहून जास्त लोक हे पश्चिम उपनगरीय रेल्वेतून प्रवास
करतात. त्यांच्यासाठी जलवाहतूक सुरु केल्यास मुंबईत एक स्वस्त वाहतुकीचा चांगला पर्याय
उपलब्ध होऊ शकतो. त्याच्या जोडीला मुंबईला जोडून असलेल्या नवी मुंबईतही जलवाहतुकीचा
चांगला पर्याय आहे. मध्यंतरी राज्याचे मंत्री गणेश नाईक नवी मुंबईतील आपल्या घरापासून
बोटीने मंत्रालयात झपाट्याने म्हणजे अर्ध्या तासाचा प्रवास करुन कसे पोहोचतात याचे वर्णन
मुंबईतील वृत्तपत्रातून करण्यात आले होते. मंत्रीमहोदय असा प्रवास करतात तर राज्यातील
जनतेला ही सेवा का उपलब्ध होऊ नये याचा विचार कुणी केला नाही. जगातील अनेक आघाडीच्या
शहरात रेल्वेच्या जोडीने जलवाहतुकीचा विचार केला जातो. आपल्याकडे तसा विचार केलाच जात
नाही. मुंबई हे बेट असल्याने तिला असलेली उपनगरे ही खाडीने वा समुद्राने जोडलेली आहेत. ही
उपनगरे जर जलवाहतुकीने जोडली तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारेलही व लोकांना स्वस्त
प्रवासाचे एक साधन उपलब्ध होईल. मुंबई आज मेट्रोसाठी करोडो रुपये खर्च झाले आहेत. तसेच
याच्या उभारणीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरावे लागले कारण येथे असलेली दाट वस्ती. आता
सरकार गेटवे ते बोरिवली समुद्राला समांतर रस्ता करण्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च
करणार आहे. त्याएवजी सरकारने या मार्गावर जलवाहतूक सुरु केल्यास काही फारसा खर्च न
करता लोकांना एक नवा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करुन देता येईल. परंतु सरकारला मुंबईच्या
चाकरमन्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्याची आवश्यकता वाटत नाही. मुंबईला जागतिक
किर्तीचे आर्थिक केंद्र करण्याची मोठी घोषणा पंतप्रधान एकीकडे करतात मात्र त्यासाठी ज्या
सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी-सवलती दील्या पाहिजेत त्याच्या कुणीच विचार करीत नाही.
त्यामुळेच मुंबईकराला दररोज दोन-दोन तास घामाघूम होत प्रवास करुन आपले कार्यालय गाठावे
लागते. मुंबईतील उपनगरीय रेल्वे या चालणार्‍या छळछावण्या असल्यासारख्या आहेत. यातून
दिलासा जर द्यावयाचा असेल तर केवळ मेट्रोवर किंवा उपनगरीय रेल्वेवर भार देऊन चालणार
नाही. तर सार्वजनिक वाहतुकीचे विविध पर्याय तपासावे लागतील. यातील जलवाहतूक हा एक
उत्तम पर्याय ठरणार आहे. रार्ज्यकर्त्यांनी याचा गंभरीपणे विचार केला पाहिजे.

----------------------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel